अँटी एजिंग औषधाने हृदयविकाराचा धोका?
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर चर्चेला वेग

मुंबई : हल्ली हार्ट अटॅक चे प्रमाण वेगाने वाढत आहे. प्रत्येकवेळी हार्ट अटॅकच्या नव्या कारणांची चर्चा होते. सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे हल्ली तरुणांमध्येच हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेय. म्हणून दरवेळी जेव्हा एखाद्या प्रसिद्ध पण तरुण व्यक्तीचा हार्टशी संबंधित समस्येने मृत्यू होतो, तेव्हा यामागे काय काय कारणं असू शकतात याची चर्चा होणे गरजेचे आहे. .
बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस फेस शेफाली जरीवाला यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. असे मानले जाते की, शेफालीचा मृत्यू कार्डियाक अरेस्ट (एससीए) मुळे झाला. शेफालीच्या कुटुंबीयांच्या मते, ती हृदयविकाराने ग्रस्त होती आणि त्यावर उपचारही घेत होती. तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधीपर्यंत ती पूर्णपणे बरी दिसत होती, परंतु अचानक तिने जगाचा निरोप घेतला. असा दावाही केला जात आहे की शेफाली जरीवाला गेल्या ५-६ वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी अँटी-एजिंग औषधे घेत होती. आता प्रश्न असा आहे की, अँटी-एजिंग औषधे घेतल्याने कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो का?
नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील वरिष्ठ कार्डियोलॉजिस्ट डॉ. वनिता अरोरा म्हणतात की, जर अँटी-एजिंग औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय घेतली तर ती घातक ठरू शकतात. या औषधांचे शेकडो दुष्परिणाम आहेत, त्यापैकी एक म्हणजे सडन कार्डियाक अरेस्ट (एससीए). अँटी-एजिंग औषधे हृदयात इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटिंग करतात, ज्यामुळे सडन कार्डियाक अरेस्ट होऊ शकते. या स्थितीत, लोकांचे हृदय अचानक रक्त पंप करणे थांबवते आणि हृदय स्थिर स्थितीत जाते. यामुळे मेंदू आणि शरीराच्या इतर भागांना रक्तपुरवठा थांबतो. झोपेत असताना किंवा चालत असतानाही सडन कार्डियाक अरेस्ट येऊ शकतो. त्याची कोणतीही लक्षणे आधीच दिसत नाहीत.
डॉ. वनिता यांनी सांगितले की, जेव्हा सडन कार्डियाक अरेस्ट येतो तेव्हा लोक अचानक बेशुद्ध होतात आणि हृदयाचे ठोके असामान्य होतात. सामान्य म्हणजेच नॉर्मल हार्ट बिट ६०-९० bpm दरम्यान असते, जी हृदयविकाराच्या झटक्यामध्ये २५०-३५० bpm एवढी होते. सडन कार्डियाक अरेस्टनंतर काही मिनिटांत उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो.
सुमारे ९० टक्के प्रकरणांमध्ये, लोक रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मरतात. केवळ वृद्धत्वविरोधीच नाही तर अँटीबायोटिक, अँटी-एलर्जीक, अँटी-हिस्टामाइन औषधे देखील हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकतात. भारतातील बहुतेक लोक ताप, सर्दी, खोकला झाल्यास केमिस्टचा सल्ला घेतल्यानंतर औषधे घेतात, परंतु असे करणे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप हानिकारक आहे. कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.



