Uncategorizedकव्हर स्टोरी

मनातून उतरलेला माणूस

- सौ. प्रार्थना देशमुख

काही नाती नकळत जुळतात… आपोआप!
त्यात न कोणते नियम, न अटी, न अपेक्षा…
फक्त असतो एक विश्वास — आणि मनापासून वाटणारी जवळीक.

पण… एखादा माणूस जेव्हा मनातून उतरतो,
तेव्हा तो परत मनात जागा मिळवू शकत नाही…
कदाचित त्याने चूक मान्य केली असेल,
कदाचित त्याने पुन्हा जवळ येण्याचा खूप प्रयत्न केला असेल,
कदाचित त्याच्या नजरेत खंत असेल, पश्चाताप असेल…
पण जेव्हा मन तुटतं ना, तेव्हा एक अदृश्य भिंत उभी राहते…
ती ना शब्दांनी पाडता येते, ना अश्रूंनी विरघळवता येते!

मनातून उतरलेला माणूस म्हणजे काय माहितेय?
तो अजूनही आठवतो,
पण आठवणी आता हसवत नाहीत — चिवटपणे बोचतात!
तो अजूनही दिसतो डोळ्यांपुढे,
पण आता नजरेला धुके लागतं — ओळख गडद होते!
तो अजूनही बोलतो तुमच्याशी,
पण आता त्या शब्दांत विश्वास वाटत नाही — केवळ आवाज उरतो!

विश्वास एकदा तुटला की, नातं हरवतं…
नातं हरवलं की, जवळीक संपते…
आणि जवळीक संपली की, त्या माणसाचा ‘असणं’ केवळ एक छायाचित्र उरतं.

खरं सांगायचं तर…
माफ करणं शक्य असतं,
भूतकाळ विसरणंही शक्य असतं,
पण मनात पुन्हा ‘तीच जागा’ देणं — फार कठीण असतं.
कारण माणूस विसरला जातो… पण तो झालेला ‘त्रास’ — कायम स्मरणात राहतो!

मनातून उतरलेला माणूस परत “जवळ” येऊ शकतो,
पण “आपलासा” कधीच होऊ शकत नाही…

 

Related Articles

Back to top button