गुरु गोबिंद सिंग फाउंडेशनच्या वतीने कळवण तालुक्यात वैद्यकीय तपासणी शिबीर

नाशिक : गुरु गोबिंद सिंग फाउंडेशनच्यावतीने (जीजीएसएफ) लोकार्पण करण्यात आलेली अत्याधुनिक सोईंनी सज्ज मोबाइल मेडिकल व्हॅन गरजूंसाठी ग्रामीण भागात कार्यरत आहे. गुरु गोबिंद सिंग फाउंडेशन संचलित गुरु गोबिंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र तसेच अशोका मेडीकव्हरच्या संयुक्त विद्यमाने कळवण तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा येथे विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आरोग्य तपासणी, दंत तपासणी, नेत्र तपासणी करण्यात आली तसेच आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींना आरोग्याची विशेष काळजी यावर मार्गदर्शन करण्यात आले. तब्बल २२४ विद्यार्थिनी, ३१८ विद्यार्थी तसेच ३२ शिक्षक कर्मचारी यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाला कळवणचे प्रकल्प अधिकारी विशाल नरवडे, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. भुजबळ तसेच आश्रम शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांचे या शिबीर आयोजनासाठी मोलाचे सहकार्य लाभले. गुरु गोबिंद सिंग फाउंडेशनतर्फे विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
गुरु गोबिंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम आणि सहा. प्राध्यापक विद्यासागर गवळी, सहा. प्राध्यापिका वृंदा भालेराव, प्रज्ञा बच्छाव यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी करिअर कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी १०वी / १२वी च्या मार्कांचे लक्ष्य साध्य करावे त्यानंतर विविध प्रवेश परीक्षांसाठी स्वतःला तयार करावे. यात यशस्वी होणारा विद्यार्थी नक्कीच त्याचे यशस्वी भविष्य घडवेल असे सांगितले.

महाविद्यालयाचे मुख्य प्रशासक नितीन टावरी, कुलसचिव मनोज कोळी, सहा. प्राध्यापक प्रवीण शिंदे, तन्मय भारंबे, सहायक हेमंत जाधव, संदीप थापेकर तसेच विनोद मासुळे, बबन नागरे, श्रीसंतोष वारूंगसे, अनुज शेख यांसह सर्व कर्मचार्यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
.

