विशेष मुलाखत

विद्यार्थी हिताचे संवर्धन करणारी शिक्षण संस्था­ के.के. वाघ    

प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर

प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर

के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. केशव नामदेव नांदूरकर यांच्याशी ‘गार्गी’च्या पहिल्याच डिजिटल अंकासाठी संवाद साधला असता, डॉ. नांदूरकर यांनी कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या शैक्षणिक व सामाजिक विचारातून कार्यरत असणाऱ्या के. के. वाघ शिक्षण संस्था समुहाच्या अग्रमानांकित अशा शैक्षणिक वाटचालीसंदर्भात सविस्तर भाष्य केले.

शिक्षण संस्थेचा महत्वाचा घटक असणारा प्राचार्य हा विद्यार्थी, पालक आणि संस्था, शिक्षक यांच्यातील महत्वाचा दुवा असतो, ही जबाबदारी कशी निभावता या प्रश्नावर डॉ. नांदूरकर म्हणतात, सुसंवाद आणि समन्वय साधत असताना काही गोष्टी स्वत:हून कराव्या लागतात. संस्था हिताचे धोरणात्मक निर्णय राबवताना सगळ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी लोकशाही पद्धतीने व्यवस्थापनाचे काम चालते. विद्यार्थी हिताच्या कोणत्याच निर्णयात वा अंमलबजावणीत आम्ही तडजोड करीत नाही. विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक मानून विद्यापीठ नियमांची अंमलबजावणी करतो. महाराष्ट्रातून के. के. वाघ शिक्षण संस्थेकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता आमची जबाबदारी निश्चितच वाढते आहे. पारदर्शकतेने आमचे व्यवस्थापन धोरणात्मक निर्णय राबवत असल्याने ही एक सामुहिक जबाबदारी प्रत्येकजण आपलेपणाने आणि प्रामाणिकपणे निभावतो हा इथला एक सकारात्मक परिणाम आहे.


हल्लीची शिक्षण पद्धती आणि विद्यार्थी-पालक यांच्या बदललेल्या अपेक्षा आणि आव्हान याविषी बोलताना डॉ. नांदूरकर म्हणतात की, पूर्वीच्या काळात शिक्षक हाच माहितीचा एकमेव स्त्रोत होता. आताच्या विद्यार्थ्यांसमोर अनेक मार्गाने माहिती मिळवण्याचे पर्याय उभे आहेत. या माहितीच्या महाजालामुळे विद्यार्थ्यांना आता फक्त नोकरीसाठी शिक्षण घ्यायचे नाही, तर स्वत:ची एक स्वतंत्र ओळख तयार करायची आहे. त्यासाठी संशोधनपर अभ्यास करण्याची त्यांची तयारी आहे. माहितीचा वापर कसा करायचा हे आता त्यांना समजावून सांगणे अधिक जबाबदारीचे झाले आहे.  पालकांचीही अपेक्षा जास्त आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा ओढा पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढलेला आहे. त्यानुसार त्यांना अचूक आणि दर्जेदार ज्ञान मिळण्याची अपेक्षा असते. के.के.वाघ शिक्षण संस्थेत जीई मेन्स आणि टॉफेलचे परीक्षा केंद्र उपलब्ध करुन दिल्याने  विद्यार्थ्यांना आता मुंबई-पुण्याला जाण्याची गरज नाही.
भारतीय शिक्षण पद्धतीवर भाष्य करताना डॉ.नांदूरकर सांगतात की, मुळातच भारतीय विद्यार्थ्यांमध्ये उपजतच असणारी गणिताची आवड आणि त्यातील त्यांचे कौशल्य या अभ्यासू वृत्तीमुळे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात रिसर्चसाठी मोठी मागणी आहे. के. के. वाघ संस्थेच्या परदेशांत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही खास त्या ठिकाणी जावून भेटतो. त्यावेळी आमच्या मुलांना तिथे मिळत असणारा सन्मान आणि तिथे ते करत असणारी अभ्यासविषयक प्रगती आमच्यासाठी निश्चितच अभिमानास्पद असते. यातूनच हे स्पष्ट होते की भारतीय शिक्षण व्यवस्था दर्जेदार आहे. मात्र पाठांतरावर, केवळ घोकंपट्टीवर आधारीत असणारी आपली शिक्षण पद्धती काही प्रमाणात तरी बदलणे आवश्यक बनले आहे. असेसमेंटचा निकष फक्त पाठांतर असा न ठरवता विद्यार्थ्यांचे आकलन किती व कसे यावर आधारीत निकष हवेत.


विनाअनुदानित शिक्षण संस्थांच्या अडचणी शासनाने सहानुभूतीने समजावून घ्यायला हव्यात. अनेक शिक्षण संस्था केवळ अनुदान नाही म्हणून विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शुल्कावर अवलंबून असतात. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन, वेतनेतर खर्च, आदी अनेक गोष्टींचे नियोजन खासगी संस्थांना स्वत:च्या पातळीवर करावे लागते. शासनाने अशा गुणवत्ता टिकवून आपले काम करत असणाऱ्या संस्थांना अनुदान आणि वेतनेतर अनुदानाबाबत काही उपाययोजना करता येतील का याचा विचार करावा. जेणेकरुन  दर्जेदार शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत आश्वासकपणे पोहोचू शकेल.
शिक्षण पद्धतीतील नवे आव्हान काय असेल यावर बोलताना डॉ. नांदूरकर म्हणतात की, सर्वच खासगी शिक्षण संस्थांना आजवर त्यांच्या वारसाने वा घराण्याच्या नावलौकिकतेने विद्यार्थ्यांची पसंती मिळत होती. मात्र आता युजीसी व टेक्निकल बोर्डाच्या बदलत्या नियमामुळे प्रत्येक संस्थेला आपला लौकिक हा गुणवत्तेवरच टिकवावा लागणार आहे. त्यामुळे जर संस्थेने गुणवत्ता टिकवली तरच विद्यार्थी व पालक संस्थेकडे येणार आहेत व टिकणार आहेत. गुणवत्ता देण्यात कमी पडलात तर तुमच्या नावलौकिकाला फारसे महत्व राहणार नाही.
संस्थापक कर्मवीर काकासाहेब वाघ, दिवंगत बाळासाहेब वाघ यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार संस्थेचे कार्य सुरु आहे. असे सांगताना डॉ. नांदूरकर म्हणाले की, आधीच्या अध्यक्षांनी सर्वसामान्यांना उच्च शिक्षणाची संधी या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. विद्यमान अध्यक्ष समीर वाघ यांनीही आपल्या वडिलांच्या शैक्षणिक व सामाजिक विचारांचा आदर्श जोपासला आहे. विद्यार्थी हिताला प्राधान्य देताना सर्व प्रकारच्या शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी संस्थेच्या माध्यमातून केली जाते.  महाराष्ट्रातील एक अग्रमानांकीत शिक्षण संस्था हा नावलौकीक गुणवत्तेच्या आधारावर ओळखला जावा याकरीता संस्थेचा प्रत्येक घटक कार्यरत आहे.


के. के. वाघ ही संस्था नुकतीच स्वायत्त झाल्याने आता जबाबदारी आणि आव्हान वाढले आहे. के. के. वाघ शिक्षण संस्थेचा विद्यार्थी इथून पदवी घेवून बाहेर पडताना त्याचा सर्वांगिण विकास करण्यासोबतच आंतररराष्ट्रीय स्पर्धेत तो टिकून राहील यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असेही डॉ. नांदूरकर यांनी ‘गार्गी’शी बोलताना सांगितले.

Back to top button