थोडसं मनातलं

व्यापक संवादाचे ‘इनोव्हेटीव्ह’ माध्यम

संपादकीय : - अ‍ॅड. योगिनी विजय बाबर

‘इट इज व्हेरी इझी टू रिच ऑन द टॉप, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिमेन ऑन द टॉप’ हा मंत्र प्रत्यक्ष जगताना प्रत्येकाचीच दमछाक होते. भाकरी फिरवली नाही तर ती करपते आणि साचेबद्धता सोडून काळानुरुप बदल केले नाही तर काळ आपल्याला मागे सारतो. २०१४ नंतर एका तीव्र वेगाने सामोरे आलेल्या डिजिटल युगाने हाच तर मंत्र अवघ्या जगाला दिला आहे. ‘आर्कुट’चे सोबती आणि ‘वाय टू के’चा बदल आश्वासकपणे आत्मसात करणाऱ्या माझ्यासारख्या पिढीची कदाचित थोडी कमी दमछाक झाली, पण सोशल मिडीयासारखे एक प्रभावी माध्यम अवघ्या एका क्लिकवर जगाला सामावून घेत असल्याचे सत्य पचनी पडायला सर्वांनाच त्रास झाला हे वास्तव नाकारता येत नाही. संवादाचे एक कल्पक आणि सळसळत्या उत्साहाचं, जल्लोषी मनाचं एक माध्यम म्हणून ‘गार्गी’ची सुरुवात २०१० मध्ये झाली. पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव आणि हितचिंतक यांच्या बळावर आजवरच्या ‘गार्गी’च्या दिवाळी अंकासह नियमित अंकाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद आणि प्रेम लाभले. कोरोना काळात याची छपाई थांबवावी लागली होती. याच काळात ‘गार्गी’ची डिजिटल आवृत्ती सुरु करण्याचे निश्चित झाले. आधी आम्ही ‘डीजी २४’ या ऑनलाईन न्यूजच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचलो आणि आमचा आत्मविश्वास थोडा दुणावला. ‘गार्गी’ची डिजीटल आवृत्ती अर्थात वेब चॅनेल सुरु करताना फक्त नाशिकचा नाही तर जगभरातला मराठी वाचक, जो नेट सॅव्ही आहे ज्याला सहज काही वेगळे वाचायचे आहे पण पुस्तक घेवून बसण्याइतपत वेळ नाही… प्रवासात, कार्यालयातल्या मधल्या वेळेत किंवा अगदी आवर्जून वाचावे असे दैनंदिन बातम्यांपेक्षा वाचकांना वेगळं काय देता येईल याचा थोडासा आढावा घेतानाच सामाजिक भान जपत अक्षरतत्वांचा हा लेखन प्रपंच वेब चॅनेलच्या माध्यमातून अव्याहतपणे सुरु ठेवण्याचा आम्ही निश्चय केला.
समाजात अनेक चांगल्या गोष्टी जपण्याचं, मातीचा, नात्याचा ओलावा टिकवून ठेवण्याचं काम अनेक मंडळी, संस्था अविरतपणे करीत असतात. ‘हातांनी जे पेरावं तेच उगवून हाती पडतं ॥ श्रमणाºया हातांनीच जीवनाला वैभव चढतं ॥’ हे ब्रीद प्रत्येकानेच अनुभवण्याजोगे आहे.
‘गार्गी’ एक नातं आहे… तुमच्या आमच्यातील संवादाचं, उमेदीचं…! अनन्या क्रिएशन्स आणि ‘सलाम नमस्ते’च्या वतीने प्रसिद्ध होणाºया ‘गार्गी’ या डिजीटल इनोव्हेटीव्ह संवाद माध्यमातून आपल्यातील सुसंवाद प्रवाही ठेवूयात. प्रश्न समाजातल्या प्रत्येक घटकापुढे आहेतच… जो तो आपले प्रश्न आपल्यापरीने सोडवण्याचा आणि त्यातून बाहेर पडण्याचा कसोशीने प्रयत्न करतोच. गरज असते, ती फक्त पाठीवरती दिलाशाचा हात आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत हे आपलेपणाने सांगणाऱ्यांची…! ‘गार्गी’च्या माध्यमातून हाच दुवा सांधण्याचा आणि आपल्यातील नाते फक्त वाचक, लेखक, प्रकाशक असे न ठेवता ते आपुलकीचे, सन्मानाचे, कल्पकतेचे आणि माणुसकीच्या भिंती बांधणारे असावे, यासाठीच आमचा प्रयत्न असेल. शेवटी जो चोच देतो तो दाणाही देतोच… दरवर्षी न चुकता विठ्ठल नामात तल्लीन होत ‘भेटी लागी जीवा’च्या ओढीने पंढरीच्या वारीत सहभागी होणारे वारकरी, त्यांचा उत्साह, पांडुरंगाच्या भेटीची अपार ओढ या सोबतीनेच सतत आपल्याला काही ना काही शिकवत राहणारा निसर्ग हेच तर ‘गार्गी’चे प्रेरणास्त्रोत आहेत. जे अखंड आणि अमर्याद आहेत… उचित संस्कार आणि शिकवण या मूल्यांची जपणूक करताना तीव्र स्पर्धेच्या कठीण काळात तग धरणे, नव्याने काही सुरु करणे तसे धाडसाचेच, पण आमच्या या डिजिटल प्रयोगासाठी आमच्या हितचिंतकांनी दिलेले आर्थिक पाठबळ आमच्यासाठी लाखमोलाचे होते. भविष्यातील प्रवासातही वाचकांच्या बरोबरीने सहकाऱ्यांची साथ लाभेल ही इच्छा आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद, पाठबळावरच ‘गार्गी’ची ही अक्षरयात्रा अक्षय्य ठरावी ही प्रार्थना… डिजिटली व्यापक संवादाचे हे इनोव्हेटीव्ह माध्यम आमच्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांना अधिक भावेल, असा विश्वास वाटतो.

Related Articles

Back to top button