कोवळ्या मनांना जपताना

आव्हान ‘पिअर प्रेशर’चे !

- डॉ. शैलेष उमाटे

डॉ. शैलेष उमाटे

जागतिक आरोग्य संघटनेच्या सुत्रानुसार किशोर वय म्हणजे १३ ते १९ वयोगट. अल्लड, बेफिकीर मजेत जगण्याचे स्वप्न उराशी बाळगून झोपणारे वय. पण सामाजिक बांधिलकीतून उष:कालात काय आव्हाने ठेवली आहेत याचा काही लवलेशही नसणारा काळ. त्यातच शरीरातील हार्मोनल बदल घडत असतात. मग पंख फुटल्याची जाणीव होते. उंच भरारी मारण्याची तीव्र इच्छाही होते, पण त्याची ताकदच नाही ही जाण नसते.

पंख फुटल्याची जाणीव शारीरिक हार्मोनल बदलामुळे होते. पण त्या बदलांचा योग्य वापर करावा इतका मेंदू परिपक्व झालेला नसतो. म्हणूनच या वयात पालक ‘कंट्रोलींग’ वाटतात. त्यांचे सल्ले त्रासदायक वाटतात. पण आपल्याच प्रमाणे अपरिपक्व असणारा मित्र मात्र जवळचा वाटतो. दोघेही भविष्याचा उलगडा करण्यास असमर्थ असतात.
हार्मोनल बदलामुळे, चिडचिडेपणा, अशांती होवून पालकांशी वादविवाद होतात. एरिक एरिक्सन या सायकॉलॉजिस्टच्या मते ही मुले ‘सायकोसोशल मोरॅटोरीयम’  या वाढीच्या स्टेजमधून जात असतात. इथे त्यांना त्यांचे ‘स्व’ निर्माण करायचा असतो. जे पालक मुलांना स्वातंत्र्य देत नाहीत तिथे मुलांमध्ये गोंधळ निर्माण होतो व ते संभ्रमावस्थेत राहतात. या अवस्थेत पालकांनी मुलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे, पण मूल योग्य मार्गावर आहे की नाही यावर कटाक्षाने नजर ठेवली पाहिजे.


पीयर प्रेशर (मित्र परिवारामुळे येणारा स्पर्धात्मक ताण) मुळे मुले व्यसन किंवा शारीरिक वा शैक्षणिक नुकसान होईल असे वागतात. त्या वेळेस त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. मार्गदर्शन व ‘स्व’च अस्तित्व निर्माण झालेली मुले जबाबदारी, बांधिलकी आणि स्वीकृती या सद्वर्तनाने निष्ठावान बनतात.
‘स्व’च्या निर्मितीच्या आव्हानाबरोबरच अजुन बरीच आव्हाने या वयात येत असतातच. त्यांना समजण्यासाठी,, आपणास त्यांची व्याप्ती किती आहे हे समजण्याची गरज आहे.
१. शारीरिक बदल
२. मानसिक व भावनिक बदल
३. व्यसन
४. शारीरिक व मानसिक आजार
५. डेटिंग, रिलेशनशिप व लैंगिक आव्हाने

ही जरी त्रासदायक असली तरीही मला असे वाटते की डिजिटल नेटीव्ह (‘वायटूके प्रॉब्लेम’संपल्यावर जन्मलेला) किशोरांसमोर समाज माध्यमांची चॅलेंजस  आहेतच. मुळातच हा किशोर अस्थिर आहे. त्यात त्याची एकाग्रता भंग करणारी टीव्ही, मोबाईल आहेतच. युनिसेफनुसार, ८८.२ टक्के मुले आणि ७१.५ मुली मास मीडियाचा वापर करतात. यात जागतिकीकरणाची भर पाडून सर्वांना एकत्र आणले आहे. मग क्रॉस कल्चरल गोष्टींची सहज देवाणघेवाण होते.
किशोरांना एक दुसऱ्याची सहजच ओढ जाणवते. जिज्ञासा निर्माण करणाºया शारीरिक आकर्षणाची प्रयोग करण्याची संधी सहज उपलब्ध असते. त्यात त्यांचे जिज्ञासापोटी लैंगिक संबंध येवू शकतात. २.७ टक्के मुले व ८ टक्के मुली, वयाच्या १५ वर्षा अगोदरच शारीरिक संबंध करतात. या संबंधात दीर्घकालीन स्थिरतेचा विचारच नसतो. खरे तर हे संबंध आनंद मिळवणाच्या भ्रमात केलेला असतो, पण तो किशोरांच्या अधीरतेचे प्रतीक असते. कारण आनंदाचा आस्वाद देणारी ब्रेनमधील ‘हॉयपोथॅलामस’ नावाच्या भागाची परिपक्वता वयाच्या २४ व्या वर्षी येते. म्हणून मी कोणतीही गोष्ट प्रयोग (व्यसन किंवा सेक्स) करण्यास ही किमान वयोमर्यादा सांगत असतो.
दुसरे, व्यसनाधीनता ही किशोरवयीन मुलांसमोरील अत्यंत भयानक आव्हान आहे. जागतिक घडामोडीमुळे पार्टी कल्चर वाढत चाललेले आहे. त्यात व्यसनांना सामाजिक मान्यता मिळत आहे. व्यसन हे घातक असण्यापेक्षा मजेशीर आहे असा भ्रम या किशोरवयीन मुलांचा होतो.
वयाच्या १५ वर्षाच्या अगोदरच वीड किंवा मॅरिहूना हे व्यसन ११ टक्के किशोर वयीन मुलांत आढळते. या वयात हे व्यसन केल्याने त्यांना स्किझोफ्रेनियासारखे गंभीर मानसिक आजार होवू शकतात. १२ ते १३ वयोगटात तंबाखू वा मदिरा या व्यसनातही अडकतात. त्यांचे नंतर हानिकारक परिणाम ते कोवळ्या वयातच भोगतात. पियर प्रेशरमुळे हे व्यसन वाढीस लागते. अशा मित्रांपासून स्वत:ला जोपासण्याचे आव्हान त्या मनाला पेलणारा नसतो. अशावेळी मोठ्यांची मदत घेणे गरजेचे असते. कुतूहल म्हणूनही सुरुवात झालेला एक घोट, केव्हा व्यसनात रुपांतरण होते हे कळतच नाही. किशोरवयीन सुरू झालेले व्यसन ट्रीटमेंट करण्यास देखील कठीण असते.
सहज सुरुवात, माफक उपलब्धता, किशोर वयातील बेफिकिरी हे व्यसन समाजात फोफावण्यास मदत झाली आहे. यामुळे देशाची आर्थिक स्थितीही डबघाईस येवू शकते.


कॉम्पलिकेशन जास्त, उपचारासाठी अवघड, तीव्रता जास्त असल्याने या व्यसनापासून मुक्तीचे प्रतिबंधक उपायच महत्त्वपूर्ण ठरतात. म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला व्यसनाबाबत बोलणे महत्त्वपूर्ण ठरते. आपले मूल व्यसन करूच शकत नाही या भ्रमात पालकांनी राहू नये. कारण भारतातील एका सर्वेक्षणात ९ वीतील ५० टक्के मुलांनी एक ना दुसºया व्यसनी पदार्थाची चव चाखली आहे.
तिसरे, महत्वाचे म्हणजे या पिढीतील मोबाईल आणि कॉम्प्युटरचे वाढते वापर. ते खूपच जास्त आहे. भारतातील २२ टक्के जनसंख्या ही किशोर वयाची आहे. त्यात १० पैकी एकाला मोबाईल/ इंटरनेट किंवा टेक्नोलॉजीचे व्यसन आहे. वयाच्या ५ वर्षाआधीच या टेक्नोलॉजीची जवळीक या मुलांत होते. मोबाईलचे व्यसन हे सर्वात जास्त  प्रमाणात असते. त्या नंतर गेमिंगचे व्यसन हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. या व्यसनामुळे मुलांची शालेय अधोगती होते. अभ्यासात लक्ष लागत नाही. वागण्यात चिडचिडेपणा, उध्दटपणा येतो. त्यांत त्यांची पालकांबरोबर संघर्ष / वादविवाद होतात. ही मुले बिघडण्याची परफेक्ट रेसिपी आहे.
मोबाइल अ‍ॅडीक्शनमुळे मुलांना झोप अपुरी राहते. शारीरिक हालचाली मंदावल्यामुळे लठ्ठपणा, डायबिटीजसारखे आजार होवू शकतात. या मुलांत डिप्रेशन,  चिंतेचे आजार आणि इतर व्यसन बळावतात. अशा सर्व आव्हानांना किशोरांना तोंड देण्यास बºयाच अडचणी येतात. सहज उपलब्धता, पियर प्रेशर, स्वयं नियमनाचा अभाव आणि अनुभव घ्यायची घाई या गोष्टींमुळे ते व्यसनास, लैंगिक संबंधास बळी पडतात.
या सर्व गोष्टींबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे हेच पालक व समाजाचे ध्येय असले पाहिजे. पालकांनी व्यसन तसेच लैंगिक शिक्षण यावर पाल्याशी संवाद साधले पाहिजे. पालकांना हे जमत नसेल तर डॉक्टरांची मदत घ्यायला पाहिजे. प्रत्येक शाळेत लैंगिक तसेच व्यसन यावर सर्वांचेच सार्वजनिक मार्गदर्शन व्हायला पाहिजे. शासनाने, याची दखल शालेय शिक्षणात करणे काळाची गरज आहे.

Back to top button