Uncategorizedनांदतो देव हा आपुल्या अंतरी

उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा

- ह.भ.प. अर्जुन महाराज जाधव

तुकाराम महाराज यांच्या वचनाला अनुसरून प्रबोधनाच्या वाटा उजळणारा वारकरी म्हणून ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे. कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून ते समाजातील विविध प्रश्नांबाबत जनजागृती करीत आहेत. शेतकºयांनी आत्महत्या करू नयेत म्हणून त्यांचे मनोबल वाढविणे, स्री भ्रूण हत्येविरोधात जनजागरण, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण रक्षण, जलसंधारण याबाबत ते कीर्तनातून प्रबोधन करीत आहेत.

महाराष्ट्राला वारकरी संतांची आणि त्यांच्या प्रबोधनाची फार मोठी परंपरा आहे. तत्कालीन सामाजिक प्रश्नांबाबत संतांनी मांडलेले विचार आजही तितकेच टवटवीत आहेत. याच संत विचारांची कालसुसंगत मांडणी करून शामसुंदर महाराज सोन्नर विविध प्रश्नांबाबत जनजागृती करतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही महाराष्ट्रातील फार मोठी समस्या आहे. दिवसेंदिवस ती अधिक गंभीर रूप धारण करीत आहे. विशेषत: दुष्काळाची परिस्थिती असते तेव्हा आत्महत्येचे प्रमाण वढते. २०१५-१६ साली हे प्रमाण वाढले तेव्हा शामसुंदर महाराज सोन्नर यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कीर्तनातून दिलासा देऊन आत्महत्या करू नये यासाठी प्रबोधन केले होते. तेव्हापासून ते दर एप्रिल-मे  महिन्यात दुष्काळग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देतात. तुकाराम महाराज यांच्या काळातही दुष्काळ पडला होता. पण त्यांनी त्या दुष्काळाला घाबरून पळ काढला नाही. उलट-

बरे झाले देवा निघाले दिवाळे
बरी या दुष्काळे पिढा केली…

असे म्हणत या दुष्काळाचा सामना केला होता. आपण बहुतेक शेतकरी वारकरी आहेत, तुकाराम महाराज यांच्या विचाराचे पाईक आहोत. तुकाराम महाराज यांनी जर दुष्काळाचा खंबीरपणे मुकाबला केला असेल तर आपणही या दुष्काळाला धैर्याने सामोरे गेले पाहिजे, असे सांगत शामसुंदर महाराज शेतकऱ्यांचे मनोबल वाढवतात.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येला दुष्काळ कारण ठरत असला तरी पर्यावरणाचा ऱ्हास आणि जलसंधारणाबाबत आनास्था हे दुष्काळाचे कारण आहे. म्हणूनच दुष्काळ निवारणासाठी पर्यावरण रक्षण आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याचे काम शामसुंदर महाराज करतात. केवळ प्रबोधन करून ते थांबत नाहीत तर स्वत: कृती करतात. रात्री कीर्तन आणि सकाळी जलसंधारणासाठी सुरू असलेल्या श्रमदानाच्या कामावर ते स्वत: श्रमदान करतात. तिथेही लोकांशी संवाद साधून जलसंधारणाचे महत्व पटवून देतात. त्यांनी दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या दुरावस्थेवर कवितेतूनही प्रहार केला आहे. त्यांच्या काही कवितांचे आमदारांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात वाचनही केले आहे.

महाराष्ट्रात स्री भ्रूण हत्येच्या घटना वाढल्या तेव्हा त्यांनी स्री भ्रूण हत्येच्या विरोधात जागर दिंडी काढली होती. ‘स्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास’ या संत जनाबाईंच्या अभंगावर त्यांनी आणि त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी यांनी कीर्तनातून प्रबोधन केले होते. त्याच प्रमाणे एखादा गुन्हा करून तुरुंगात गेलेल्या कैद्याने पुन्हा मोठा गुन्हेगार न होता स्वत:ला सुधारावे यासाठी त्यांनी-

आता तरी पुढे हाचि उपदेश
नका करू नाश आयुष्याचा

या अभंगावर मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कीर्तन केले होते. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न ते प्रत्येक कीर्तनातून करीत असतात.

समाज प्रबोधनकार म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या शामसुंदर महाराज सोन्नर यांचा जीवन प्रवासही तितकाच खडतर आहे. बीड जिह्यातील, परळी वैजनाथ तालुक्यातील  वडखेलसारख्या अत्यंत मागासलेल्या गावात त्यांचा जन्म  झाला. गावात चौथीपर्यंतची शाळा होती. इतके मागासलेले ते खेडे. तथापि अशा मागासलेल्या ठिकाणी जन्म होऊनही या सामान्य कुटुंबातील युवकाला कळायला लागल्यापासूनच आपण लेखक व्हावे असे वाटत होते. आज ते पत्रकार-लेखक झालेले आहेत. ते काही अपघाताने किंवा चुकूनमाकून नाही तर एक ध्येय ठरवून वाटचाल करीत राहिले.

विठ्ठलाची भक्त असणारी त्यांची आजी तुळसाबाई यांच्यामुळे शामसुंदर यांची संत साहित्याशी ओळख झाली. दोन वर्षांच्या शामसुंदर यांना मारुतीच्या पारावर चालणाºया धार्मिक ग्रंथांच्या पारायणासाठी आजी घेऊन जात असे. त्यामुळे त्या ग्रंथाचे निरूपण, मांडणी, कथानक हे आपोआप मनावर बिंबत गेले. रामायण, महाभारत, हरिविजय, पांडवप्रताप, शिवलीलामृत, नवनाथ, ज्ञानेश्वरी या धार्मिक ग्रंथाबरोबरच तुकाराम, नामदेव आदी संतांचे अभंग वाचणे, त्यावरील कीर्तन ऐकणे आणि निरुपण समजून घेणे हा छंद बालवयातच त्यांना जडला. चौथीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असताना किसनराव महामुनी हे धार्मिक शिक्षक त्यांना भेटले. तेही रोज मारुतीच्या पारावर चालणाऱ्या पारायणासाठी येत असत. शामसुंदर यांच्यातील धिटाई आणि समज पाहून त्यांनी अनेक वेळा एखाद्या ग्रंथातील एखाद्या अध्यायाच्या ओव्यांच्या निरुपणाची संधी त्यांना दिली. त्याअगोदर गावातील सर्व धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करणारे शंकरराव बोडके ऊर्फ मास्तरसाहेब यांनी तर त्यांना धार्मिक ग्रंथातील आशय समजावून त्याच्या विवरणाचे बाळकडू दिले. पुढे पाचवीनंतरचं शिक्षण वडखेलपासून सुमारे ७ कि.मी. असणाऱ्या पिंपळगाव या गावी झाले. तेथेही मुख्याध्यापक तात्याराव राडकर, शिक्षक विष्णू  दसवंते, सुग्रीव राख, नानवटे, फुटके, कुलकर्णी,  घोडके आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तेथे शिकत असताना वार्षिक स्नेहसंमेलनात बसविल्या जाणाऱ्या एकांकिका यात भाग घेणे, कविता सादर करणे यामुळे नकळत लेखक बनण्याची ऊर्मी त्यांच्यात अधिक दृढ होत गेली.

पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणाची व्यवस्था जवळ नव्हती. १५ किलोमीटरवर असणाºया परळी वैजनाथ येथे पाठविण्याची वडिलांची तयारी नव्हती. शामसुंदर यांना तर पुढे शिकण्याची खूप इच्छा होती. त्यातून घरात तणाव निर्माण झाला आणि त्यातूनच त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. शामसुंदर गाव सोडून मुंबईला आले. कुणाचाही आसरा नाही, कोणत्याही रस्त्याची माहिती नाही, काम मिळेल की नाही याची शाश्वती नाही, अशा अवस्थेत आजोबा बळीराम सोन्नर यांच्याकडून घेतलेले १०० रुपये घेऊन त्यांनी महामुंबईचा रस्ता धरला होता. त्यातले ६५ रुपये गाडीभाड्यात खर्च झाले होते आणि उरलेल्या ३५ रुपयांत काय करावे, असा प्रश्न डोळ्यासमोर उभा असताना मुंबईतील गोल देऊळ नाक्यावर मजुरीचे काम मिळते असे त्यांना गावीच कुणीतरी सांगितले होते. त्यांच्या गावचे काही लोक तेथे कामही करत होते. म्हणून मुंबई सेंट्रल बस स्थानकात उतरल्यानंतर विचाराच्या तंद्रीत त्यांनी गोल देऊळ नाका गाठला. तेथे त्यांच्या गावचे नामदेव बोºहाडे यांच्याशी त्यांची भेट झाली. ते एका बांधकाम व्यावसायिकाकडे मुकादम म्हणून काम पाहात होते. शामसुंदर यांनी त्यांना काम देण्याची विनंती केली. बोºहाडे यांनी समजूत घालून शामसुंदर यांना  गावी पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र शामसुंदर आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर बोºहाडे यांनी त्यांना एका बांधकामाच्या साईटवर पाठविले. मजुरीचे काम करण्याची सवय नव्हती. गावाकडच्या माळरानावर हुंदडायचे, मौजमजा करायची, विटी-दांडू खेळायचे जे वय होते त्याच वयात वाळूची गोणी डोक्यावर घेऊन इमारतीचे मजले चढताना त्यांचे पाय लटपटायला लागले. पायात गोळे आल्यावर ते क्षणभर थांबत, पण पुन्हा मन घट्ट करून तितक्याच ताकदीने आपल्या इवल्याशा हाताने वाळूची गोणी पकडून ते पायऱ्या चढत. खाडीतील त्या ओल्या वाळूतून खारे पाणी ओघळत होते, पाच-सहा मजले चढताना अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. रेतीच्या खाऱ्या पाण्यात घामाचे खारे पाणी मिसळे, काम करण्याची सवय नसल्यामुळे ते सर्व खूप जड जाऊ लागले. तेव्हा डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वाळूतील खारे पाणी, घामाचे खारे पाणी आणि डोळ्यातील अश्रुंचे खारे पाणी असा तिन्ही खा-या पाण्याचा संगम झाला आणि त्याचवेळी त्यांनी निश्चय केला की आता काही झाले तरी माघार घ्यायची नाही.

इमारत दुरुस्तीची कामे वेगवेगळ्या ठिकाणी करीत असतानाच ‘शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांच्या इमारत दुरुस्तीचे काम करणाºया कंत्राटदाराकडे त्यांना  काम मिळाले. ते काम म्हणजे जीवनाच्या खडतर मार्गावरील एक यशस्वी वळणच ठरले. ती घटनाही मोठी विलक्षण आहे.

वाबळे यांच्या बिल्डिंगच्या कामावरील तो पहिलाच दिवस होता. बाबा नुकतेच आंघोळ करून खड्या आवाजात व्यंकटेश स्तोत्र म्हणत होते. शामसुंदर यांनी सिमेंटची गोणी उभ्यानेच रेतीच्या ढिगावर टाकली. त्या आवाजाचे वाबळे बाबा यांचे मन विचलित झाले आणि पुढची ओवीच आठवेना. तेव्हा शामसुंदर यांनी ती ओवी म्हणून दाखविली.

ती ओवी होती-

द्रोपदीची वस्त्रे अनंता।
देत होता असे भाग्यवंता।
आम्हालागी कृपनता।
कोठुनी आणिली गोविंदा।

बाबांची पूजा आटोपली तेव्हा त्यांनी शामसुंदर यांना आपल्या खड्या आवाजात हाक मारली. ए पोरा इकडं ये रे. काय नाव काय तुझं? बाबांची भेदक नजर आणि करड्या आवाजात एक जरब होती. शामसुंदर जवळ येताच बाबांनी आपल्याजवळ खुर्चीवर बसायला सांगितले. घरची, शिक्षणाची चौकशी केली. शिक्षणाची आवड असताना ते घेता आले नाही, म्हणून हा मुलगा हे काम करीत असल्याचे पाहून बाबांनी शामसुंदर यांना आपल्या शिवनेर दैनिकात काम करण्याचा प्रस्ताव दिला आणि दुसऱ्या दिवसापासून ते दैनिक ‘शिवनेर’मध्ये दाखल झाले. शिशाची जुळवलेली अक्षरे आणि त्याची तयार झालेली वर्तमानपत्राची पाने घेऊन दुसºया प्रेसमध्ये घेऊन जाण्याचे काम सुरूवातीला त्यांना मिळाले. मुळातच शिकण्याची आणि काहीतरी करण्याची जिद्द असल्यामुळे कंपोझिटरच्या बाजूला उभे राहून हे कसे कंपोझ करतात याचे निरीक्षण ते करू लागले. त्याचा कॅटलॉग पाठ करू लागले. त्यावेळचे शिवनेरचे फोरमन दिनकरराव झारापकर यांना त्यांनी कंपोझिंग शिकवण्याची विनंती केली. त्यांनीही ते कबूल केले आणि एका महिन्यातच ते कंपोझिटर झाले. बातम्या, लेख कंपोझ करताना मुळातील त्यांची लेखक, कवी प्रवृत्ती जागी व्हायची आणि अधिक चिकित्सक पद्धतीने ते वाचायचे. त्यातूनच वाचकांची पत्रे लिहायला लागले. पुढे काही बातम्याही लिहायला लागले. थोड्या दिवसांत साधलेली प्रगती शिवनेरचे संपादक विश्वनाथराव वाबळे व कार्यकारी संपादक नरेंद्र वाबळे यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यानंतर त्यांनी काही सदर-लेखनाची संधी दिली

याच दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी  ‘सामना’ या वर्तमानपत्राच्या निर्मितीची जुळवाजुळव सुरू केली होती. वेगवेगळ्या विभागांत कर्मचारी भरण्याचे काम सुरू होते. शामसुंदर यांनी वाबळे बाबांची परवानगी घेऊन ‘सामना’साठी मुलाखत दिली आणि ते ‘सामना’त रुजू झाले. तब्बल १७ वर्षे ‘सामना’त त्यांनी विविध पदांवर काम केले. याच काळात गुन्हेगारी विषयाला वाहिलेल्या पोलीस टाइम्स, पोलीस वाणी, श्री या साप्ताहिकांतून लेखन केले. पुढे ई टीव्ही या वृत्त वाहिनीवरील ‘क्राईम डायरी’ सत्य घटनेवर आधारित मालिकेचे लेखनही त्यांनी केले. त्यानंतर ‘लोकमत’मध्ये काही काळ क्राईम रिपोर्टींग केल्यानंतर पुढे १० वर्षे दैनिक ‘प्रहार’मध्ये राजकीय पत्रकारिता केली.

उजळावया आलो वाटा, वारकरी, पालखी, हे त्यांचे आध्यात्मिक ग्रंथ प्रकाशित आहेत. ‘योद्धा’ गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावरील पुस्तकही खूप गाजले. पत्रकार, कवी, व्याख्याते, कीर्तनकार, प्रवचनकार अशा विविध भूमिकेत काम केले तरी त्यांच्या कार्याचा मूळ गाभा समाजातील अपप्रवृत्ती विरोधातील प्रबोधन हाच आहे. त्यांच्या प्रबोधनाचा सन्मान म्हणून अनेक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

Related Articles

Back to top button