
कार्टुन्सपासून ते फॅमिली कट्ट्यावरच्या मालिकांपर्यत कथानक हरवत चालले आहे… कोणाला झाकावं, कोणाला उघडावं.. कोणाला नाकारावं अन कोणाला स्विकारावं… असे अनेक प्रश्न पालकांना भेडसावत आहेत. कार्टुन्समधील निरागसता हरवली आहे, तर मालिकांमधील चंगळवाद, अनैतिकता, पैसा कमावण्यासाठी वाट्टेल ते करणारी कुटुंब अशा विसकटलेल्या कथानकांत भरकटलेल्या मालिकांचे विश्व पाहता पाल्यांनी मनोरंजनासाठी नेमका कशाचा स्विकार करावा? असा यक्ष प्रश्न पालकांना भेडसावतो आहे… मालिकांच्या अतर्क्य दुनियेत स्वत:ला शोधणाऱ्या किशोरवयीनांसमोर आता नकोत नुसत्या मालिका… हवा थोडा डोक्याला खुराक.. मनोरंजनासमवेतच… थोडा ज्ञानाचाही दिलासा.. असे म्हणण्याची वेळ आली आहे. मालिकांच्या या विश्वावर भाष्य करतानाच पालकांना सजग करण्याचा हा थोडासा प्रयत्न….
प्रसंग क्र. 1
‘डॉक्टर, हल्ली मिनू अजिबात ऐकत नाही… सातवीपर्यंत तिला 80 टक्के मार्कस मिळायचे. हिच्या सातवीनंतर आम्ही नवीन घरांत शिफ्ट झालो. तिथून मला रोज दोन तीन तास तरी आमच्या जुन्या घरी सासूबाईंसाठी जावे लागते. मिूनचे हेलपाटे होवू नयेत, म्हणून मी तिला घरीच ठेवत होते. तिला कंटाळा यायला नको, आणि उगाच शेजाऱ्यांच्या घरांत तिने जायला नको, म्हणून आम्ही तिच्यासाठी डिश बसवली… ती बसते मग निवांत कार्टुन बघत’, मिूनच्या आई मोठ्या कौतुकाने सांगत होत्या. डॉकटर म्हणाले, ‘मग आता काय अडचण आहे..?’ मिनूच्या आई रडवेल्या होत म्हणााल्या, ‘डॉक्टर, हल्ली ती घरात कोणाचेच ऐकत नाही, मिसळत नाही, तीला सतत टिव्ही बघायचा असतो. फक्त कार्टुन्स नाही तर मराठी हिंदी सर्वप्रकारच्या मालिका संध्याकाळी सात वाजल्यापसून ते रात्री 12 वाजले तरी संपत नाहीत, अगदी सावधान इंडीया आणि क्राईम पेट्रोलही ती पाहतेच, तिचे मार्क कमी झालेत. शिक्षकाच्या तक्रारी सुरु झाल्यात, इतकचं काय पण सतत मालिकांच्या विश्वात दंग असणााऱ्या मिूनच्या मैत्रीणीही आता तिच्यापसून लांब जात आहेत… आम्हांला तीची काळजी वाटते, म्हणून आम्ही आठवडाभर डीश बंद ठेवली.. पण मग मिून शेजारच्या घरी बसून राहु लागली… हे सगळ आता असह्य झालयं, शाळेच्या बाईंनी तुमचा संदर्भ दिला आणि मी हिला घेवून इथे आलं…’
प्रसंग क्र. 2
‘तुझं खरं प्रेम कोणावर आहे? ते तु चार दिवसांत नाही सांगितलस तर मी त्या सोनमसरखे वीष प्राशन करेन, मग सगळ्या शाळेत आणि घरीही तुझी बदनामी होईल, बघ काय करतोस ते…’
प्रसंग क्र.3
कोल्हापूर जिल्हयातील छोटेसे गाव… गावातल्या दोन सख्ख्या मैत्रीणी… दोघींचाही जीव जडला तो गावातल्याच एका तरुणावर… मात्र याची त्याला कल्पना नाही… तीघेही मित्र, परिचित कुटुंबातील… मग तो कोणा एकीचा असला पाहिजे याकरता या दोघींनी शक्कल लढवत स्टार प्रवाहवरील दुहेरी या मालिकेचे कथानक, प्रेमाचा त्रिकोण समोर ठेवला आणि दोघींनी चक्क वीषप्राशन करीत, जी जिवंत राहिलं तीचेच प्रेम खरे… अशी पैज लावली.. वीष प्यायल्यानंतर उपचाराचे सोपस्कर झाले… जिने आधी वीष घेतले होते.. तीचे प्रेम खोटे ठरले.. ती देवाघरी गेली… आणि जीला वाटले की, आपले प्रेम खरे म्हणून आपण जिवंत आहोत… ‘तिला आपण बहिणीसारखे मानतो.. बाकी काही नाही.. ’असे प्रेमवीराकडून उत्तर मिळाले… झाल्या प्रकाराने सारा गाव अवाक झालाय तर आपण आपल्या मुलीवर संस्कार करण्यात कमी पडलो म्हणजे काय चुकलो? याची अजूनही मृत प्रेमिकेच्या आई वडीलांना टोटल लागत नाही…
वाचकहो, वर उल्लेखलेल्या सर्व सत्य घटना आहेत बरं का.. आपल्या आसपास अशा अनेक घटना घडत असतात. मात्र एखादा अपघात, दुर्देैवी घटना आपल्या वा आपल्या परिवारासोबत घडत नाही, त्याची झळ, त्याचे परिणाम आपल्याला सोसावे लागत नाही. तोपर्यंत आपण काठावर बसून पोहणारा कसा चुकला हे सांगणारे शब्दवीर असतो. सध्या काहीसे असेच वातावरण मालिकांच्या ढासळत्या दर्जामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात दिसते आहे. ज्या पालकांना आपली मुले मालिका, कार्टुन्समुळे बिघडत आहेत, आजारी पडत आहेत हे सहन करावे लागते, त्यांचे दु:ख इतरांना सहजपणे कळणार नाही.
टि.व्ही पाहणे चांगले की वाईट या प्रश्नांत अडकण्यापेक्षा आपल्या मुलांनी टिव्ही पाहताना नेमके कोणते कार्यक्रम किती वेळ पाहिले पाहिजेत याचे निकष पालकांनी आधी स्वत: आचरणांत आणले पाहिजे. खरे तर हल्ली टिव्ही हा इडियट बॉक्स न राहता इनफॉर्मेशन बॉक्स बनला आहे. त्याकडे पाहण्याची आपली नजर बदलली पाहिजे. बहुतांश डिश कंपन्यांनी आपल्या पर्सनल स्पेसवर इंग्शिल स्पीकींग, रेसीपी, एटीकेटस मॅनर्स, पार्टी थीम्स, मेकअप पासून ते केजी ते दहावीपर्यंतचा डीजीटल अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला आहे. याशिवाय माधूरी दिक्षित, शामक दावर यासारख्या नृत्य गुरुंनी आपली चॅनेल्सही लॉंच केले आहे. आपल्या मुलांच्या आवडी निवडी, उपलब्ध वेळ आणि खर्च आदींचा विचार करुन मुलांना काही चांगल्या गोषटी शिकवता येतील. याशिवाय अनेक भाषांमधून सुरु असणाऱ्या क्विझ शो पाहण्याची सवय मुलांना लावा, जेणेकरुन फक्त हिंदी, इंग्रजी नाही तर जापनीज, कोरीयन, फ्रेंच आदी भाषा किमान कानावर पडतील आणि त्यांची गोडी लागेल. आपल्याशिवाय इतर देशांतील, प्रांतातील लाईफ स्टाईलही मुलांना कळू शकते. अनेक चॅनेल्स खास करुन क्राफ्ट, कला, शास्त्र, इतिहास, भूगोल, जंगल सफारी, प्राणी, निसर्ग आदीवर फोकस करणारे आहेत. याशिवाय स्पोर्टस चॅनेल आहेत, ज्याद्वारे मुलांना विविध खेळ, शास्त्रीय तंत्र यांची माहित होते. कॉमेंटरीतील लकब, वेगवान भाषेतील संवाद समजून घेतानाच अचूक, समर्पक शब्द कानावर पडतात. यातून मुलांना खेळाची आवड लागू शकते. मात्र हेही ध्यानात घ्या की, टिव्हीसमोर सातत्याने बसण्याची सवय लागली तर याचा थेट परिणाम मुलांचा बटाटा होण्यास सहाय्य करतो. मैदानी खेळही तितकेच महत्वाचे आहेत, हेही मुलांना सांगा. त्यांना रोज किमान एक तास मैदानात खेळायला पाठवाच. जपानमधील संशोधकांनी केलेल्या पाहणीनुसार अती टिव्हीमुळे ब्रेन स्ट्रक्चरमध्ये बदल होवू शकतात. समोर दिसते म्हणुन आपणही तेच करायचे ही मानसिकता मुलांमध्ये वाढते आहे. यातूनच ड्रग्ज, सेक्स, दारु, याचा वापर करणााऱ्या मुलांचे वय दिवसेंदिवस कमी होत आहे. सुपर हिरो ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून मालिकांची निवड करणााऱ्या मुलांना चूकीच्या मार्गाने जाण्यासाठी रोखण्याकरता पालकांनी सतर्क असण्याची गरज आहे.
गत दहा वर्षात जागतिकीकरणाचा सर्वात मोठा फटका मालिकांच्या बाजारपेठेत टीआरपीच्या रेट्यात अडकलेल्या प्रेक्षकांच्या सरळ साध्या आयुष्याला बसला आहे. साधारणपणे अगदी वाय टू के साजरे करणााऱ्या प्रेक्षकांनी शकतीमानप्रमाणे कृती करीत देशभरात हजारो बालकांना मृत्यूमुखी पडताना पाहिले, तेव्हाच सावध व्हायला हवे होते.. मात्र झाले उलटेच. याच दशकांत खासगीकरणामुळे सरकारी दूदरर्शन एका कोपऱ्यात सरकले जावून त्याची जागा शेकडोंच्या संख्येने विविध चॅनेल्सनी घेतली. केबल आपॅरेटर हा नवा व्यवसाय रुजु झाला. त्यातच आता पायलीला पन्नास डिश कंपन्यांनी दोन ते तीन हजाराच्या मोबदल्यात जेमतेम अर्धा तासांत घराघरांत उगवणाऱ्या छत्र्यांनी मनोरंजनाची व्याख्याच बदलून टाकली.
हा बदल एकीकडे होत असतानाच मिस वर्ल्ड, मिस यूनिव्हर्स, मिस इंडिया आदी सौंदर्य स्पर्धांमधील भारतीयांची वाढती रुची आणि सहभाग लक्षात घेत, अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारत हीच आपली मुख्य बाजारपेठ असल्याचे पक्के हेरुन भारतात पाय रोवण्यास सुरुवात केली. विविध चॅनेल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घरात पोहोचणााऱ्या लाखो उत्पादक कंपन्यांनी आकर्षक जाहिराती, स्लोगन, जिंगल्स, पाहातच रहावेत असे देखण्या मॉडेल्सची रेलचेल यांचे एक आभासी जग उभे केले. यातूनच मग जाहिरांतीच्या सोयीसाठी मालिकांचे विभाजन सुरु झाले. मग डेली सोप, विकली सोप, स्पेशल एपिसोड, संडे स्पेशल. क्विज, विन विन ऑफर्स, आदींच्या माध्यमातून लाखो कराडोंची उलाढाल सुरु झाली. आयत्या जाहिराती मिळतात म्हणून प्रेक्षकांच्या अभिरुचीची ऐशी की तैशी करीत दिवसागणिक दर्जा घसरत जाणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या माथी मारल्या जावू लागल्या, मात्र मालिकांची सवय व्यसनासारखी चिकटल्याने यात संपूर्ण कुटुंब आणि कुटुबातील सर्व वयोगटातील प्रेक्षक यात भरकटले गेले, जात आहेत.
आजमितीला भारतात दिवसभरात किमान एक ते चार तास टिव्ही पाहणाऱ्यांची संख्या वाढते आहे. असे वेळोवेळी केलेल्या सर्व्हेतून स्पष्ट होते आहे. सद्यघडीला, जवळपास 600 ते 700 विविध भाषिक मालिकांच्या जंजाळात आपला दिवसांतील किमान एक ते चार तासांचा वेळ सत्कारणी लागतोच. शहरी असो वा ग्रामीण घर छोटे असो वा मोठे घरांघरातील मुुलांना टिव्ही पाहण्याची सवय नाही, वा आमचा पिंट्या अजिबात टिव्ही बघत नाही, पिंकीला कोणतीच मालिका आवडत नाही.. असे म्हणणारे पालक सापडणे दुर्मिळच.. घरांत खायला नसेल मात्र छतावर डीशची छत्री उगवलेली असेल, असे चित्र सर्रास दिसते आहे. याचा दोष फक्त मुलांच्या माथी मारुन पालक बाजूला होत असतील तर ते न्याय ठरणाार नाही… कारण मुळातच मुलांना मालिका पाहण्याचे व्यसन आपण पालकच खास करुन आई, मॉम, मम्मीनेच तर लावलेले असते. कधी घरांत खूप काम असते, तर अचाानक पाहुणे येतात, कधी भीशी तर कधी किटी पार्टी, कधी बचतगटाची मिटींग तर कधी सासूच्या चुगल्या मिटींग… पींकीला शाळेतून आणायचे आहे, मी येईपर्यंत तु टिव्ही बघत बस, मला स्वयंपाक करायचा आहे, बाबांचे मित्र जेवायला येणाार आहेत, तु कार्टुन बघत बस… तु पाच मिनिटं थांब मालिकेचा शेवटचा पार्ट आहे… इतकी कसली भूक लागते तुला…?
अशा एक ना अनेक कारणाने घरोघरच्या आया, मग त्या नोकरी करणाऱ्या असोत वा गृहिणी… आपली स्पेस शोधण्याच्या नादात आपण चिमुकल्यांच्या बालविश्वावर अतिक्रमण करतो आहोत, हेच मुळी पालक लक्षात घेत नाहीत आणि मग आपली मुले मालिकांच्या आभासी जगालाच आपले खरे जग मानू लागतात, त्यातूनच मग कुणी बेन टेन, कुणी शक्तीमान, कुणी छोटा भीम तर कुणी डोरेमॉन, बनण्याच्या प्रयत्नात स्वत:चा जीव गमावून बसतात.
किशोरवयीन मुलांमध्ये कार्टुन्स पाहण्याचे वेड वाढते आहे. याचा परिणाम मानसिकतेवर तर होतोच शिवाय, शारीरीक व्यंग जसे श्रवणदोष, संवाद क्षमतेचा अभाव, सभाधीटपणा, समुह चर्चेत प्रभावीपणे आपली मते मांडता न येणे, आक्रमकता, आक्रस्ताळेपणा, एकलकोंडेपणा, हिंसा करण्याची इच्छा होणे, भावंडामध्ये सतत मारामारी, पालकांचे न ऐकणे, परीक्षेच्या भीतीने खोटे बोलणे, प्रसंगी गुन्हा करण्यास, चोरी करण्यास प्रवृत्त होणे अशा अनेक मार्गाने मुले आपली निरागसता घालवून बसतात. मुंबई, पुणेच नाही तर अनेक छोट्या शहरांत क्रूर गुन्हयांमध्ये सहभागी असणााऱ्या अल्पवयीनांची संख्या वाढते आहे. मात्र हा धोका अजूनही समाज गांभीर्याने घेत नाही.
हल्ली तुलनेने दहा बारा वर्षापूर्वीच्या कालावधीत प्रसारीत होणााऱ्या बोधक मालिका शोधुनही सापडत नाहीत, नाही म्हणायला दगडापेक्षा वीट मउ असे वर्गीकरण मनाला समाधान देणारे ठरते. फक्त फॅमिली ड्रामा, अनैतिक नाते, विवाहबाह्य संबध, आभासी घरे अन त्यात सज धजके काम स्वयंपाक करणााऱ्या सूना अन लेकी… हे असे फॅमिली कट्टाचे ओंगळवाणे स्वरुप तर दुसरीकडे कार्टुन्समधली निरागसताही हरवत चालली आहे. मिकी माउसच्या खोडकर मस्तीने येणारे खट्याळ हसू आता शिनचॅनमध्ये शोधण्याचा प्रयत्न होतो आहे. तर धाडसी मोगली, जंगली तुफान मालिकांमधून दर रविवारी नवे काहीतरी शिकायला मिळायचे आता दिवस दिवसभर चालणारे क्विज शो पाहतानाही आपण या जगाचा भागच नाहीत असे वाटत राहते.
केवळ बड्या कलाकारांना सूत्रसंचालक करुन ग्लॅमर गोळा करताना आपण रियॅलिटी शोमधून नेमके प्रेक्षकांना काय देतो? हा विचारच करताना कुणी दिसत नाहीत. त्यातच गत आठ दहा वर्षात नाच, गाणी, कॉमेडी, हुनर शोधण्याकरता स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्या स्पर्धेत आपल्या मुलांनी चमकलेच पाहिजे असे अट्टाहास करणारे पालक अत्यंत टोकाच्या भूमीकेत असतात. मुलांच्या वयाचा विचार न करता पालक आम्हांला नाही मिळाले, माझी खूप इच्छा होती, अशी कारणे देत मुलांकडून त्या पूर्ण करुन घेतल्या जातात, या अतिरेकात आपल्या मुलांचे बालपण आपण ढवळून टाकतो आहोत, त्यांना आपणच गुन्हेगारी रस्त्यावर आणतो आहोत, हे पालक कधी लक्षात घेणार?
काहीही झाले तरी, टिव्हीवर जे सुरु असते त्यावर आपण कंट्रोल करु शकत नाही, मात्र आपल्या हातात असणााऱ्या रिमोटचा वापर योग्य वेळी करण्याची सवय आपल्या हातापेक्षा मनाला लावली पाहिजे. मालिकांची घर घर आपल्या घरांतील संवाद, आपुलकी संपवणार नाही, याची काळजी पालकांनी वेळीच घेतली पाहिजे तर मालिका म्हणजे आभासी प्रतिमांची दुनिया, हे मुलांनीही स्विकारलं पाहिजे… तरच अश्या मालिका सुरेख बाई असे म्हणता येईल..



