रंग माझा वेगळावर्दीतले दर्दी

बदल – एक सामाजिक भान

- अ‍ॅड. प्रेरणा देशपांडे

 

– अ‍ॅड. प्रेरणा देशपांडे

सुदृढ, विवेकी, प्रगतशील समाज निर्मितीसाठी सामाजिक भान राखून आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात बदल करणे आवश्यक असते.  हे बदल या प्रत्येक क्षेत्रात होत असतात. काळानुरूप काही बदल आपोआप होत जातात, तर काही बदल जाणीवपूर्वक स्वीकारले जातात. सामाजिक बदलाचा विचार करता अस्पृश्यता, जातीभेद, हुंड्याची पद्धत, अनेक पत्नी प्रथा,  बालविवाह, सती प्रथा, विधवांचे केशवपन, स्त्री भ्रूण हत्या अशा कितीतरी जुन्या, अनिष्ट रूढी, प्रथा समाजाने बंद केल्या. सोडून दिल्या. समाजाने हे बदल स्वीकारल्यामुळेच त्या समाजातून बहुअंशी नाहीशा झाल्या आहेत. समाजाने हा बदल स्वीकारला तो कधी कायद्याच्या धाकाने तर कधी समाज धुरीणांनी केलेल्या प्रबोधनाने.

सतीबंदीसाठी राजा राममोहन राय यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. एखाद्या स्त्रीला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेताबरोबर जिवंत जाळले जाणे ही किती अघोरी प्रथा. विधवेचे जीणे महाकठीण. तिला अपशकुनी मानून तिच्यावर होणारे अत्याचार अन्याय भयंकर असतं. त्यापेक्षा तिने  मृत पतीबरोबर त्याच्या चितेवर स्वत:ला जाळून घेणे जास्त योग्य असे वाटून अनेक स्त्रिया स्वत:हून सती जात, तर अनेकदा तिला बळजबरीने सती जाण्यास भाग पाडले जाई. राजा राममोहन राय यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे व इंग्रजांनी केलेल्या सतीबंदीच्या कायद्यामुळे सतीप्रथा बंद झाली.  मात्र त्यावेळीही अनेक कर्मठ लोकांनी या कायद्याला विरोध केला होता. शिक्षेच्या धाकाने ती बंद झाली. हीच गोष्ट बाल विवाह प्रतिबंधक कायद्याची.  गो. ब. देवल यांचे ‘शारदा’ नावाचे नाटक रंगभूमीवर आले होते. त्यात जारठ विवाहाबद्दल उपरोधिक भाष्य करण्यात आले होते. शारदा ही चौदा-पंधरा वर्षाची मुलगी आणि तिचा होणारा पती हा जख्ख म्हातारा  ७५ वर्षे वयाचा.  शारदेला तिच्या मैत्रिणी चिडवतात ते एका नाट्यपदातून.


‘म्हातारा तितुका न
अवघे पाऊणशे वयमान
लग्ना अजुनी लहान
दंताजीचे ठाणे उठले,
फुटले दोन्ही कान
तुरळक कोठे केस रुपेरी
डोईस टक्कल छान’
अशा विडंबन गीतातून म्हातारा नवरा कसा आहे त्याचे वर्णन केले  होते. या नाटकाचा प्रभाव जनमानसावर पडला आणि सरकारनेही त्याची दखल घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायदा केला. त्यावेळी त्याला शारदा कायदा असेही म्हटले गेले होते. ज्यात विवाहासाठी मुलीचे वय १६ पूर्ण असावे असे होते. नंतरच्या काळात बदल होऊन ते १८ वर्षे करण्यात आले आणि आता २१ पूर्ण असावे असा नवा बदल कायद्यात होत आहे.

नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा अलीकडेच अस्तित्वात आला. बुवाबाजी, जादूटोणा, भानामती, भूत उतरवणे, गुप्त धन मिळवण्यासाठी नरबळी देणे अशा अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी अनेक संतांनीही समाजप्रबोधन केले होते. लोकसंख्या नियंत्रणासाठी नसबंदी तर समाजाने आता स्वत:हून स्वीकारली आहे. त्याचा परिणाम दिसत आहे. मुलींना शिक्षण मिळावे यासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेले कष्ट सर्वांना माहीत आहेत. आज त्याचे किती चांगले परिणाम समाज पहातोय. देशाच्या प्रगतीत स्त्रियांचा सहभाग आहे. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी स्त्रीया लीलया पेलत आहे. हा बदल उल्लेखनीय आहे. मुलींना  पित्याच्या मिळकतीत समान वाटा, राजकारणात ३० टक्के आरक्षण हे बदल कायद्याने झाले. स्त्रियांविषयी सन्मानाची, बरोबरीची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत. असे अनेक बदल सांगता येतील. अशाप्रकारे समाज प्रबोधन आणि कायद्याची साथ यामुळे सामाजिक भान ठेवून असे बदल घडत आहेत
तू खुद को बदल, तू खुद को बदल
तभी तो जमाना बदलेगा
कोणत्याही बदलाची सुरुवात ही स्वत:पासूनच करायची असते.

Related Articles

Back to top button