वर्दीतले दर्दी

गरज पाठबळाची

- अ‍ॅड. योगिनी बाबर

हस्तकला, शिल्पकला तशी सहजी आत्मसात होत नाही, आणि झटकन या कलेत जमही बसत नाही.. मात्र या कलेच्या जोरावर ज्याचे नाव जगभर पोहोचले, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने ज्या कलाकाराचा सन्मान झाला.. ज्याची कला, रात्र ंदिवस जागून साकारलेली शिल्पे, गणपती, प्राण्यांची मोठ्ठाली शिल्पे पाहण्यासाठी राज्यभरातुन रसिकांची गर्दी होत होती, त्या कलाकाराची आयुष्यभराची पुंजी.. किरकोळ आगीच्या कारणाने भस्मसात झाली आहे. आपल्या डोळ्यासमोर आपली कला अशी आगीच्या तोंडी जळताना पाहण्यासारखे दुसरे दुर्देव नाही.. पण हे दु:ख अनुभवले आहे, अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे आणि त्यांच्या पत्नी स्वाती कांबळे यांनी. कलाकार मनस्वी असतात, म्हणूनच अशा नैसर्गिक आपत्तीत ते पुरते कोसळुन जातात… एखादी सुंदर मुर्ती बघताना आपली नजर ठरत नाही.. हीच मुर्ती घडवताना शिल्पकाराने आपले प्राण त्यात ओतलेले असतात, म्हणूनच शो पीसमधल्या मातीच्या मुर्ती देखण्या आणि जिवंत भासतात, त्यांचे डोळे आपल्याशी बोलत राहतात.. ही किमया ज्या हातांनी साधली, ते प्रमोद कांबळे या धक्क्यातून बाहेर येणे महत्त्वाचे ठरत आहेत. शिल्पकार प्रमोद यांचा अहमदनगर येथिल भिस्तबाग रस्त्यावरील स्टुडिओ रविवारी दुपारी आगीत भस्मसात झाला. यात सुमारे एक ते दिड कोटी रुपयांच्या आसपास नुकसान झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यात अनेक मौल्यवान वस्तू, शिल्पांचाही समावेश आहे. त्यांचे वडील नगरच्या कला महाविद्यालयात मुख्याध्यापक होते. त्यामुळे प्रमोद यांच्या कलाशिक्षणास लहानपणीच सुरुवात झाली. 7 वी इयत्तेत असताना त्यांना मूर्तिकलेच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी नगरच्या प्रगत कला महाविद्यालयातून फाऊंडेशन कोर्स आणि कला शिक्षक डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. मूर्तिकार बनण्याची त्यांची प्रबळ इच्छा त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्टला घेऊन गेली. तेथे त्यांनी मूर्तिकलेचा आणि मॉडेलिंगचा डिप्लोमा मिळवला. शैक्षणिक काळातच त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. याच काळात त्यांनी विविध कला दिग्दर्शकांसोबत कामही केले. नगरला आपला स्वत:चा स्टुडिओ सुरू केल्यानंतर त्यांनी भारतातील नामवंत 500 व्यक्तींची चित्रे नगर महानगरपालिकेच्या महावीर कलादालनातील 65 फूट 17 फूट आकारमानाच्या भिंतीवर काढली आहेत. काही महिन्यांमध्येच केवळ पेन्सिलीच्या साहाय्याने 1997 साली त्यांनी सारे जहॉं से अच्छा हे जगातील सर्वात मोठे पेन्सिल चित्र पूर्ण केले. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी हे चित्र त्यांनी राष्ट्राला अर्पण केले. प्रमोद कांबळे यांच्याविषयीची माहिती गुगलवर संकलित करण्यात आली आहे, हस्तकला प्रांतात अगदी मोजक्या कलाकारांना हा सन्मान मिळाला आहे. आयुष्यभराची पुंजी, कलाकृती अशी एका झटक्यात होत्याची नव्हती होणे, फारच धक्कादायक आहे, प्रमोद यांच्यातील कलाकार जिवंत ठेवण्यासाठी त्यांना उभारी देण्यासाठी समाजातील दानशूर, संवेदनशील व्यक्तिनी स्वत:हून पुढे येण्याची आणि कांबळे कुटुंबियांना बळ देण्याची गरज आहे. असे पाठबळ हाडाच्या कलाकाराचे गौरव वाढविणारे असेल, हे निश्चित…

Back to top button