विशेष मुलाखत

जगण्याचं इक्वेशन जमलं पाहिजे… : आरती अंकलीकर

- अ‍ॅड. योगिनी बाबर

शास्त्रीय संगीत सौंदर्याचं साधक बनवतं… वर्तमानात समृद्धीनं जगायला शिकवणारं संगीत जगणं परिपूर्ण करतं… मात्र जगण्याचं इक्वेशन जमलं पाहिजे… सुप्रसिद्ध शास्त्रीय, सुगम संगीत गायिका ग्वाल्हेरच्या अत्रोली घराणा गायकीच्या वारसदार आरती अंकलीकर-टिकेकर यांची ही खास मुलाखत पुनर्प्रकाशित करीत आहोत, खास ‘गार्गी’च्या वाचकांसाठी…
प्रत्येक क्षण पूर्णत्वानं जगणे म्हणजेच जगणं आहे… शेवटी जीवनाचा सार कशात आहे? गेल्या क्षणाचा आताच्या क्षणाशी काही संबध नसतो. शास्त्रीय संगीत हे सौंदर्याचा साधक बनवतं. संगीत हे मनोरंजनासाठी नाही, तर ते आत्मरंजनासाठी आहे. मनोवस्थेशी जोडणारं तसेच योगा, अध्यात्म यांच्याशी तादात्म्य पावणारं असं शास्त्रीय संगीत आहे. वर्तमानात समृद्धीनं जगायला शिकवणारं संगीत जगणं परिपूर्ण करतं. दोन प्लस दोन प्लस दोन म्हणजेच सहा असा अचूक गणिती हिशेब मांडणार्‍यांचं जगणं परिपूर्ण असतंच असं कुठे आहे? असा सवाल करीत आरतीताई म्हणतात, ‘रिअ‍ॅलिटी शो’चा आणि संगीताचा काहीही संबंध नाही. असे शो म्हणजे स्पर्धकांना केवळ शास्त्रीय संगीताचा रियाज करा, असं सांगण्यासारखं आहे. मुळातच 10-12 वर्षे गाणं शिकून राग येत नाहीत. त्याकरहता किमान दोन तपाची मेहनत घ्यावी लागते. संगीताची साधना करताना भावनिक आणि बौद्धिक बुध्यांक महत्त्वाचा ठरतो. गाण्याचा रियाज करताना मनन, चिंतन गरजेचं आहे. याकरीता मेंदूलाच शिस्त लावण्याची कळकळ पाहिजे.
शिक्षण कोणतेही असो, गुरुची निवड आणि गुरुची भूमिका महत्त्वाची ठरते, असं आरतीताईंना वाटतं. त्या म्हणतात, गुरु सर्वार्थानं मोठाच हवा… केवळ अर्थार्जनासाठी शहरभर क्लासेस उघडणारा शिक्षक आणि सच्चा गुरुमधला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यादान करणारा गुरुच शिष्यातल्या गुरुला जागृत करू शकतो. जो गुरु शिष्याला आपल्या वाटेवर न चालविता स्वत:ची वेगळी वाट धुंडाळायला भाग पाडतो, तो गुरु माझ्यासाठी वंदनीय आहे. मी जेव्हा माझ्या संगीताच्या ज्येष्ठ गुरु आदरणीय किशोरीताई आमोणकर यांच्याकडे शिकत होते, तेव्हा मनोवस्थेशी एकरुप होणं काय असतं हे अनेकदा अनुभवलं आहे..
किशोरीताईंकडे शिकताना सकाळी आणि संध्याकाळी चार-चार तास यमन गाताना येणारे अनुभव खूपच स्पृहणीय आहेत. ताईंनी यमन गायला सुरुवात केल्यानंतर अवघ्या दहाव्या मिनिटाला ताईंसह सारं जग यमनमय झालंय असं वाटायचं. हे एकरुप होणं ज्या गुरुच्या सानिध्यात शक्य होतं, तोच गुरु श्रेष्ठ होय.
गुरु-शिष्याचं नात उलगडतानाच आरतीताईंनी हल्लीच्या स्मार्ट पालकांनाही काही मौलिक मार्गदर्शन केलं. त्या म्हणतात, ‘मुलांचा आनंद शोधण्यासाठी हल्ली पालकांना तरी कुठे वेळ आहे? मुलांचे गुण आणि आवड यांची सांगड घालणं गरजेचं असताना आपली आवड आणि मुलांचे अवगुण यांचा मिलाफ करण्यात पालकांना धन्यता वाटते. मात्र याचं फळ मिळत नाही, तेव्हा पालक मुलांनाच दोष देतात, हे अत्यंत चुकीचं आहे. मुळातच कोणत्याही कलेतलं प्रावीण्य, आवड ही नैसर्गिक देणगी हीच आपली पुंजी असते. त्याच्या जोडीला संस्कार, कष्ट आणि मिळणार्‍या संधीतूनच माणूस घडत असतो. म्हणूनच मुलं घडविताना मुलांचे गुण आणि आवड यांची सांगड घाला.
आपल्या लेकीविषयी बोलताना त्या म्हणाल्या, मी आणि उदय (‘’जय हो बाबाजी’’फेम अभिनेता उदय टिकेकर) दोघंही आपापल्या करिअरमध्ये व्यग्र असतो. त्यामुळे आमच्या स्वानंदीला पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. असं असलं तरी आज स्वानंदीने जे निर्णय घेतलेत ते निभावताना आणि तिला घडताना पाहताना आम्ही जो स्वानंद अनुभवतो तो लाख मोलाचा आहे. मुलांच्या बाबतीत मला वाटतं की, उमलण्याच्या दिवसांत त्यांच्यावर जे संस्कार होतात, आपले पालक आपल्याला कमी वेळ देतात, याचा अर्थ ते भलतेच काही करीत नाहीत ना, अथवा फक्त स्वत:च्या मनोरंजनापुरतचं मर्यादित राहात नाहीत ना याचीही दखल मुलं घेत असतात. पालकांचं डेडीकेशन मुलांना घडवत असतं. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संस्कारामुळेच मुलं घडत असतात.
मराठीतले गुणी अभिनेते ‘’जुळून येती रेशीमगाठी’’मधून ‘‘जय हो बाबाजी…’’ म्हणत घराघरात पोहोचलेले उदय टिकेकर आणि आपल्या सहजीवनाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, उदय आणि मी पोद्दार कॉलेजपासून एकत्र आहोत. तो उत्तम तबला वादक तर मी गायिका… त्याच्या आई-वडीलांचा प्रांतही गाण्याचाच… आम्ही एकमेकांना ओळखत होतो… पण म्हणून आमच्या सवयी, आवडी-निवडी सारख्या आहेत असे अजिबात नाही… कदाचित भिन्न स्वभावाचे आहोत, म्हणूनच हॅपीली मॅरीड आहोत.. असं सांगतानाच आरतीताई उदय टिकेकर नवरा म्हणून कसे आहेत हे सांगताना मिश्कीलीने म्हणतात… प्रत्येक नवरा हा उत्तम अभिनेता असतो… यापेक्षा वेगळं काय सांगणार?
आपल्या करिअरमध्ये एकत्रित कुटुंबाचा फार मोठा वाटा आहे, असे सांगणार्‍या आरतीताई आपल्या सासुबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाल्या की, माझ्या संसाराची दोरी मी सासूबाईंच्या हाती दिली होती… त्यांनी ती खंबीरपणे सांभाळली, जोपासली… आणि म्हणूनच माझ्या संसाराचा गाडा सुरळीतपणे चालत राहिला.
शास्त्रीय संगीताच्या प्रांतातील महत्त्वाचा घटक म्हणजे श्रोता होय. यावर भाष्य करताना आरतीताई म्हणतात, शास्त्रीय संगीत हे मुळातच माससाठी नाही.., ते क्लाससाठीच आहे. परदेशातही पाश्‍चिमात्य शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेण्याकरता अभिरुचीसंपन्न, दर्जात्मक श्रोता उपस्थित असतो. ज्ञानी श्रोत्यांसमोर आपली कला, गाणं सादर करणं हे जसं चॅलेंज असतं तसंच ते निव्वळ माझ्यावर प्रेम करणार्‍या दर्दी रसिकांसमोर गाणं सादर करताना असतं. या दोन्हीमधला फरक इतकाच की, माझ्यावर प्रेम करणार्‍यांना भले शास्त्रीय संगीत कळत नसेल, मात्र माझे सूर त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलेले असतात आणि अशा प्रत्येक मैफिलीकडून त्यांची तीच अपेक्षा असते.
चांगल्या श्रोत्याची व्याख्या काय? यावर बोलताना त्या म्हणाल्या, आपण स्वत:च आपला उत्तम श्रोता असतो. कोणाला तरी माझं गाणं आवडतं किंवा माझ्यासमोर अमूक प्रकारचा श्रोतावर्ग आहे, म्हणून मी त्याप्रकारे गाणं गाते असं कधीच होत नाही. जोपर्यंत माझ्यामध्ये असणार्‍या श्रोत्याला मी खूष करीत नाही, तोपर्यत मला माझं गाणं उत्तम झालं आहे, असं वाटत नाही. संगीत आपल्याला सौंदर्याबरोबरच निसर्गाचा साधक बनवतं, म़्हणूनच माझ्यातला श्रोता मला सर्वोत्तम आणि महत्त्वाचा वाटतो.
तरुण पिढीचं कौतुक करताना त्या म्हणाल्या, हल्ली, इंटरनेट, फेसबुक आणि विविध प्रकारच्या सोशल साईटस्वर शास्त्रीय संगीताच्या अखंड चर्चा सुरू आहेत. मला नोंद घ्यावीशी वाटणारी खास बाब म्हणजे या चर्चा करणारे आणि घडविणारे सगळे यंगस्टर्स आहेत. शास्त्रीय संगीतावर प्रेम करणारे आणि या संगीताचा आस्वाद घेणारे हजारो युवा कान तयार होत आहेत. आजच्या स्पर्धेच्या काळातही एकलव्य आणि द्रोणाचार्य आहेत. ऑस्ट्रेलिया, सिंगापूरसारख्या देशातही 400-400 विद्यार्थी संगीताचे शिक्षण घेताना मी अनुभवले आहेत.
‘‘दे धक्का’’मधील ‘’उगवली शुक्राची चांदणी…’’ या आरतीताईंनी गायलेल्या प्रसिद्ध लावणीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. आरतीताई आजअखेर अनेक मान्यवर पुरस्कारांनी पुरस्कृत झाल्या आहेत. विविध प्रकारच्या गायकीत आपली आवड काय हे सांगताना त्यांनी अर्थातच शास्त्रीय संगीताला प्राधान्य दिलं. त्या म्हणाल्या, राग संगीत ही माझी पहिली पसंती आहे. चित्रपटात नवी गाणी गाताना त्यात एक ताजेपणा असतो. आपल्यातलं चैतन्य, नव्यानं शिकण्याचा आनंद वाढतो.
सतत देश-परदेशात मैफिलीकरता दौर्‍यावर असणार्‍या आरतीताई आपल्यातील गायकी अधिकाधिक बहरावी याकरीता प्रयत्नशील असतात. त्यांच्या मते, संगीत हे पाठांतर नव्हे. मी राग संगीताकडे कशा तर्‍हेने पाहते? त्यातली कोणती सुरावट मला अधिक भावते? त्यात असणारी नवनिर्मिती काय? अशा अनेक कप्प्यांचा मी सातत्यानं अभ्यास करते. राग ही चौकट आहे. सुगम संगीत केवळ रागावर अवलंबून असतं आणि या सुगम संगीताच्या प्रभावामुळेच मास शास्त्रीय संगीताकडे आकृष्ट होत असतो, हे अचूक परीक्षणही त्या मांडतात.
आपल्या परदेश दौर्‍याचे अनुभव कथन करताना त्या म्हणाल्या, मला पर्यटन आवडतं… माझ्या जगभरातल्या कार्यक्रमांमुळे वारंवार परदेश दौरे होतात… परदेशातील नागरिक भारतीय संस्कृतीवर विलक्षण प्रेम करतात. कलाकारांना तर कुठे ठेवू अन् कुठे नको इतकं प्रेम देतात. त्यामुळे स्वाभाविकच कार्यक्रमाच्या टाईम टेबलमध्ये साईट सिईंग, व्हीजिटर्स यांचा समावेश असतो. त्यामुळं नवी ठिकाणं, नवी माणसं, त्यांचे विविध व्यवसाय, नव्या कल्पना जाणून घेण्याची मला सवय जडली आहे. आम्ही सहकुंटुंब वर्षातून एक ट्रीप करतोच… भारतातले कुलू मनाली हे माझं आवडीचं ठिकाण आहे.
आरतीताई मूळच्या कर्नाटकातील विजापूरच्या. त्यामुळे साहजिकच कर्नाटकी पदार्थ हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. तशी मला बंगाली मिठाई, रसमलाई आणि चाट पदार्थही आवडतात… असे सांगतानाच कोल़्हापूरातील राजाभाऊंची भेळ, पुण्यातल्या श्रेयस थाळीची चव, आणि मुंबईतल्या नाना चौकातील स्वाती स्नॅक्स ही माझ्या आवडीची ठिकाणं असल्याचंही त्या म्हणतात.
आयुष्यात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा मात्र चांगला नागरिक, चांगला माणूस म्हणून जगा, असा मौलिक उपदेश देताना त्या परदेशी नागरिकांचे उदाहरण देतात. परदेशी माणसे ज्या पद्धतीने आपल्या देशात, समाजात वावरतात ते अनुकरणीय आहे, असे त्यांना वाटते. सामाजिक स्वास्थ्य, कायदा आणि सुरक्षेसाठी जे नियम केलेले आहेत, त्यांचे 100 टक्के पालन करायचंच असतं ही त्यांची मानसिकता वाखाणण्याजोगी आहे. पैशापेक्षा सामाजिक जीवनमूल्यांचं पालन करणं केव्हाही महत्वाचं आहे, असं आरतीताई सांगतात.
भारतीय संस्कृतीत समृद्ध जीवनाचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचे मूल्य जाणून घेऊन पूर्व पश्‍चिम संस्कृतीचा सुंदर मिलाफ साधत शांतातप्रिय समाज निर्माण झाला पाहिजे, असं आरतीताईंना आवर्जून वाटतं.

Back to top button