विशेष मुलाखत

समाजाच्या सक्षमीकरणाचे ध्येय : अ‍ॅड. नितीन बाबूराव ठाकरे

अ‍ॅड. नितीन बाबूराव ठाकरे

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नवनिर्वाचित सरचिटणीस व नाशिक बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अ‍ॅड. नितीन बाबूराव ठाकरे यांच्याशी ‘गार्गी’च्या पहिल्याच डिजिटल अंकासाठी घेतलेली सर्वसमावेशक मुलाखत…

कामासाठी पहिले प्राधान्य मागच्या कार्यकारिणीकडून झालेल्या काही महत्त्वपूर्ण चुका आणि त्रुटी दुरुस्त करणे यालाच राहील. मागच्या कार्यकारिणीकडून संस्थेवरती मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा निर्माण झाला आहे. देणी थकीत आहेत. ते कर्ज जवळपास १४० कोटी रुपयांचे आहे. हा बोजा कसा कमी करायचा, यासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणे आवश्यक आहे. याबरोबरच अतिरिक्त नोकर भरती हाही प्रश्न जटील आहे. याशिवाय मागच्या कार्यकारिणीकडून गरज नसलेल्या ठिकाणी जमिनी, इमारती खरेदी करण्यात आल्या आहेत. त्या खरेदी करताना चढ्या भावाने खरेदी केल्या आहेत. अनेक ठिकाणच्या शाळा इमारतींपर्यंत पोहोचण्यासाठी रस्तेही नाही. जेमतेम एकावेळी एक सायकल किंवा मोटारसायकल जावू शकेल, असे मैलो न् मैल अंतर आहे. जिथे रस्ते नव्याने तयार करण्याचीही अडचण आहे. अशा इमारती आणि या इमारतीत भरणाऱ्या शाळा यांचे प्रश्न गंभीर आहेत. विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांना असुविधाजनक शाळा इमारतींचा नाहक त्रास होतो आहे. अशा प्रश्नांवर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. संस्थेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेकांचे हात पुढे येतात, त्याचबरोबरीने नोकरी वा सेवेच्या निमित्ताने सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अनेकांना नोकऱ्यांची गरज आहे. त्यामुळे दरदिवशी माझ्यापर्यंत सर्वप्रकारचे लोक पोहोचण्याचा प्रयत्न करतात.


पूर्वीच्या कार्यकारिणीने शिक्षक भरती करताना कोणताही नियम पाळलेला दिसत नाही. जिथे अनुदानित तुकड्या रोडावलेल्या आहेत, अशा ठिकाणी अतिरिक्त नोकरी भरती तर, जिथे विद्यार्थी संख्या जास्त आहे, त्य ठिकाणी कमी शिक्षक संख्या अशा व्यस्त प्रमाणामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही युध्दपातळीवर प्रयत्न करत आहोत.
संस्थेची वाढ गुणात्मक पातळीवर होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यापूर्वी मी संस्थेचा तीनवेळा उपसभापती व पाच वर्षे सभापती म्हणून काम केले आहे. त्यामुळे संस्थेचा चढ-उतार मी जवळून पाहिलेला आहे. संस्थेला नावारुपाला आणण्यासाठी, आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल, याचा ढाचा तयार आहे.


गत निवडणुकीतील निसटत्या परावभवानंतर निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून मी संस्था आणि सभासद हिताचा विचार करून कामाला सुरुवात केली. सभासदांच्या सातत्याने संपर्कात राहिले. सभासदांमध्ये गेल्या १०-१२ वर्षांपासून एक असंतोष होताच. निवडून न आलेल्या लोकांसोबतचे संस्थेचे वागणे याविषयी सभासदांमध्ये रोष होता. मागच्या कार्यकारिणीने घेतलेले निर्णय संस्थेसाठी हितकारक नव्हते. मागील कार्यकारिणीने घेतलेल्या अनेक निर्णयांचा फटका पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सभासदांना बसला होता. मी जसा जसा संपर्कात आलो, तसे त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून अनेक समस्यांचा पाढा वाचला. व आम्ही जे आरोप करत होतो त्याला दुजोराच दिला. त्यानंतर संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेऊन मी जी व्यूहरचना केली, त्यानुसार बहुतांशी सभासदांनी माझ्यावर आणि नवनिर्वाचित कार्यकारिणीवर परिवर्तनाच्या आशेने विश्वास ठेवला. वातावरण बदलत गेले आणि सभासदांचा रोष मतपेटीद्वारे बाहेर पडला.
संपूर्ण निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भूमिका स्पष्ट करताना अ‍ॅड. ठाकरे म्हणाले की, पवार साहेबांनी कोणालाही स्पष्टपणे पाठिंबा दिलेला नव्हता. मात्र मागच्या कार्यकारिणीच्या एकंदरच कारभारावर त्यांची स्पष्ट नाराजी होती. त्यांनी वेळोवेळी ती बोलूनही दाखविली होती. त्याचा आम्हाला निवडणूक काळामध्ये फायदाच झाला. संस्था हित व्यक्ती हितापेक्षा मोठे असते हेच पवारांनी वेळोवेळी बोलून दाखविले होते. आमची कार्यकारिणी निवडून आल्यानंतरही आम्ही पवार साहेबांची मुंबईत भेट घेतली. सोबत समोरच्या पॅनेलमधून निवडून आलेले आमचे अध्यक्ष, चार्टर्ड अकाऊंटंटही होते. पवार साहेबांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. संस्थेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे काम करा, असे सांगतानाच पवार साहेबांनी संस्थेच्या हितासाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील असे सूचविले. त्यांनी उत्स्फूर्तपणे राष्ट्रवादी वेल्फेअर फंडाच्या माध्यमातून १ कोटी रुपयांची देणगी संस्थेला दिली. आम्हीपण त्यातून प्रेरणा घेत कार्यकारिणीतील प्रत्येकाने कुणी ५० हजार, कुणी १ लाख अशी देणगी संस्थेसाठी जमा केली आणि थोड्याफार प्रमाणात संस्थेचा आर्थिक बोजा कमी करण्यास हातभार लावला. यावेळी पवार साहेबांनी सीएसआर फंडाच्या माध्यमातून संस्थेसाठी भरीव आर्थिक मदत मिळविण्याचा मार्ग सूचविला व यासाठी दर ३ महिन्यांनी संस्थेच्या आर्थिक परिस्थिती बाबतचा आढावा घेण्याबाबत बैठक बोलावण्याची सूचना केली.


पूर्वीच्या कार्यकारिणीने गरज नसलेल्या ठिकाणी चढ्या भावाने ज्या जमिनी खरेदी केल्या आहेत, तसेच ज्या शाळा इमारती बांधल्या आहेत. उदा. मखमलाबाद येथील होरायझन अ‍ॅकॅडमीची शाळा, पिंपळगाव बसवंतची येथील शाळा या ठिकाणी जाण्यासाठी अरुंद रस्ते आहेत. अशा ठिकाणच्या शाळा कसरतीने सुरू ठेवाव्याच लागतील. याचा आर्थिक भार संस्थेवर कायमस्वरुपीच राहणार आहे.
मागील कार्यकारिणीतील दिवंगत डॉ. वसंतराव पवार यांना कामाचा उरक होता. प्रत्यक्षात माणसांमध्ये राहून त्यांन काम केले आहे. त्यांचा कर्मचारी-सभासदांमध्ये चांगला वावर असायचा. त्यांच्याविषयी अजुनही सभासदांमध्ये व आमच्यामध्येही आत्मियता आहे. कामातून त्यांचे नेतृत्व समोर आले होते. त्यांच्या माघारी सहानुभूतीच्या लाटेवर मागील कार्यकारिणी निवडून आली होती. कामाचा कोणताच अनुभव मागील सरचिटणीसांकडे नव्हता. शिक्षण संस्था किंवा कोणतीही संस्था चालविण्याचा प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव नसल्याने त्यांना अनेक सल्लागार तयार झाले होते. सल्लागारांच्या सल्ल्याने निर्णय होत गेल्याने संस्थेमध्ये विद्यार्थी प्रवेशापासून, शिक्षक नेमणूक, मालमत्ता खरेदी आदी ठिकाणी अनेक प्रश्न तयार झाले आणि कामकाज विस्कळीत झाले होते. ‘टू मेनी कुक्स स्पॉईल द फूड’ अश पध्दतीने संस्थेचे कामकाज सुरू असल्यानेच सभासदांची प्रचंड नाराजी त्यांना सहन करावी लागली. कोणत्याही संस्था प्रमुखाला आपल्या संस्थेच्या कामकाजाविषयी किमान अंगभूत ज्ञान असणे, समज असणे अत्यंत गरजेचे आहे. या गोष्टींचीच वाणवा असल्यामुळे त्यांच्याकडून अनेक चुका झाल्या.
आम्ही निवडून आल्यानंतर बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देणाऱ्या योजना राबविण्यास सुरूवात केली. सर्वप्रथम आमच्या अनुदानित फार्मसी कॉलेजमधील ४० जागा केंद्र शासनाने रद्द केल्या होत्या. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला होता. या जागा आम्ही तातडीने मंजूर करून घेतल्या. आडगाव येथील मेडिकल कॉलेजला संलग्न बी फार्मसी कॉलेजला मंजुरी मिळालेली आहे. याशिवाय इतर काही अभ्यासक्रमांनाही आम्ही नव्याने मागणी करीत आहोत.
माझे वडील दिवंगत बाबूराव ठाकरे यांच्या पुण्याईचा वारसा मला मिळालेला आहे. त्यांच्या आदर्शावरच माझी वाटचाल सुरू आहे. वडिलांच्या २०-२५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप कधी झाला नव्हता. नेकीने त्यांनी आपले काम केले आहे. त्यांच्या वेळची परिस्थितीही वेगळी होती. आता वातावरण बदलले आहे. तुम्ही जेवढे काम कराल, तेवढे तुमच्यावर आरोप-प्रत्यारोप होत राहतात. माझ्यावरही आरोप होतात. मात्र त्या आरोपांत किती तथ्य असते, हे सर्वजण जाणून आहेत. म्हणूनच मी माझ्यावर होणाऱ्या आरोपांनी व्यथित न होता, माझ्या कामकाजात अजून कशा सुधारणा करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करतो. खऱ्या आणि खोट्या आरोपांवरील फरक सूज्ञ समाज जाणून असतो. अशावेळेस आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहायचे, एवढेच सूत्र मी सांभाळतो.
मी निवडून आल्यानंतर सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत संस्थेशी संबंधित अनेकजण माझ्या भेटीला येतात. दरदिवशी यातील किमान २०० जणांना नोकरीची अपेक्षा असते. इतक्या सर्वांना मी नोकरी देऊ शकणार नाही, हे स्पष्ट आहे. संस्थेसमोरील नेमक्या अडचणी समजावून सांगितल्या तर त्यांना त्या लक्षात येतात आणि त्यांची मागणी काही प्रमाणात ते बाजुला ठेवतात. माझा संस्थेप्रतीचा प्रयत्न प्रामाणिक आहे, हे त्यांच्या लक्षात येते. त्यामुळे ते समजून घेतात. पूर्वीच्या कार्यकारिणीपर्यंत आणि सरचिटणीसांपर्यंत पोहोचणेस सर्वसामान्यांना अशक्य होते. मी आज त्यांना लगेच नोकरी देऊ शकत नाही, मात्र माझ्या कामाबद्दलचा विश्वास त्यांना देऊ शकतो, इतकेच मला समाधान आहे. आज नाही मात्र भविष्यात माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची मागणी पूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.
बार असोसिएशनचा मी सलग ३ वेळा अध्यक्ष आहे. या वेळच्या निवडणुकीतही मला स्पर्धक असतील असा अभास निर्माण केला गेला. पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती. सर्वसामान्यांसोबत डिल करणे सोपे असते, मात्र प्रचंड बुध्दीजीवी अशा वकिलासोबत डील करणे अत्यंत कठीण असताना मी पाच वकिलांचे सलग तिसºयांदा नेतृत्व करतो आहे. बुध्दीजीवी वकिलांमध्ये काही तात्वीक वाद आहेत. व्यक्ती म्हटले की इगो आलाच. काहीवेळा कारण नसतानाही विरोध समोर येतो. पण जे आहे ते स्वीकारून पुढे जात राहणे हेच नेतृत्वाचे काम असते.
नाशिक बार असोसिएशनच्या सभासद वकिलांना भेडसावणाºया अनेक प्रश्नांपैकी इमारत, पार्किंग, वकील चेंबर आदी अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. कोर्टाची इमारत वाढवत असताना पोलीस खात्याच्या अखत्यारीतील ५ एकर पैकी अडीच एकर जागा कोर्ट इमारतीसाठी हायकोर्टाकडून मिळविली. सध्या तिथे बांधकाम सुरू आहे. जवळपास ३०० कोटीचे बजेट अद्ययावत अशी नाशिक न्यायालयाची नूतन इमारत येत्या काही वर्षात उभी राहिलेली दिसेल. ही इमारत माझ्याच कारकीर्दीत उभी राहावी अशी वकिलांची इच्छा होती. म्हणूनच मी तिसऱ्यांदा निवडून आलो. या इमारतीत नवोदीत वकिलांसह ज्येष्ठ वकील, महिला वकील आदींच्या सोईसाठी डिजिटल लायब्ररी, बार रुम, पार्किंग व्यवस्था, कँटीन, प्राथमिक उपचार केंद्र, मोठे सभागृह आदी सुविधा उपलब्ध असतील.
नवोदीत वकील व संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्येही वाचनाची आवड वृध्दींगत व्हावी यासाठी वाचनालयाचे सक्षमीकरण, डिजिटल लायब्ररी आदी सुविधा देण्याचा माझा कटाक्ष आहे. सध्याच्या पिढीमध्ये गरजेपुरते ई वाचन करण्याची एक नवीन सवय लागली आहे. संपूर्ण संदर्भ पुस्तक किंवा संपूर्ण केस लॉ वाचला जात नाही, असेही मला आढळते. या सवयी लक्षात घेऊन नवोदीत वकिलांनी ई लायब्ररीचा जास्तीत जास्त वापर करावा, सावर आम्ही भर देत आहोत. फक्त वकीलच नाही, तर माझ्या संस्थेचा प्रत्येक विद्यार्थी सक्षम, सशक्त व अभ्यासू नागरिक घडावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

‘गार्गी’च्या डिजिटल आवृत्तीला माझ्याकडून शुभेच्छा !

Back to top button