
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे येत आहेत. याही वर्षी आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. जे आत्महत्या करतात त्यांचे आकडे येतात पण जे ‘मरण’ जगतात त्यांचे काय? विधानसभा आणि लोकसभेची अधिवेशने झाली. त्यात कोणी साधे दु:ख व्यक्त केले नाही. राजकीय स्तरावर क्रूर कोडगेपणा पसरला आहे. मीडिया नको त्या गोष्टीवर चर्चा करून शेतकऱ्यांचा आक्रोश दाबून टाकण्यास हातभार लावत आहे. अशा परिस्थितीतून देश जात आहे. आपण काही करू शकतो का? याचा विचार करून आम्ही ठरवले आहे की, १९ मार्च रोजी आपण सगळे शेतकरी सहवेदनेसाठी एक दिवसाचा उपवास करू.
१९ मार्च का?

१९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे-पाटील यांनी, पत्नी व चार मुलांसह आत्महत्या केली होती. ही शेतकऱ्याची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. २०१७ पासून महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातील व विदेशातील लाखो सुहृदयी लोक दरवर्षी १९ मार्चला उपवास करतात. या वर्षी आपण त्यात सहभागी होऊ या.
अन्न हा जीवाचा मूलाधार आहे. अन्न निर्माण करता आले म्हणून माणूस प्रगती करू शकला. शेतकरी अन्न पिकवतो. तो सर्जक आहे. त्याच्या आत्महत्या ही गंभीर बाब आहे. खरे तर शेतकरी आत्महत्या ही ‘राष्ट्रीय आपत्ती’ मानली पाहिजे. दुर्दैवाने या गंभीर बाबीकडे कोणाचे फारसे लक्ष नाही.
शेतकरी आत्महत्या थांबाव्यात यासाठी मी काय करू शकतो? आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात सत्ता नाही. शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू आदी) नरभक्षी कायदे रद्द करण्याचा अधिकार नाही. आपण शस्त्र घेऊन लढू शकत नाही. कोट्यवधी शेतकाºयांना आर्थिक मदत देण्याएवढी पुंजीही आपल्याजवळ नाही. आपण सामान्य माणसे, सहवेदना व्यक्त करू शकतो. शेतकऱ्यांना ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ हा दिलासा देऊ शकतो. तो दिलासा देण्यासाठी व सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी आपल्याला उपवास करायचा आहे. आत्मक्लेशाचा हा मार्ग या देशात अनेकदा वापरला गेला आहे. त्यातून अपेक्षित परिणाम आले आहेत. तोच प्रयत्न आपण करायचा आहे!

हा उपवास उत्स्फूर्तपणे, आपल्या मनाशी निर्धार करून करायचा आहे. आपण आपले नित्याचे काम करीत उपवास करु शकतो. खूप केले देवा-नवसाची उपवास, आता एक उपवास शेतकऱ्यांसाठी! याला आपण वैयक्तिक उपवास म्हणू. सार्वजनिक ठिकाणी बसणे, म्हणजे उपोषण करणे, तुम्हाला जे सोयीचे वाटेल त्या पद्धतीने उपवास किंवा उपोषण करू शकता.
अन्नत्याग का?
१) साहेबराव करपे कुटुंबीय व आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांचे स्मरण करणे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे.
२) शेतकºयांविषयी सहवेदना व्यक्त करणे.
३) शेतकºयांप्रती आपली बांधीलकी बळकट करणे.
४) शेतकºयांच्या आत्महत्यांसाठी कारणीभूत असलेल्या कारणांचा विचार करून ते कारण दूर करण्याचा प्रयत्न करणे.
५) शेतकरी स्वातंत्र्यासाठी संकल्प करणे.
१९ मार्चचा उपवास
पहिल्या वर्षी (२०१७) साहेबराव करपे यांचे गाव चिल-गव्हाण (यवतमाळ) येथे उपवास सुरू करून महागाव येथे उपोषणाला बसलो. या वर्षी लाखो लोकांनी देश-विदेशात वैयक्तिक उपवास केला.
दुसºया वर्षी (२०१८) साहेबराव करपे कुटुंबीयांनी जेथे आत्महत्या केली, त्या दत्तपुरला (जि. वर्धा) भेट देऊन पवनार येथे उपोषण केले.
तिसºया वर्षी (२०१९) दिल्लीत म. गांधी समाधी (राजघाट) परिसरात उपवास केला.
चौथ्या वर्षी (२०२०) मी व माझ्या अनेक किसानपुत्र मित्रांनी पुण्यात उपवास केला.
सहाव्या वर्षी (२०२१) पहिली पदयात्रा निघाली. औंढा ते चिलगव्हाण. चिलगव्हाण येथे मशाल पेटवून उपवासाची सांगता करण्यात आली.
सहाव्या वर्षी (२०२२) आंबाजोगाई (जि बीड) येथे सामूहिक उपवास केला. या वर्षी पानगाव ते आंबाजोगाई अशी पदयात्रा काढण्यात आली.
यावर्षी (वर्ष ७ वे – २०२३) खानदेशातील धुळे येथे उपोषण करणार आहोत. किनगाव (जळगाव) ते धुळे अशी पदयात्रा निघणार आहे. अमरावती जिल्ह्यातही पदयात्रा निघणार आहे.
महाराष्ट्रातील लाखो स्त्री-पुरुष दरवर्षी १९ मार्चला उपवास करतात. अनेक जिल्ह्यातील कित्येक गावात सामूहिक उपवास केला जातो. देशात विविध राज्यातील किसानपुत्र वैयक्तिक उपवास करतात. विदेशात गेलेले किसानपुत्र देखील उपवास करतात.
हे उपोषण कोण्या एका संघटनेचे किंवा कोण्या एका राजकीय पक्षाचे नाही. ज्यांना शेतकºयांबद्दल बांधिलकी वाटते, त्या सर्वांनी एकत्र येऊन उपवास करणे चांगले. अशा स्थितीत आपले सर्व अभिनिवेश बाजूला ठेवावेत.
एकत्र न येताही आपण आपल्या बॅनरखाली उपोषण करू शकता. एवढेच नव्हे तर एकट्याने सुद्धा उपवास करू शकता. उपवास करायला कोणावरही बंदी नाही.
या उपोषणाच्या निमित्ताने कोणताही वाद उपस्थित होणार नाही याची काळजी घ्यावी.
एका अत्यंत गंभीर विषयावरील हे उपोषण होत आहे, त्याचे तेवढे गांभीर्य कायम ठेवावे.
विशेष सूचना –
हे उपोषण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत करता येईल.
सार्वजनिक उपोषण सकाळी १० ते सायं. ५ या वेळेतही करता येईल.
डायबेटीज किंवा अन्य रुग्ण वा वृद्ध व्यक्तीने आपल्याला झेपेल एवढ्याच वेळेपुरते उपोषण करावे.
विद्यार्थ्यांनी व लहान मुलांनी दोन मिनिटे मौन पाळून आत्महत्या केलेल्या शेतकºयांचे स्मरण करावे.
शेतकºयांच्या आत्महत्या सातत्याने होत आल्या आहेत. दर वर्षी हजारो आत्महत्या होत आहेत. खरे तर, या सरकारने केलेल्या शेतकºयांच्या हत्या आहेत. आपल्या अवती भोवती वणवा पेटला आहे. तो विझवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. सर्जकांना स्वतंत्रपणे सुखाने व सन्मानाने जगता यावे यासाठी ही धडपड आहे. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने त्यात सहभागी व्हावे! ही काळाची गरज आहे.

– अमर हबीब, आंबाजोगाई
८४११९०९९०९



