थोडसं मनातलंबोल अनुभवाचेमुख्य स्टोरी

माझे बाबा…

संपूर्ण पंचक्रोशीचे लाडके उदयअण्णा...

असं म्हणतात की, तुमच्या संपूर्ण आयुष्यावर ज्या व्यक्तिमत्वाचा पगडा असतो, ती पहिली आणि एकमेव व्यक्ती आपले वडीलच असतात. आम्हां मुलींसाठी तर बाबा म्हणजेच हिरो…  आयडॉल…  आणि माझे बाबा होतेच तसे… माझ्या बाबांचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारीला असतो, म्हणून भावंडांमध्ये एक विशेष माज मी दाखवत आले. लहानपणापासून बाबांना शेती करताना पाहिले तसेच राजकारणात रमतानाही अनुभवले. क्रिकेट आणि सिनेमा हे त्यांच्या आवडीचे प्रांत होते. क्रिकेटची कोणतीही मॅच असो माझ्या घराचा हॉल म्हणजे स्टेडियम बनलेले असायचे… आई वैतागून जायची.. पण मॅच बघायला आलेल्या सर्व प्रेक्षकांची खातीरदारीही ती मनापासून करायची. माझ्या घरात रामायण बघायला जितकी गर्दी व्हायची त्यापेक्षा अधिक गर्दी टीव्हीवरील क्रिकेट सामना पाहण्यासाठी व्हायची… आणि आम्ही भावंडं या दोन्हीचाही आनंद घ्यायचो.  बाबा खऱ्या अर्थाने लिडर होते. स्व. वसंतरावदादा पाटील यांचे ते खंदे समर्थक होते. माझ्या घरातील अल्बममध्ये बाबांच्या उमेदीच्या काळात दादांसोबतच्या अनेक आठवणी फोटोत सामावलेल्या आहेत. अगदी १९७५ च्या आसपास इंदिराजी गांधी सांगली भेटीवर आल्या होत्या, तेव्हाचे दादांचे बाबांचे अन् इंदिराजींचे फोटो आजही जपलेले आहेत. याशिवाय शालिनीताई पाटील, राजारामबापू पाटील, शरद पवार, जयंत पाटील, डफळे सरकार, घोरपडे सरकार, यांचेसोबत बाबांचे उत्तम जिव्हाळयाचे नाते होते. बाबांच्या माघारी या सर्वांनीच ते आजवर जपले आहे.


फक्त राजकारणातीलच नाही तर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे अनेकजण विविध कारणाने बाबांच्या संपर्कात येत होते आणि अशा खूप तळमळीच्या लोकांमुळे बाबांना खूप चांगले काम करता आले. त्यांच्यामुळे अनेक चांगल्या मूल्यांसोबत माझी नाळ कायमची जोडली गेली. मी जज (न्यायाधीश) बनावे ही त्यांची माफक अपेक्षा होती. आज पत्रकारीतेतील यशस्वी १५ वर्षे, पाच राज्यस्तरीय पुरस्कार आणि त्यानंतर अडखळत सुरु केलेला हा वकिलीचा प्रवास, या सगळ्यामागे त्यांचा आशीर्वाद होताच हे मी मानते. कदाचित आजवर माझ्याकडून झालेल्या कळत नकळत चुकांची कबुली…  बाबांप्रती असणारी अपार माया… त्यांच्या माघारी कळालेली त्यांची किंमत आणि त्यांच्या नसण्याने अनुभवाला येणारे पोरकेपण… अशा संमिश्र जाणिवेतून आकाराला येणारी ही लेख मालिका… माझ्या बाबांना समर्पित…

मोठा मित्रपरिवार… असंख्य माणसे जोडली बाबांनी… आज बाबांना जावून २१ वर्षे झालीत पण आजही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची, त्यांची आठवण काढून त्यांच्या कर्तबगारीवर भरभरुन बोलणाऱ्यांची संख्या काही घटत नाही… आयुष्यभर हा माणूस माणसे जमवत राहिला… मित्र जपत राहिला… कोणीही दुखावणार नाही याची काळजी घेत राहिला… मला वाटतं माझ्यात बाबांचे काही गुण आलेत, पण मैत्री जोडण्यात आणि निभावताना कराव्या लागणाऱ्या कसरतीत मी कुठेतरी कमी पडते… असो.

मालिकेच्या पुढच्या काही भागांतून जाणून घेवूया माझ्या बाबांच्या कर्तबगारीचे अनेक पैलू…

Related Articles

Back to top button