कोवळ्या मनांना जपताना

याड लागलं मराठीचं..!

- अ‍ॅड. योगिनी बाबर

दीपिका पदुकोण, माधुरी दीक्षित, तमन्ना भाटिया, प्रियांका चोप्रा.. ही नावे नजीकच्या काळात मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या तारका म्हणून नावारूपास आली तर मराठी चाहत्यांना सुखद धक्काच असेल. दुसरीकडे सई, अमृता, पूजा, भार्गवी.. अशा कितीतरी नावाजलेल्या मराठी अभिनेत्रींना मात्र तगडय़ा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जोरदार धडपड करावी लागणार, असे काहीसे चित्र कधी नव्हे ते मराठी सिनेसृष्टी अनुभवते आहे.

‘पद्मावत’च्या अभूतपूर्व यशानंतर भलत्याच फॉर्मात असणा-या दीपिका पदुकोणने आपण मराठी सिनेमांत काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगत ऐतिहासिक यश मिळवलेल्या ‘सैराट’ या सिनेमाचे तोंडभरून कौतुकही केले आहे. नागराज मंजुळेंच्या गेम चेंजर ‘सैराट’मुळे भल्या भल्यांना मराठीचे आकर्षण वाटू लागले आहे. नुकत्याच संक्रांतीच्या मुहूर्तावर ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने ‘बकेट लिस्ट’ या मराठी सिनेमाची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. गतवर्षापासून दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियानेही ‘एबीसी’ नावाच्या मराठी सिनेमात सहभाग घेतला आहे. या सिनेमाचे शूटिंग जवळपास संपत आले आहे. ‘कॉन्टिको’फेम प्रियांका चोप्राने प्रत्यक्षात मराठी सिनेमांत काम केले नसले तरी आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून ‘व्हेंटिलेटर’, ‘काय रे रास्कला’ आणि ‘फायरब्रण्ड’ हे तीन मराठी सिनेमे दिले आहेत, पैकी ‘फायरब्रण्ड’चे प्रदर्शन बाकी आहे. या तिघींशिवाय रवीना टंडन, श्रीदेवी, काजोल या अभिनेत्रींसह अनेकजणी मराठीत काम करण्यास उत्सुक आहेत. फक्त अभिनेत्रीच नाही, तर अजय देवगण, रोहित शेट्टी, शाहरुख खान, अक्षयकुमार या कलाकारांनाही मराठीचे वेड लागले आहे. अजय देवगणने आपल्या बॅनरखाली पहिलाच मराठी सिनेमा नाना पाटेकरसारख्या तगडय़ा कलाकाराला सोबत घेऊन पूर्ण केला. आजवर मराठीतून हिंदीत जाणा-या अभिनेत्रींचे विशेष कौतुक होत होते. आता मात्र हिंदीतून मराठीत येणे प्रतिष्ठेचे मानले जात आहे.

‘सैराट’ या सिनेमाने सर्वच पातळीवर इतिहास रचल्यानंतर मराठी सिनेसृष्टीकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन व्यावसायिकतेकडे वळला आहे. ‘सैराट’मध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या नवख्या, अल्लड तरुणांच्या मनाला चटका लावणा-या अभिनयाने अनेकांनी ‘सैराट’च्या धर्तीवर त्याच्या आसपास कथानक असणा-या सिनेमांची जंत्री लावली. अनेक मराठी सिनेमांत पोरसवदा वयाच्या मुला- मुलींना नायक-नायिकेच्या रूपात सादर केले गेले, काहींनी तर आपल्या मुलांच्या हौसेकरिता घरदार विकून सिनेमे काढले. असा प्रवाह एकीकडे तर दुसरीकडे ‘सैराट’चे विविध भाषेत झालेले रिमेकही महत्त्वपूर्ण ठरले. हिंदी रिमेकमध्ये चमकणारी श्रीदेवीची स्टार कन्या जान्हवीनेही आपल्याभोवती ग्लॅमर जमवण्यात बाजी मारली.

मराठी सिनेमांत गत काही दिवसांपासून अनकेविध प्रयोग होत आहेत. सुवर्णकमळ, राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत मराठीचा डंका वाजतो आहे. असे असले तरी मराठी सिनेमांना अद्यापही मल्टीप्लेक्सचे शो मिळत नाहीत. एकाच दिवशी बडे स्टार कास्ट असणारे हिंदी, इंग्रजी सिनेमे असतील तर मराठीला थिएटर मिळत नाहीत आणि मिळालेच तर प्राईम टाईम मिळत नाहीत. यापुढे जाऊन असे म्हणता येईल की, मल्टीप्लेक्स मिळाले तरी प्रेक्षक सर्वच मराठी सिनेमांकडे वळत नाहीत. म्हणूनच तर अनेक निर्माते ‘पेड शो’ करून आपली ‘हाउसफुल्ल’ची हौस भागवून घेतात. अनेक पुरस्कार प्राप्त सिनेमे मुंबईतल्याच प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत, तिथे राज्यातील ग्रामीण भागांतील थिएटरची काय कथा..? मराठी सिनेमे पूर्वी यात्रा-जत्रांच्या काळात तंबूत सर्वाधिक कमाई करून द्यायचे. त्यावेळी आठ-दहा दिवस चालणा-या गावोगावच्या यात्रा आता एक ते दोन दिवसांवर आल्यात. त्यातही वितरक, तंबू मालक आणि निर्माता यांच्यातील गणिते हल्ली बिघडतच चालली आहेत. त्यामुळे हा मार्गही मराठी सिनेमांना बंद झाला आहे. त्यामुळे एकटय़ा ‘सैराट’च्या यशावर हुरळून न जाता मराठी चाहत्यांना काय अपेक्षित आहे याचा विचार व्हावा, असे वाटते.

आपल्याकडे तयार होणा-या अनेक मराठी सिनेमांच्या कथा हिंदी, इंग्रजीवरून उचललेल्या असतात. मराठी नाटकांप्रमाणेच सिनेमांनाही योग्य कथा, संहिता मिळत नाहीत. (माधुरी दीक्षित करीत असलेल्या ‘बकेट लिस्ट’ या नावाचा एक इंग्रजी सिनेमा चाहत्यांनी अनुभवला आहे. यात नायक आणि नायिकेला कॅन्सर झालेला असतो. काही महिन्यांचा कालावधी त्यांच्याकडे असता, आपल्याकडे उरलेल्या काळात आपण लहानपणापासून जे जे करावयाचे राहून गेले ते ते करावे यासाठी हे दोघे मिळून एक ‘बकेट लिस्ट’ बनवतात आणि त्यानुसार वाटय़ाला आलेले आयुष्य भरभरून जगतात. कदाचित माधुरी आणि सुमित राघवन हीच कथा मराठीत सांगतील.) एकूणच प्रेक्षकांची अभिरुची बदलते आहे, असा गवगवा करत आपल्याला जे सोयीचे आहे ते थोडेसे तिरक्या हाताने मराठीत मांडायचे, असे मराठी सिनेमाचे तंत्र दिसते. यापलीकडे जाऊन मराठीचा दर्जा वाढविताना, अभिरुचीसंपन्न सिनेमे प्रेक्षागृहात आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता कलाकारांनीच पुढे येण्याची गरज आहे. तरच दर्जेदार कलाकार, निर्माते यांच्या अभिनय कौशल्यातून साकारलेल्या कलाकृती राज्यातीलच नाही तर देशविदेशांतही सहजपणे अनुभवता येतील. ‘सराट’नंतर मराठीकडे हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा ओढा वाढतो आहे, ही गोष्ट स्वागतार्ह आहे. हा बदलता प्रवाह पचवतानाच तो स्थिर ठेवण्याचे आव्हान ख-या अर्थाने मराठी सिनेसृष्टीसमोर आहे.

Back to top button