विशेष भाष्य

आमच्या गादीले खतरा?

- निरंजन मार्कंडेयवार

निरंजन मार्कंडेयवार

ब्रेक के बाद!
————

(महाराज सिंहासनावर बसण्याच्या तयारीत. तोच नवीन वर्षाचा हँगओव्हर अद्यापही न उतरलेला. त्यांचा लाडका बारक्या प्रधान दरबारात प्रवेश करतो.)
बारक्या प्रधान : महाराजांचा विजय असो! विजय असो!
महाराज : महाराजांचा विजय म्हणजे आमच्या प्रजाजनांचा विजय! बोल बारक्या! काय म्हंते आमच्या राज्याच्या अन् प्रजेचा हालहवाल? काय रिपोर्ट काय हाय?
बारक्या प्रधान : रिपोर्ट? च्या पित्तरले! प्रजेचा म्हंजी लोकाईचा काय रिपोर्ट इचारता? रिपोर्ट तं तुमचा द्यायले गेल्या हाय राणीसरकार!
महाराज : अरे, उतरली नाई काय तुयी अजून?
बारक्या प्रधान : महाराज! लावणी, भिंगरीची कसम अन् ब्लॅक लेबलच्या ढक्कनची आन घेऊन सांगतो हाय. तुम्ही न्यू इयरच्या रातीले गायब व्हते, म्हणूनस्यानी राणीसरकार तुमचाच रिपोर्ट द्यायले गेल्या हाय सुरक्षा प्रमुखाकडं!
महाराज : आमी कोठं जावं बी नाई का र घडीभर? डायरेक्ट आमचाच रिपोर्ट? अरे! काय चालू हाये हे आमच्या राज्यात?
बारक्या प्रधान : थेच तं म्या म्हणून रायलो हाय!
महाराज : नानसेन्स! आम्हाले आमच्या इरोधकाची खबरबात, त्याईचा रिपोर्ट सांगा!
(बारक्या खिसे चाचपडू लागतो. महाराज खवळतात.) रायटिंगमंदी नाई पायजे. तोंडानंच बकर कर!


बारक्या प्रधान : जी महाराज! तुमचे समदे इरोधक…… त्यायनं जे नवीन वर्षाले संकल्प केले व्हते, त्याईच्यातच मशगूल हायेत. तुमच्या विरोधात कायी काडी-कुल्फ्या, कारस्थानं करण्यात त्यायचं लक्षच नायी. ते त्याईच्या न्यू इअरच्या संकल्पात इतले गुतले हाये का तुमच्या गादीले कवडीचाबी खतरा नाही!
महाराज : कोंते संकल्प रे बारक्या? अन् थे का रायते?


बारक्या प्रधान : बाप्पे! बाप्पे! आहो, संकल्प म्हंजी निश्चय! जसा तुम्ही नं चार वर्षापूर्वी केल्ता का न्यू इयरच्या पहिल्याच दिवशी व्यायाम अन् योगासनं करूनस्यान आपला वजन घटवाचा. तेलकट-तुप्पट खावाचा नाई. हातात डंडू घेतलेल्या टीव्हीवाल्या पोरीबारीले मुलाखती अन् बाईट द्यायचे नै! महाराज, संकल्प म्हंजी निर्धार! जसं तुम्ही नं तीन वर्षापूर्वी ठरोलं होतं कां सालभर राती बाराच्या अंदरमंदीचं झोपी जाणार. पायटेच्या रामपहरी फिराले जाणार. दिवसातून एक डावच्याच ढोसणार!
महाराज : हं, आलं, आलं, आमच्या डोस्क्यात! लय टिपीर-टिपीर नगं लावू अता. चूप राय आता! बकर कर बंद!
बारक्या प्रधान : हे तं खूबच झाली जी! तुम्हीच इचारता अन् तुम्हीच थोबाड बंद कराले सांगता!


महाराज : हिथं महाराज कोण हाये बारक्या?
बारक्या प्रधान : जो सिंहासनावर बसते तो महाराज!
महाराज : मंग आम्ही आता बसेल हाय सिंहासनावर! अन् आम्हाले कंदी कोनं इच्यारलं कां रे का आम्ही पायटे फिराले जाणं काऊन सोडलं तं?
बारक्या प्रधान : तुम्हाले कोण इचारनंर बाप्पा? तुमच्या मर्जीचे तुम्ही मालक! तुम्हाले वाटलं तं तुम्ही दुपारी बाराले जा फिराले! तुम्हाले कोण इचारते? तुम्हाले वाटलं का थ्या जिमगिममंदी नाई व्यायामगियाम कराचा तं नका करू. गादीवरच कुस्त्या खेया. कोण सवाल करते तुम्हाले? तुम्ही वजन कमी केल्या काय अन् नाय केला काय? राजाचा किताब काय किलोमंदी केल्यावर भेटते का? अन् तुम्ही मीडियावाल्याईपुढं शांत रायले काय अन् सुषमा मॅम, संजूभाऊवानी बोलले काय? तुमचं लोकं ऐकते तरी का?
महाराज : अरे! हिंगरबिट्ट्या! तू सरका बोलून रायला का उलटा बकून रायला?
बारक्या प्रधान : मी तुमचा खासमखास प्रधान हाओ महाराज! मी जे बोलन ते तुमच्या हिताचंच बोलन का नाय?
महाराज : थे बी बराबरच हाय म्हणा! म्हून तं तुले आमचा प्रधान ठेवला हाय आम्ही! तू आमच्या राणीसरकारचा भाऊ हाये म्हून तुले थोडाच नेमला हाये!
बारक्या प्रधान : थे तं मले बी माहीत हाये.
महाराज : पर आमच्या डोस्क्यात जरा येगळीच शंका येऊन रायेल हाये.
बारक्या प्रधान : शंका लय खतरनाक रायते, महाराज. तुरंत डोस्कं खाली करा.
महाराज : मले हे सांग बारक्या, आम्ही चार वर्षापासून एवढे संकल्प करून रायलो हाये. पर आमचा एकबी संकल्प, एकबी निश्चय, एकबी निर्धार पुरा नाही झाला.
बारक्या प्रधान : करेक्ट बोल्ले महाराज!
महाराज : सायाच्या महाराज नेहमी करेक्टच बोलत असते. अन् जवा आमचेच संकल्प पुरे झाले नाई, तं आमच्या इरोधकाचे संकल्प कसे पुरे होतीन रे? अन् तू तर आमाले सांगून रायला का ते इरोधक त्यायच्या संकल्पात मशगूल हाय म्हून? आमच्या गादीले काही खतरा नाही म्हून?
बारक्या प्रधान : मंग मी तेच तं कानी टाकून रायलो महाराज! अहो! विरोधक म्हंजीबी तुमचेच प्रजानन हायेत ना! जवा तुमचेच संकल्प पुरे नई झाले, तं त्यायचे संकल्प कसे पुरे होतीन?
महाराज : म्हंजी आमच्या गादीले खतरा नाय? तुले का म्हणाचं का हाये?
बारक्या प्रधान : हेच का तुमचे इरोधक तुम्हाले गादीवरून हटवाचा संकल्प करून रायले हाये. अखीन एकडाव सांगतो, जवा तुमचेच संकल्प पुरे नई झाले, तं त्यायचे संकल्प कसे पुरे होतीन? तुमची गादी सलामत रायनार हाये!
महाराज : आँ? का बोलतस का बारक्या?
बारक्या प्रधान : मंग का त? बाकी ब्रेक के बाद!

– निरंजन मार्कंडेयवार
१०३, बाजी प्रभूनगर, पांढराबोडी पोलीस चौकी रोड,
रामनगरमागे, नागपूर-४४००३३
मोबाईल ९०२१९२६३३७

Related Articles

Back to top button