प्रेम, पैसा, सेक्स, धोका, गुन्हेगारी..

– अॅड. योगिनी बाबर
निर्भया, कोपर्डी, सोनई, नितीन आगे.. आणखीन कितीतरी.. समाजात घडणा-या प्रत्येक गुन्ह्याचा चेहरा-मोहरा वेगळा असला तरी त्यांचा ‘मोटीव्ह’ एकच असतो. कोणाचा तरी बदला घेणे, धडा शिकवणे, लुबाडणे, झटपट पैसा, मजा, जातीसाठी माती खाणे आणि खूप काही.. त्या सर्वाच्या मुळाशी प्रेम, पैसा, सेक्स, धोका आणि शेवटी गुन्हा हेच तर आहे. तरुणाई सध्या प्रेम, पैसा, सेक्स, धोका आणि गुन्हा याच पंचसूत्रीवर जगते आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पण या पंचसूत्रीचा हव्यास अनेकांच्या जीवावर तर उठतोच शिवाय समाजमन ढवळून टाकणारा ठरतो.
काही दशकांपूर्वीपर्यंत गरीब, वंचित कुटुंबातील, झोपडपट्टीत राहणारे तरुण हे गुन्हेगारच असतात, असा एक समज होता. त्यामुळे सरसकट अशा मुलांना पोलिसांकडूनही टार्गेट केले जायचे. गुन्हा कोणताही घडला तरी पोलिसांचा ससेमिरा अशाच वस्त्यांच्या मागे लागायचा. मात्र, हे चित्र सपशेल बदलले आहे. आता गुन्हेगाराचे वय दिवसेंदिवस कमी होते आहे, ही भयंकर समस्या आ वासून समाजासमोर उभी असतानाच, समाजातल्या उच्चभ्रू वर्गातील तरुण-तरुणींमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होते आहे. अनेकदा बाईक चोरी, एटीम, बँकांची लूट, हॅकिंग, सायबर गुन्हे, बलात्कार, ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह, अपहरण, रॅगिंग, ब्लॅकमेलिंग, सेक्स रॅकेट, अमली पदार्थ तस्करी अशा अनेक अवैध व्यवसायात, गुन्ह्यांत बडय़ा घरातल्या तरुणांचा राजरोस सहभाग आढळतो. निर्भया, कोपर्डी, सोनई, नितीन आगे.. आणखीन कितीतरी.. समाजात घडणा-या प्रत्येक गुन्ह्याचा चेहरा वेगळा असला तरी त्याचा ‘मोटीव्ह’ एकच असतो. कोणाचा तरी बदला घेणे, धडा शिकवणे, लुबाडणे, जातीसाठी माती खाणे आणि खूप काही. त्या सर्वाच्या मुळाशी प्रेम, पैसा, सेक्स, धोका आणि शेवटी गुन्हा हेच तर आहे. तरुणाई सध्या प्रेम, पैसा, सेक्स, धोका आणि गुन्हा याच पंचसूत्रीवर जगते आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पण, या पंचसूत्रीचा हव्यास अनेकांच्या जीवावर तर उठतोच शिवाय समाजमन ढवळून टाकणारा ठरतो.
जे स्लम एरियातून येतात, त्यांच्यापैकी बहुतांश मुलांना वयाच्या ८ ते १० व्या वर्षापासून पैशासाठी कष्ट करावे लागतात. परिस्थितीने आधीच पिचलेल्या या मुलांना बहुतेकदा लैंगिक, आर्थिक शोषणाला सामोरे जावे लागते. व्यसनाधीनता, अल्पवयातील गुन्हेगारी संगत, गरिबी, शिक्षणाचा अभाव अशा कारणाने ही मुले गुन्हेगारीकडे सहज वळतातच. ज्या घरातील मुलांचे आई-वडील दोघेही नोकरी करणारे असतात, त्या घरात दिवसभर शाळा, क्लास करून ही मुले घरी कधी येतात, कधी खेळायला जातात याचा थांगपत्ताच पालकांना नसतो. अनेकदा मुले चार-चार, पाच-पाच दिवस शाळेत, क्लासमध्येही नसतात. जोपर्यंत शाळेतून फोन येत नाही, तोपर्यंत पालकांना काहीच कल्पना नसते. अशा बेजबाबदारपणामुळे मुले गुन्हेगारीकडे वळताना दिसतात.
गुन्हेगारीत सहज वळणारा आणखी एक घटक म्हणजे एकटी मुले. ज्या पालकांना एकुलते एक मूल आहे, त्याचा हट्ट काहीही करून पुरवण्याकडे आई-वडिलांचा कटाक्ष असतो. मुलांच्या तोंडातून शब्द पडायचा अवकाश की, सगळ्या वस्तू हजर करण्यातील धोका पालकांच्या तेव्हाच लक्षात येतो, जेव्हा ‘ब्लू व्हेल’सारख्या गेम्सचे ते स्वत:च शिकार होतात. गुन्हेगारीतला नवा तरुण चेहरा म्हणजे ‘आम्ही नाही हो त्यातले’ अशी मानसिकता असणा-या उच्चभ्रू वर्गातील मुलेही सहजपणे गुन्हेगारीकडे वळत आहेत. या तरुणांकडून होणा-या गुन्हेगारीचे केंद्र पैसा, नशा, सेक्स आणि रिव्हेंज इतकाच आहे. शाळेतून बाहेर पडायच्या आधीच मुलांच्या हातात येणारे स्मार्टफोन्स, इंटरनेट अॅक्सेस, एका क्लिकवर खुणावणारे वाट्टेल ते जग, हातातला मुबलक पैसा आाणि पालकांच्या मनात असणारे अपार प्रेम.. मुलांनी काहीही केले तरी त्यांना प्रोटेक्ट करत प्रसंगी, पोलीस, न्यायव्यवस्थेलाही आव्हान देणारे, पैशाच्या जीवावर नियम, प्रशासन धाब्यावर बसवणारे पालक.. या सर्वामुळे मुलांना आपण काही चुकतोय असे वाटतच नाही.
मुलांमध्ये येणारे नैराश्याचे कारण स्मार्टफोन ठरू लागल्याचे एक अहवाल सांगतो, तर मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, स्मार्टफोनच्या वापरामुळे मुले गुन्हेगारीकडे पटकन वळतात. हल्लीच्या तरुणांमध्ये दोन प्रकार अत्यंत धोकादायकपणे समोर येत आहेत. एक म्हणजे कोणाचेच वर्चस्व कोणत्याच पातळीवर मान्य न करणे, स्वत:च्या सुखाकरिता कोणतीही गोष्ट सहजपणे ओरबाडून घेणे, त्याकरिता एखाद्याला मारून टाकायला लागले, खोटे बोलायला लागले तरी त्याची पर्वा नसणे, यातून घडणारे गुन्हे अधिक दाहक आहेत. अशाच मानसिकतेत असणा-या वापीच्या एका उद्योजकाच्या जेमतेम २५ वर्षाच्या निमिष तन्ना या गुजराती युवकाने आपल्यासोबत मैत्रिणीच्या बर्थ डे पार्टीला आलेल्या प्रतीक पटेल या २४ वर्षीय मित्राला मुंबई गुजरात हायवेवर तलासरी येथे आधी क्रिकेट बॅटने मारहाण केली आणि नंतर त्याच्या कारला मागून जोरदार धडक देतानाच त्याला आधी गाडीतून बाहेर काढले आणि निर्दयीपणे त्याला आपल्या महागडय़ा कारच्या चाकाखाली एकदा नव्हे, तर तब्बल तीनदा चिरडून टाकले.. हा प्रकार घडत होता, तेव्हा निमिष तन्नासोबत त्याच्या कारमध्ये त्याची मैत्रीण होती, तर प्रतीकसोबत त्याचे मित्र होते. या अपघाताने अवाक् झालेले प्रतीकचे मित्र मदतीसाठी पोलिसांना फोन करत राहिले, तर निमिष मात्र आपल्या मैत्रिणीसह पळून गेला. वापीतील एका प्रथितयश गुजराती व्यापा-यांच्या मुलांचे हे दुर्दैवी जग! बर्थ डे पार्टीत निमिषच्या मैत्रिणीवरून प्रतीकने काही कमेंटस पास केल्या आणि पुढे इतका अनर्थ घडला. तर दुसरीकडे केवळ आपल्याला शाळेला सुट्टी पाहिजे या कारणाकरिता दिल्ली हादरवून टाकणा-या दोन घटना पाठोपाठ घडल्या. त्यात एक मुलगा जेमतेम ११ वर्षाचा, तर दुस-या घटनेतील मुलगी इयत्ता सातवीत शिकणारी फक्त १३ वर्षाची. दोघांनीही आपल्यापेक्षा लहान असणा-या बालकांना टार्गेट केले. या घटना मन अगदी सुन्न करून टाकतात.
मुंबईसह महाराष्ट्रात अनेक घटनांत बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे, हे गुन्हे शाखेचा अहवाल मान्य करतो. मागच्या आठवडय़ात पुण्यातल्या १३ वर्षाच्या तीन मुलांनी ४ ते ५ वयाच्या बालिकेवर बलात्कार केला. ज्यांना आपल्या शरीराची ओळखही पुरती झालेली नाही, असे किशोर रोज जे सहजपणे डोळ्यांसमोर दिसते, आसपासच्या वातावरणात, घरात कानावर पडते त्याचेच अनुकरण करतात. कदाचित हाच धोका ओळखून न्यायालयाने दिवसभर विविध चॅनेल्सवर कार्यक्रम कमी आणि कंडोम्सच्या जाहिराती अधिक, असा जो मनमानी प्रकार सुरू होता, त्याला लगाम घातला आहे. अर्थातच त्यालाही विरोध करण्याचे षड्यंत्र सुरूच आहे.
दुस-या प्रकारच्या गुन्हेगारांमधले तरुण-तरुणी दुस-याला इजा न करता स्वत:ला इजा करण्याला प्राधान्य देतात. मग त्यात आत्महत्या, अमली पदार्थाचे व्यसन आदींकडे वळणा-यांची संख्या वाढते आहे. भले आत्महत्या करणे हा पूर्वी गुन्हा मानला जात होता, आता मात्र त्याच्या कारणांना आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे, त्यामुळे स्वाभाविकच एखाद्या सुखी कुटुंबातील उच्चशिक्षित, नोकरदार मुलगा, मुलगी जेव्हा आत्महत्या करतात, तेव्हा समाजातून अनेक प्रतिक्रिया उमटतात, ज्यांचा थेट हल्ला हा पालकांवरच असतो.
काहीही असले तरी कुटुंबातला हरवत चाललेला संवाद हेच याचे प्रमुख कारण आहे. एकाच घरात राहणारे अनेकजण जेव्हा आपापल्या विश्वात दंग असतात, तेव्हा आधी दुराव्याची, मग नैराश्याची आणि सरते शेवटी गुन्हेगारीची ठिणगी पडतेच. याकरिता घरातल्या प्रत्येकाने एकमेकांप्रती आपुलकी, सामंजस्य, आदर, प्रेम जपणे, एकमेकांशी अखंड संवाद आणि विश्वासार्हता जपणे महत्त्वाचे ठरते. ‘मुले काय आपली आपण होतील की मोठी, त्यात काय एवढं..!’ असे म्हणणारी पिढी मागे पडली असली तरी मुलांच्या मानगुटीवर बसून आपल्याला हवे तेच ते करतील, असे अति जाचक पालकत्व निभावणेही तितकेच धोकादायक आहे. कोणताही अतिरेक, मग तो सैल सोडण्याचा वा घट्ट पकडून ठेवण्याचा घातकच आहे. हे आता सर्वच थरांतील पालकांनी सजगतेने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. कुटुंबा-कुटुंबातील नाती सक्षम होतील तरच समाज सक्षम आणि सुरक्षित राहील, हा विश्वास आजही कायम आहे



