
काळ झपाट्याने बदलत असतो. तो कोणासाठी थांबत नाही. अनेक स्थित्यंतरे काळाच्या उदरात गडप होतात आणि प्रकटतात. ती स्थित्यंतरे काळाबरोबर जातात. ती त्या काळाची होवून जातात आणि काळाबरोबर जात नाहीत, ती कालबाह्य होतात. पण कालबाह्य गोष्टी काही मूल्ये घेवून काळाच्या बाहेर फेकली जातात आणि समाज त्यांना कालबाह्य ठरवतो तेव्हा तो विषय चिंतेचा ठरतो. चिंतेचा विषय चिंतनाला प्रवृत्त करतो आणि मग काळाच्या कसोटीवर ते चिंतन चिंतनशील मनाचा ठाव घेते.
तात्या माझा मित्र होता. तो आणि मी इयत्ता १ ली ते मॅट्रीकपर्यंत बरोबर शिकलो. तो अत्यंत हुशार विद्यार्थी होता. त्या मानाने मी साधारणच होतो. परंतु तात्याबरोबर मी बाकावर बसायचो, म्हणून तात्याच्या हुशारीचा थोडाफार भाग माझ्या वाट्याला येत होता. तात्याचे अक्षर मोत्यासारखे स्वच्छ आणि सुंदर होते. गरीब कुटुंबातून आलेला तात्या ३ कि.मी. खेड्यावरून पायी यायचा. भाकरी बरोबर बांधून आणत होता. मधल्या सुटीत तात्याची भाकरी आम्हां मित्र-मंडळींनाही कधी-कधी मिळायची. त्याला सुदाम्याची पोह्याची चव होती आणि हुशारीचा सुगंध होता.
तात्या फारसे बोलायचा नाही. अबोल असला तरी बुध्दीने तल्लख होता. शिक्षकांचे त्याच्याकडे बारकाईने लक्ष होते. मॅट्रीकलाही तो पहिला आला. नंतर तंत्र महाविद्यालयात शिकायला गेला. इंजिनिअर झाला आणि मध्ये ४५ वर्षे तात्याची आणि माझी भेटच नव्हती.
एवढ्या दीर्घ कालावधीत तात्याची छबीही मी विसरलो. डोक्यावर विपुल केस असणारा तात्या आज डोक्यावर केस नाहीत म्हणून टोपी घालतो आणि एक दिवस दुसऱ्या मित्राच्या चौकशीमध्ये तात्याची विचारपूस केली तेव्हा मला कळले की, तात्याने सेच्छानिवृत्ती घेतली. तो वीज वितरण कंपनीकडे अभियंता म्हणून नोकरीस होता. एक दिवशी गेल्या पंधरवड्यात माझा दुसरा मित्र तात्याला माझ्याकडे घेवून आला. तेव्हा गप्पांच्या ओघात तात्या विदारक सत्य बोलून गेला. तो म्हटला की, मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ‘का घेतली’, असे विचारता तात्या म्हणाला की, ‘मी एका ठेकोराकडून पैसे/लाच घेतली नाही म्हणून त्याने मला गाडीतून उतरून दिले व म्हटले की, तू जगायला लायक नाहीस.’
तात्याचे हे वाक्य मला विचार करण्यास भाग पाडणारे होते. ज्या मूल्यांसाठी आयुष्याची होळी केली आणि ती मूल्ये जपताना जगायला नालायक ठरणे, ही गोष्ट मूल्य नैतिकतेच्या बाजारात मूल्यांचीच चिता रचली जात आहे आणि त्या चितेत तात्यासारखी माणसे होरपळून जात आहेत. ही खंत केवळ तात्याचीच नाही, तर तात्या हा एक प्रतिनिधी आहे. तो प्रतिनिधी मूल्य सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बहुसंख्य माणसे त्या नैतिकतेची चिता रचीत आहेत. हे वास्तव, हे या काळाचे चित्रण आहे. वास्तव आहे. नाकारणारी पिढी चितेशेजारी होरपळते आहे आणि चितेच्या ज्वाला अंगावर घेते आहे. त्याचा प्रतिनिधी हा तात्या आहे आणि तो गतपिढीचा प्रतिनिधी आहे. तो खरेच कालबाह्य झाला आहे का, ही चिंता चिंतनाचा विषय आहे. म्हणूनच हे मुक्त चिंतन…!



