

कोरोना काळात आपण सर्वजण महामारीच्या सावटाखाली उद्याच्या काळजीत होतो… त्या अत्यंत गंभीर वातावरणात आपलं जगणं हास्यमय, तणाव विरहीत करण्याचे काम कुणी केलं असेल तर ते सोनी मराठीवरुन प्रदर्शित होणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या मालिकेने आणि या मालिकेत समरस होवून सादरीकरण करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने…! या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपली व्यक्तिगत दु:खे बाजूला ठेवून प्रेक्षकांना जिवंत ठेवलं… हसत ठेवलं… त्यांच्याप्रती कृतज्ञ राहून त्यांच्यातील एक अत्यंत गुणी आणि प्रचंड ऊर्जाशील, तरुण कलाकार शिवाली परब हिच्याशी ‘गार्गी’च्या पहिल्याच डिजिटल अंकासाठी संवाद साधला असता तिने उलगडलेला तिचा प्रवास खास ‘गार्गी’च्या वाचकांसाठी…
‘गार्गी’च्या पहिल्याच डिजिटल अंकासाठी माझी निवड होणं, हीच माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आम्हा कलाकारांना अशी संधी मिळणं आणि या माध्यमातून सर्वदूर आमची ओळख होणं आमच्यासाठी महत्वाचे असते. कल्याणसारख्या शहरांतून आलेल्या शिवाली परबला आता महाराष्ट्राची शिवाली अशी सन्मानाची, आपुलकीची ओळख मिळते आहे हे एक कलाकार म्हणून मला खूप सुखावणारं आहे… ‘गार्गी’ला सांगत होती महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ‘मोना डार्लिंग’ अर्थातच कल्याणची चुलबुली शिवाली परब.

हास्य जत्रेत एन्ट्री कशी झाली या प्रश्नावर शिवाली सांगते, मी बदलापूर महोत्सवमध्ये सहभागी होते. तिथे असिस्टंट म्हणून कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी माझ्याकडे होती. याच महोत्सवात नमाताई म्हणजे नम्रता संभेराव आणि अरुण कदम यांचे एक आगरी कॉमेडी प्रवेशिका, नृत्य असा संमिश्र शो होता. त्यांना ऐनवेळी काही सहकलाकारांची गरज होती. टिपीकल आगरी, छपरी पोरं अशी अस्सल बाज असणारे मोजकेच सहकालाकार त्यांना हवे होते. आम्ही बरीच शोधाशोध केली. बऱ्याच मुलांची टेस्टही घेतली, पण समाधान होत नव्हते. मी प्रत्येकाला असं कर, ते म्हण, हा शब्द वापर असे सुचवत होते… एकंदरच माझी ऊर्जा, काम चोख करण्याची माझी तळमळ आणि माझा आगरी लहेजा आदी बघून नमाताई मला म्हणाली, ‘शिवा तूच हे काम कर…!’
मला काय संधी हवीच होती. ती अशी मिळेल असे वाटले नव्हते… मी होकार दिला आणि त्या महोत्सवात मी सहकलाकार म्हणून स्टेजवर आले. पुढे माझा सहज अभिनय लक्षात ठेवून नमाताईने माझ्यासाठी हास्यजत्रेचे दरवाजे उघडले असे म्हटले तर वावगे ठरु नये. नंतर माझी हास्यजत्रेसाठीही टेस्ट झाली आणि मी कल्याणची चुलबुली म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

शिवाली पुढे म्हणते की, मी कल्याणला राहते. माझे बाबा दीपक परब रिक्षा चालवतात, तर आई दीपाली घरकाम करायची. आत्ता दोन-चार वर्षात तिचे बाहेरचे काम करायला जाणे आम्ही थांबवले आहे. तसेही हास्यजत्रेत आल्यापासून माझं बरं चाललं आहे, मला थोडे सुखकारक पैसे, मानधन मिळू लागताच मी पहिले आईचे इतरांच्या घरी जावून काम करणे थांबवले… माझ्या आईने आणि बाबांनी आम्हा दोघी बहिणींना मला आणि माझी धाकटी बहीण स्नेहाला कधीच कोणत्या गोष्टीसाठी आडकाठी नाही केली किंवा आपल्याला परवडणार नाही म्हणून थांबवूनही ठेवलं नाही. ते दोघे कष्ट करीत होते आणि आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या पंखात बळ देण्याचे काम करीत होते.
बँकेत जॉब करणे आणि अधिकारी बनने हेच तर माझे स्वप्न होते. त्याकरीता श्रीमती रेणुबाई अंबू पावशे विद्यालयातून मराठी माध्यमातून दहावी पूर्ण केल्यानंतर उल्हासनगरमधल्या नामवंत सीएचएम कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. तिथे माझ्या स्वप्नांना थोडी कलाटणी मिळाली. कॉलेजमध्ये असताना एकांकिका, स्कीट्स, नृत्य स्पर्धा, युवा महोत्सवातून माझ्यातील कलाकार उमलत गेला. भरभरुन संधी मिळायची. टीम, मार्गदर्शक उत्साहाने सहभागी करुन घ्यायचे आणि आम्ही जीव टाकून काम करायचो… अत्यंत भारावलेले आणि खूप साºया आठवणींचे, शिकण्याचे असे ते मंतरलेले दिवस होते. या काळात मी एक कलाकार म्हणून घडत होते… पण एक नुकसानपण याच काळात अनुभवले… मी दुसऱ्या वर्षी नापास झाले… एटीकेटीसह फायनल इयरला प्रवेश तर घेतला, पण अजून मी बी.कॉम. झालेले नाही. येत्या वर्षभरात मी माझी पदवी मिळवणारच असे तूर्त तरी ठरवले आहे.

विनोदी नायिका असा शिक्का बसेल किंवा साचेबद्ध काम करावे लागेल याची भिती एक कलाकार म्हणून वाटली नाही का या प्रश्नावर शिवाली म्हणते, अजिबातच नाही. कारण एकतर आपल्या इंडस्ट्रीत काम मिळणे खूप कठीण आहे. इथे स्पर्धा खूप तीव्र आहे. आम्ही हास्यजत्रेत काम करीत असताना एकाच एपिसोडमध्ये अनेक पात्रे जिवंत करतो. एकात एक अनेक प्रवेशिका करतो. त्यात साचेबद्धता नसतेच, उलट विविध पात्र, भाव, रुपे सादर करायला मिळतात. उदा. आमचे एक स्कीट आहे शंकºया, शिवाली आणि सुरकी एक भन्नाट ग्रामीण लव्हस्टोरी. त्यात आम्ही खूपदा प्रेक्षकांना रडवतो. मला असं वाटतं की विनोदी नायिका असा शिक्का बसायला मला अजून खूप वर्षे आहेत. हास्यजत्रेचा प्लॅटफॉर्म मुळातच फक्त विनोदी नाही, तर अनेकरंगी आणि सर्वसमावेशक असा आहे. आम्ही इथे असे काही फॉरमॅट करतो की ज्यातून हे सिद्ध होते की हा कलाकार कोणतीही भूमिका साकारु शकेल. इथे प्रत्येकाच्याच वाट्याला विविध ढंगी पात्रे साकारायला मिळतात. स्वाभाविकच एक कलाकार म्हणून आमचा कस लागतो. आमच्या भूमिकेतून आम्ही नाती तयार करतो. नात्यातला संवाद साधतो. तीन तासांची लव्हस्टोरी आम्ही पंधरा मिनिटात साकारतो. रोजचा एपिसोड ही आमची एक परीक्षा आणि एक नवा कलाकार साकारण्याची संधी असते. अर्थातच वेगळेपणा देण्याचा आणि वाट्याला आलेले पात्र नेमकेपणाने, बारकाईने टिपण्याचा आणि प्रेक्षकांच्या पसंतीला दर दिवशी उतरण्याचा आमचा सर्वांचाच प्रामाणिक प्रयत्न असतो.
हास्यजत्रेतील तुझी गाजलेली पात्रे साकारताना तू कोणाचा आदर्श समोर ठेवतेस यावर शिवाली म्हणते, पात्र जेव्हा तुमच्यासमोर येते तेव्हा तुम्हाला निश्चितच अभ्यासाची आणि तालमीची संधी मिळते. मला जेव्हा मोना डार्लिंगचा रोल वाट्याला आला, तेव्हा तो बराचसा नमाताई साकारत असणाऱ्या लॉली या पात्रासारखा होता. त्यातील संवाद, विनोद आणि भाषेची फजिती बरेचसे साम्य होते. नमाताईने लॉली एका उंचीवर आणि प्रसिद्धीवर नेवून ठेवली होती. मला खूप भीती वाटत होती.

पहिल्या रोलमध्ये मी, ओंकार राऊत आणि पृथ्वीक प्रताप असे आम्ही तिघे होतो. मला कळत नव्हतं की मी वेगळं काय करु… यातच माझा तालमीचा दिवस वाया गेला. आम्ही तिघेही डोके लावत होतो, पण नेमकेपणाने सूचत नव्हतं. आमचे शूट सकाळी ७ वाजता सुरु होते. आमची तालीम तर वायाच गेली होती आणि आम्ही कोणताही गृहपाठ न करता परीक्षा हॉलमध्ये उपस्थित होतो. मला रिल्स करायला खूप आवडते. मी ते नेहमी करीत असते. त्यातूनच मी रिल्स कलाकार सर्च करु लागले. एखादा रिल्स कलाकार त्याचे मॅनेरीझम मी लक्षात घेतले. या कलाकारांना असे वाटत असते की ते स्टार आहेत. त्यांना जगात काय चालले आहे याच्याशी काहीही देणं घेणं नाही. असे चार-पाच कलाकर पकडले आणि मग ती दिसायला कशी असेल? तिचे केस कसे हायलाईटस केलेले असतील? ती किती फंकी लिपस्टीक वापरत असेल? तिचे शूज, आयशेड, मेकअप कसे असतील? तिचे कपडे कोणत्या स्टाईलचे असतील? तिच्या लूकचा असा विचार केला. त्याचवेळी बूम बूम चिक चिकी हे ट्रेडींग होते, तसेच इन्स्टाग्राम हॅशटॅगही प्रचलित होते आणि पटकन कॅची होणारे होेते. हा सगळा मसाला एकत्र केला आणि त्यातूनच मी तुमच्या सर्वांची लाडकी मोना डार्लिंग… बूम बूम चिक चिकी बूम बूम, ही टॅग लाईन सापडली. अर्थातच प्रेक्षकांनीही ती तितकीच डोक्यावर घेतली. खास करून ती स्वत: निर्बुद्ध असताना मराठी वाचण्याचेही तिचे वांधे आहेत. मात्र केवळ ती रिल स्टार आहे आणि म्हणून सर्वात विद्वान, उच्च शिक्षित असा मॅनेजर ती दरमहा पाच ते दहा लाख रुपये पगारावर ठेवू शकते, असा तो विरोधाभास यातून मला साकारता आला. याशिवाय शंकऱ्या-सुरकीच्या लव्हस्टोरीतल्या ट्विस्टमध्ये सुरकीची मैत्रीण शिवली जी पम्याची गर्लफ्रेंड आहे, पण प्रत्यक्षात पम्या फारसा कधीच समोर नाही. तरीही पम्याचे कॅरेक्टर उभे करणे, सुरकीला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी अंतरंगी मदत करणे, खोटे बोलणे, सुरकीने शंकऱ्याला सोडून जावू नये म्हणून प्रयत्न करणारी अशी मैत्रीण मी साकारते आहे. अशी पात्र साकारताना त्यातील भाव, अचूक परिणाम साधणे तसे जिकीरीचे असते.

तू साकारत असणारे पात्र तुला प्रत्यक्षात कधी भेटलीत का आणि मनाला भिडलीत का यावर शिवाली म्हणते, हो माझे प्रत्येक पात्र साकारताना मी आसपास खूप निरीक्षण करते. माझ्या वयाच्या मुली, माझ्या मैत्रिणी त्या कशा बोलतात, कशा वागतात, मोबाईलवर मित्राशी कशा बोलतात, याचं मी निरीक्षण करते. गौरव, पृथ्वीक, ओंकार, सावत्या अशा विविध स्वभाव आणि सवयीच्या मुलांची गर्लफ्रेंड मी साकारते तेव्हा आधी प्रत्येकाची आवड निवड, बोलण्याची लकब, एखादा टिपीकल शब्दप्रयोग आदी बारकावे मी टिपते आणि ते प्रयोगात उचलण्याचा प्रयत्न करते.
सध्या ‘कल्याणची चुलबुली’ अशी माझी ओळख कार्यक्रमाच्या सुरुवातीला केली जाते. कल्याण तसे मुंबईपासून बरेचसे दूर असणारे आणि स्वत:ची वेगळी ओळख असणारे एक गजबजलेले व्यापारी शहर आहे. एका सर्वसामान्य रिक्षावाल्याच्या माझ्यासारख्या मुलीला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेम मिळते आहे, पसंती मिळते आहे. आपण जिथून आलो आहोत ती ओळख तर महत्वाचीच आहे. ही ओळख महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचे काम हास्यजत्रेने केले आहे. शिवाली फक्त कल्याणची शिवाली न राहता ती भारताची चुलबुली शिवाली अशी ओळख मिळावी असे मनोमन वाटते आहे.
सेटवर इतर कलाकारांसोबतचे नाते विशद करताना शिवाली म्हणते, मी हास्य जत्रेतील इतर कलाकारांपेक्षा वयाने लहान आहे. त्यामुळे साहजिकच माझे खूप लाड होतात. लहान असल्याने सगळ्यांचे प्रेम तर मिळतेच त्यामुळे फारशी अॅडजेस्टमेट करावी लागत नाही. खूप धमाल, मस्ती, टिंगल टवाळी असे हसत खेळत वातावरणात शूट कधी संपते, तालीम कशी रंगते हे कळतच नाही. आमचे बाऊंडींग फक्त सेटवरचे नाही तर आम्हा सर्वच कलाकारांचे एक घट्ट नाते तयार झाले आहे, त्यामुळे मजा येते, सरस कला सादर करता येते.
रोजचा दिवस प्रेक्षकांना हसवत ठेवणाºया कलाकाराचा दिवस ताण विरहीत असतो का या प्रश्नावर शिवाली सांगते की, आमच्यासाठी प्रत्येक दिवस चॅलेंजिंग असतो. प्रत्येक स्कीट समोर आल्यावर खरे तर पोटात गोळा येतो. सचिन गोसावी आणि सचिन मोटे सरांनी प्रत्येक एपिसोडमध्ये विविधता जपली आहे. एकसारखेपणा नसतोच… त्यामुळे रोज काय करायला मिळणार याची उत्सुकता असते. याशिवाय मी रिल्स बनवते, सिनेमाही करते त्यामुळे ताण असा नसतोच. सेटवरचे सिनीयर कलाकार नेहमीच सहकार्य करतात, रोज शिकायला मिळते.
मध्यमवर्गीय मुलगी ते एक कलाकार हा फरक कसा वाटतो, यावर शिवाली म्हणते, माझ्यासाठी माझा हा प्रवास खूपच भारी आहे. चाळीत राहणारी पूर्वीची मी आणि आत्ताची मी, आमच्या कुटुंबाला मिळालेले आर्थिक स्थैर्य, बदललेले आयुष्य यात खूप आश्वासक सकारात्मक फरक आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मी मुलगी. मला आवडलं म्हणून मी या क्षेत्राचा प्रवास करीत गेले. माझ्या कुटुंबातील प्रत्येकानेच अगदी आजी, आई, बाबा, काका आणि बहिण अशा सर्वांसोबतच माझ्या मित्र-मंडळींनीही खूप सपोर्ट केला आहे. मी खूप शिकते आहे, शिकायचे बाकी आहे. आपली कसलीच ओळख नसताना आपल्याकडे काहीच नसताना जे लोक, मित्र आपल्यासोबत असतात त्यांना कधीच विसरु नका, या तत्वानुसार मी चालते. मी आजही संध्याकाळी लवकर घरी गेले तर माझ्या चाळीतल्या, इतर मैत्रिणींना आवर्जून भेटते.
हास्यजत्रेत आम्ही २४ कलाकार आहोत. त्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखेच आहे. माझी एक कलाकार म्हणून झालेली ग्रोथ ही हास्यजत्रेत जोडलेल्या प्रत्येक घटकामुळेच शक्य झाली आहे, असे मला वाटते.
कोरोना काळातले अनुभव सांगताना शिवाली थोडीशी भावूक होते. ती सांगते की, या आठवणी विशेष दखलपात्र आहेत. या काळात आमच्या टीमने ठरवले की, आपण आपले एपिसोड शूट करायचे. यासाठी आम्ही दमणला जावून शूट केले. आम्ही दीड-दोन महिने तिथेच राहत होतो. चॅनेलने लोकांना हसवण्याची जबबदारी घेतली होती. प्रत्येक कोरोना उपचार केंद्रात सोनीने हा स्यजत्रेसाठी टीव्ही सेट उभे केले आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. लॉकडाऊनच्या काळातच आम्ही खऱ्या अर्थाने मोठे झालो. त्यानंतर खूप सारे मेसेजेस आले, लोक भेटायला आले. माझे बाबा कोरोनाने अॅडमिट होते, तेव्हा त्यांनाही हास्यजत्रेचीच मात्रा उपयोगी पडली. खास करून माझे आणि समीरदाचे ‘शिवाली हे खरे आहे’ हा बाप-लेकीचा ड्रामा ते पुन्हा पुन्हा बघू लागले आणि ते कोरोनातून बरे झाले. असे खूप सारे अनुभव आमच्या प्रत्येकाच्या वाट्याला आले आहेत. कोरोनाने आम्हांला माणुसकीच्या नात्याने एक कलाकार म्हणून समृद्ध आणि समाधानी केले असे मला वाटते.
प्रत्येक टप्प्यावर नव्याने काही धडा, शिकवण मिळतेच आहे. हास्यजत्रेत आले त्याआधी मी जवळपास एक दीड वर्षे स्टेज आणि मालिका करीत होते. पण असे कायम वाटते की जिथे आपली फॅमिली तयार होते तिथे आठवणी तयार होतात. सुरुवातीला खूप भीती वाटायची, पण कधीच कुणी डीमॉरलाईज केले नाही. माझे आई-बाबा जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर झळकले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होते. ‘आमच्या लेकीमुळे आम्ही टीव्हीवर आलो,’ असे त्यांचे सांगणे माझी जबाबदारी वाढवणारे होते. हास्यजत्रेचे शूटिंग मीरारोडला सुरु असते आणि मी राहायला कल्याणला. जाण्यायेण्यातच खूप वेळ जायचा. मी अनेकदा नमाताई, चेतना, वनिता अशा सर्वांच्या घरी हक्काने मुक्काम केला आहे. प्रत्येकासोबतचे माझे नाते खूपच सुखकारक आहे.
हास्यजत्रेने मला अनेकार्थाने समृद्ध केले आहे. एक माणूस आणि एक कलाकार म्हणून जगण्याची उंची दिली आहे. मी या माझ्या अनुभवाशी नेहमीच कृतज्ञ असेन.



