

कर्नाटकच्या सावित्रीबाई अशीच ओळख सार्थपणे ज्यांची करावी, मदर तेरेसांच्या कनवाळूपणासोबत ज्यांना तोलावे अशा धारवाडच्या वनिता सेवा समाजच्या माई अर्थातच कर्नाटकच्या पहिल्या ‘केसर ए हिंद’ भागीरथीबाई पुराणिक… त्यांच्या कार्याचा गौरवच नाही तर, अनुकरण करून त्यांच्या वनिता सेवा समाजला देशभरातून पुरस्कृत करण्याची आणि सेवाभावाने त्यांच्या या कार्यात सहभागी होण्याची हीच ती योग्य वेळ, असे भाव मनी ठेवून त्यांची कर्तव्यपरायणता जाणून घ्यायलाच हवी…

एक पुरुष शिकला तर, तो फक्त अपल्या घराचा उद्धार करु शकतो. मात्र एक स्त्री शिकली तर घरासोबतच संपूर्ण समाजाचा उद्धार करु शकते, समाज प्रगतीपथावर नेवू शकते, असा विश्वास आजवरच्या अनेक धुरिणींनी समाजाला दिला आहे. स्त्री शिक्षणाचा लढा हा तसा ऐतिहासिकच लढा होता. प्रचंड प्रमाणात विरोध पत्करुन आजवर अनेक महिलांनी या लढ्याला सामोरे जात जग जिंकले आहे. मात्र अनेक महिला अशाही आहेत की त्यांच्या कार्यपताकेची म्हणावी अशी दखल घेतली गेली नाही.
आजवरचा इतिहास पाहता वारंवार हीच गोष्ट समोर येते की, ज्या ज्या कर्तव्यदक्ष धुरिणींना, समाजात ऐतहिासिक शाश्वत बदल घडवण्यासाठी अव्याहतपणे कष्ट करणाऱ्या प्रत्येक घटकाला समाजातील ‘सो कॉल्ड’ व्यक्तींनी दुर्लक्षितच ठेवले आहे. कदाचित या दुर्लक्षिततेचाच सकारात्मक परिणाम म्हणूनच अनेकांना आपले काम मनापासून करता आले आहे. आपल्या आयुष्यात जे जे भोगले त्याचा बाऊ न करता एक विशिष्ट हेतू समोर ठेवू रंजल्या गांजलेल्यांसाठी संपूर्ण आयुष्य सत्कारणी लावता आले आहे. कधी याचे उदाहरण म्हणून आपण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचे उदाहरण देतो तर कधी आद्य शिक्षिका सावित्रीबार्इंचे उदाहरण समोर ठेवतो. महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील विविध प्रांतांत, राज्यात अनेक नामवंतांनी समाजात पुरोगामी बदल घडवण्यासाठी आयुष्य वेचले आहे. काहींना सर्वार्थाने पुरस्कृतता मिळाली, मात्र खूप जण असे आहेत जे कधीच समाजाच्या, जगाच्या समोर आले नाहीत. किंबहुना अशा अनेकांची दखल घेण्याचे प्रतिष्ठीतांनी सोयीने टाळले.
भारताच्या इतिहासात डोकावले तर, स्त्रीयांच्या उन्नतीसाठी कठोर ध्येयाने कार्यमग्न असणाऱ्या अनेकांची नावे आज अभिमानाने मिरवता येतात. त्यांची कर्तबगारी खरोखरीच थोर आहे, मात्र आजही देशाच्या कानाकोपऱ्यात असे कर्तबगार हिरे दडलेले आहेत. जे अंधारात प्रसिद्धीपासून कोसो दूर आहेत. तब्ब्ल ५० वर्षांहूनही अधिक काळ आपले काम, समाजातील विशिष्ट घटकांना प्रवाहात आणण्याची धडपड करणाऱ्या अशीच एक जाज्वल्य शलाका, महाराष्ट्राने अनुभवलेल्या सावित्रीच्या लेकीप्रमाणेच आयुष्यभर मुलींच्या शिक्षणासाठी, विधवांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांना प्रवाहात आणताना स्वावलंबी होण्याचे पर्याय प्रत्यक्ष कृतीतून निर्माण करणाºया भगीरथीबाई अर्थातच कर्नाटकची सावित्रीबाई म्हणजेच धारवाड येथील वनिता सेवा समाजच्या संस्थापिका भागीरथीबाई पुराणिक होत.

महाराष्ट्रानेच नाही तर, अवघ्या जगाने सावित्रीबाईचे स्त्री शिक्षणाविषयीचे योगदान जाणले आहे. त्याच धर्तीवर कर्नाटकातील धारवाड येथे वयाच्या ८२ व्या वर्षीपर्यंत वनिता सेवा समाजच्या माध्यमातून अखंड कार्यरत असणाऱ्या भागीरथीबाई पुराणिक १९७१ मध्ये देवाघरी गेल्या. त्यांच्या या कार्याची दखल संपूर्ण देशाने घ्यावी यासाठी पोट तिडकीने त्यांच्या संस्थेच्या वतीने यंदाच्या पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांच्या कार्याचा प्रस्ताव संस्थेच्या वतीने पाठवण्यात आला होता, मात्र त्याची दखल घेतली नाही. इतकेच नव्हे तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची नावे एकत्रित करून त्याविषयी एक पुस्तक लिहिले आहे, ज्यात वनिता सेवा समाज आणि भगीरथीबाईंचाही उल्लेख केलेला आहे. मात्र माईंच्या कार्याविषयीचा लेखा-जोखा संकलितपणे सविस्तरपणे मांडता आलेला नाही. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या निधनाची फक्त चार ओळीची बातमी व्हावी यासारखे दुर्दैव ते काय!

भागीरथीबाई पुराणिक या कर्नाटकातील पहिल्या महिला आहेत, ज्यांच्या कार्याची दखल १९३५ साली इंग्रज सरकारने घेतली होती. इंग्रज सरकारच्या वतीने तत्कालिन गर्व्हनरच्याहस्ते माईंना ‘केसर ए हिंद’ या किताबाने गौरवण्यात आले होते. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड या गावी १८८९ मध्ये वामनाचार्य आणि सावित्रीबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांना चार बहिणी होत्या. बोलायला येवू लागले तेव्हापासून अक्षरओळख नाही, पण संवादाची, शब्दांची गोडी त्यांना वाटू लागली. त्यातूनच गळा गोड आणि स्वत:ला जे भावेल ते आपल्या भाषेत गुणगुणत राहायचे, ही सवय त्यातूनच त्यांच्याकडून स्वतंत्र गाणी नकळतपणे तयार होवू लागली. रुढीप्रमाणे वयाच्या अगदी आठव्या वर्षीच त्यांचे लग्न सौंदत्तीजवळील मुनवळ्ळी गावच्या रंगाचार्य पुराणिक यांच्यासोबत झाले. खरे तर इतके कोवळे वय… लग्नानंतर तर अधिकच बिकटता अनुभवायला मिळाली. लग्नानंतर हळुहळू त्यांच्या प्रकृतीत बिघाड सुरु झाला. डोके सतत दुखत राहायचे. त्या तक्रार करायच्या पण सासुबाईंना वाटायचे काम चुकवण्यासाठी त्या खोटे नाटक करतात. त्यांनी गावठी वैद्य आणि शेजारील गावातील एका डॉक्टरकडे उपचार सुरु केले. त्याचा विपरीत परिणाम झाला. डोके दुखण्याची तक्रार वाढू लागली असतानाच सासुबाईंनी एका डॉक्टरला बोलावून घेतले. त्यांच्या डोळ्यात कसले तरी औषध टाकले. रक्त वाहु लागले तर, त्यांच्या डोळ्यात अक्षरश: अंजन भरले… तो दाह त्या आयुष्यभर सहन करीत होत्या… इतक्या कोवळ्या वयात हे एक प्रकारचे अत्याचारच होते. माणूस म्हणून बघण्याची अजिबातच भावना नव्हती. डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी डोळा उघडला… पण हाय रे दुर्दैव… डोळ्याची दृष्टी पूर्णपणे गायब झाली होती. जणू त्या ऑपरेशनने त्यांचा एक डोळाच हिरावून घेतला होता. तेव्हापासून डाळ्यावरचा काळा चष्मा जणू त्यांचा आयुष्यभराचा साथी ठरला होता.

वयाच्या १२ व्या वर्षीच रंगाचार्य पुराणिक यांचे निधन झाले आणि परंपरेनुसार त्यांना ‘मढी’ बनवण्यात आले. शिक्षण आणि बाईचा काहीच संबंध नाही किंबहुना विधवा झाल्यानंतर केशवपण करणे आणि डोके झाकून एका विशिष्ट रंगाच्या कपड्यांमध्येच आयुष्य गोठवून श्वास सुरु आहे, म्हणून जगणे ही परंपरा त्यांच्याही वाट्याला वयाच्या १२ व्या वर्षीच आली. पण माईंचे दुर्दैव अजून संपलेले नव्हते. १९०५ च्या प्लेगच्या साथीत त्यांचे वडील वारले. तेव्हा घरात गरोदर आई आणि एक छोटी बहीण होती. आईला आपल्याला मुलगाच होईल ही आस होती कारण तेव्हाच्या कायद्यानुसार वडीलांची संपत्ती फक्त मुलांनाच मिळत होती. मुलींना कोणतेच संरक्षण नव्हते. आपल्यालाही मुलगा झाला तर नवऱ्याच्या माघारी किमान या दोन मुलींना व्यवस्थित जगवता येईल इतकाच त्या माऊलीचा हेतू होता… पण इथेही भागीरथीबाईंचे दुर्दैव आड आले. त्यांच्या आईला पुन्हा मुलगीच झाली. आता आपल्या मुलींचे जगणे अगदीच नरक बनेल, याची हाय खावूनच भागीरथीबाईंच्या आई बाळंतपणाच्या काळातच मरण पावल्या. भागीरथीबाईंना अगदी कोवळ्या वयातच दोन बहिणींची आई बनावे लागले.

भागीरथीबाईंच्या आईचेही निधन झाल्यानंतर त्यांच्या काकांनी सर्व संपत्ती हिसकावून घेत या तिघींना घराबाहेर हाकलले. तेव्हा भागीरथीबाईंनी आपल्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचे धाडस केले. त्यांनी इग्रज सरकारकडे धाव घेत आपल्या डोक्यावरचे छत काढू न देण्याची विनंती केली आणि आपल्या काकांच्या तावडीतून आपला वाटा मिळवलाच. त्या काळी काहीही शिक्षण नसताना आपल्या उदरनिर्वाहासाठी आणि हक्काच्या निवाऱ्यासाठी आपल्याच आप्तांसोबत तिला भांडावे लागत होते. त्याकामी कोर्ट-कचेºयाही कराव्या लागत होत्या. ब्राह्मण समाजातील एक विधवा असे काही धाडस करते आहे हेच मुळी त्याकाळच्या कर्मठ समाजाला रुचणारे आणि पचणारे नव्हते… म्हणूनच तर भागीरथीबाईंनी जे कार्य वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत अव्याहतपणे आणि दखलपात्र असे उभे केले त्याचे कौतुकही करावेसे असे फारसे कोणाला वाटले नाही.

इंग्रज सरकारने त्यांना काकांच्याच घरातील एक कोपरा हक्काने मिळवून दिला खरे, पण उदरनिर्वाहाचे काय हा प्रश्न माईंसमोर होताच. त्यांनी घरोघरी जावून स्वयंपाकाची कामे करण्यास सुरुवात केली. अशावेळी त्यांचे होणारे हाल पाहून त्यांची आजी, मावशी व काका त्यांच्यासोबत आले. त्यांनी राहते घर आपल्या नावावर करून घेतले… व्यवहाराप्रती त्या सुरुवातीपासूनच चाणाक्ष आणि कठोर राहिल्या… वडीलांच्या संपत्तीबाबत भांडताना त्यांना काही गोष्टी माहीत झाल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या सासऱ्याकडूनही आपल्या वाट्याची संपत्ती कायद्याने मिळवली होती. इतके सारे अनन्वीत अनुभव आल्यानंतर त्यांनी आपल्यासारख्या अनेक मुलींसाठी काही करायचे ठरवले.
त्याकाळात स्त्री शिक्षणाचे वारे वाहू लागले होते. जिकडे तिकडे मुलींसाठी शाळा सुरु झाल्या होत्या. याच काळात मळेबेन्नुर आणि कुंभकोणी या सदगृहस्थांनी महिला विद्यालयाची सुरुवात केली होती. मळेबेन्नुर यांना माईंच्या गाण्याचे व संगिताचे प्रेम, त्यातील त्यांचे कौशल्य माहीत होते. त्यांनी माईंना आपल्या शाळेत संगीत शिक्षिका म्हणून बोलावून घेतले. मळेबेन्नुर आणि कंभकोणी हे जणू माईंचे संस्कृत आणि इंग्रजी या दोन्ही भाषा शिकवणारे गुरुच ठरले. माईनी आपल्या कुवतीप्रमाणे समाजातील महिलांविषयीची स्थित्यंतरे कशी बदलत जातील याचा ध्यास घेतला होता. त्यांची भावना लक्षात घेत मळेबेन्नुर हे माईंपेक्षा लहान असूनही ते माईंचे गुरु ठरले. त्यांनी माईंना आपल्या शाळेत तर सामावूनच घेतले, पण माईंना समाजाच्याही सामोरे जावू दिले. शाळेसाठी देणगी मागायला जाताना मळेबेन्नुर नेहमीच माईंना सोबत घेत. विविध गावांना भेटी देत. असेच एकदा सौंदत्ती येथे श्री. सरदेशपांडे यांच्या घरी माईंनी महर्षी कर्वे यांचे पुणे येथे स्त्री शिक्षण विषयीचे कार्य सुरु असल्याबाबतची चर्चा ऐकली होती. प्रवाहाविरुध्द काम करणाºया कर्वेंचे माईंना कौतुक वाटले आणि त्यांच्याप्रमाणे आपणही महिलांसाठी संस्था सुरु करावी आणि एकदा तरी कर्वेंना भेटावे असे त्यांच्या मनी येवू लागले.
स्वातंत्र्याच्या लढ्याचे ते दिवस होते. जो तो आपापल्यापरीने स्वातंत्र्य चळवळीत योगदान देत होता. माईंना नेहमीच हा विश्वास होता की, जोपर्यंत विचारांचे स्वांतत्र्य मिळणार नाही, तोपर्यंत समाज पुरोगामी होणार नाही आणि वैचारिक स्वातंत्र्य, विचारांचे स्वातंत्र्य देण्याचा वा मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपले शिक्षण होय. याच विचारातून त्या सतत समाजातील उपेक्षित, विधवा आणि परितक्ता अशा महिला, मुलींसाठी काही करता येईल का याच्या विचारात होत्या. त्याच दरम्यान १९२१ पुण्यातील महर्षी धोंडो केशव कर्वे एकदा धारवाडमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. या कार्यक्रमात कर्वेंना भाषण करायचे होते. मात्र धारवाडमध्ये त्याकाळी मराठी भाषा बोलणारे वा समजणारे कोणी नव्हते. कर्वेंचे कार्य तर प्रत्येकालाच जाणून घ्यायचे होते. अशावेळी माईंना मराठीतील भाषण कन्नडमध्ये समजावून सांगण्याची जबाबदारी ऐन कार्यक्रमावेळी सोपवण्यात आली. कर्वेंचे भाषण मराठीतून कन्नडमध्ये भाषांतरीत झाले. उपस्थित सर्वांनाच आश्चर्य तर वाटलेच पण माईंचे महत्व, त्यांची हुशारी अधोरेखित झाली. महिलांच्या उन्नतीसाठी सिध्द झालेला एक महर्षी आणि त्याच्या कार्याचे महत्व आपल्या मातृभाषेत तितक्याच ताकदीने समजावून सांगणारी एक शलाका.. एक वास्तव… शुभ्र पांढरी साडी, कपाळावर लावलेला अंगारा आणि पहिल्यांदाच एक विधवा महिला असूनही व्यासपीठावर मिळालेला सन्मान हे ऐतिहासिक चित्रच जणू भविष्यात आकाराला येणाऱ्या वनिता सेवा समाज या संस्थेची नांदी होती. महर्षी कर्वेंनीही या शलाकेचे कौतुक करून पुण्याला कर्वे शिक्षण संस्थेसोबत काम करण्यासाठी येण्याची विनंती केली. तेव्हा माईंनी नम्रपणे त्यांना शब्द दिला की, मी तुमच्यासोबत तिकडे येणार नाही, पण जे काम तुम्ही पुण्यात करता, तेच काम करण्याची इथेही गरज आहे. मी धारवाडमध्ये ते काम सुरु करते. इथल्या माझ्या बहिणींना माझी अधिक गरज आहे, असे म्हणत जणू माईंनी आपल्या ध्येयावर शिक्कामोर्तबच केले होते. धारवाड पुण्याप्रमाणेच कर्नाटकातील एक प्रतिष्ठित असे कर्मठ शहर होते, स्वाभाविकच महिलांसाठीचे आश्वासक बदल त्याकाळीही फारसे मान्य होणारे वा सहजपणे स्वीकारणारे नव्हते.
अनेक प्रकारचे विरोध सुरु झाले होते. याच काळात महिलांसाठी एक संस्था सुरु करावी असा मानस मनी धरुन माईंनी प्रयत्न सुरु केले. संस्था सुरु करायची तर सुरुवात कशी करायची, विद्यार्थिनी कोठून आणायच्या, त्यांना शिकवायचे कोणी असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर होते. त्यांनी आपल्या राहत्या घरातच धारवाडमध्ये २८ मार्च १९१८ मध्ये वनिता सेवा समाजची मुहूर्तमेढ रोवली. संस्था चालवण्यासाठी त्यांनी आपल्या वाट्याला आलेली सासरची प्रॉपर्टी विकली. त्यातून आलेला सर्व पैसा त्यांनी वनिता सेवा समाजसाठी खर्ची टाकला. रोज खांद्याला झोळी बांधून त्या देणगी मागायला बाहेर पडत. अनेकजण त्यांना हाकलून देत, उणीदुणी बोल लावत. संस्थेत पहिल्या दोन विद्यार्थिनी दाखल झाल्या आणि माईंना दिशा मिळाली.
गांधीजींनी १९३७ मध्ये मूल्यशिक्षणावर भर दिला. त्यांच्या विचारानुसार तर माईंचे कार्य आधीपासूनच सुरु होते. शिवणकाम, कशिदा काम, प्रिंटीग प्रेसमधील काम, गृहशास्त्र, सुतिका काम, दाईचे काम, हातमाग, विणकाम, माँटेसरी प्रशिक्षण, प्राथमिक, पूर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व प्रौढ शाळा आणि शिक्षक प्रशिक्षण आदी उपक्रम माईंनी एका पाठोपाठ एक असे सुरु केले. वनिता सेवा समाजचे काम वाढत होते. हळुहळू समाजाचा विरोध मावळत गेला. स्वातंत्र्याच्या नजिक असल्याने समाजातील काही चांगल्या बदलाचा तो परिणाम होता. माईंच्या कामाचा पसारा वाढत होता. याच काळात १९३९ मध्ये धारवाड येथील रामनगर येथे संस्थेसाठी एक एकर जागा देणगी मिळाली आणि वनिता सेवा समाज खºया अर्थाने उभे राहिले. आजही याच जागेत संस्थेचे शैक्षणिक संकुल दिमाखाने उभे आहे.
उपेक्षित गटातील महिलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे माईंचे स्वप्न पूर्ण झाले. या संस्थेतून आजवर शेकडो महिलांनी आपल्या आयुष्याला स्वावलंबनाची दिशा दिली आहे. माईंच्या या कार्यात समाजातील अनेक सद्गृहस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या वैचारिक दिशादर्शकांचे योगदान लाभले आहे. विधवांचा पुनर्विवाह या संकल्पनेला सुरुवातीच्या काळात प्रचंड विरोध माईंना सहन करावा लागला. मात्र काळाच्या ओघात यातही बदल झाले. विधवांच्या पुनर्विवाह कार्यास पुराहित येत नसत. अशावेळी माईंच्या मदतीला आले ते ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी डॉ. डी.आर बेंद्रे. डॉ. बेंद्रे या कार्यात पौरोहित्य करायचे आणि नवदांपत्याना आशीर्वाद द्यायचे.
शिक्षणासोबतच त्यांनी संगीताचीही ओळख महिलांना करून दिली. मुलींचे प्रवेश वाढावेत म्हणून त्यांनी व्याख्याने दिली. मुलींचे शिक्षण समाजाच्या प्रगतीसाठी कसे महत्वाचे आहे हे पटवून दिले. सर्व प्रकारच्या मुलींची संख्या त्यांच्या शाळेत येण्यासाठी वाढू लागली. जे माईंना चरीत्रहीन म्हणून लाथाडायचे. तेच आता त्यांच्या कार्याचे कौतुक करू लागले होते. माईंनी केलेल्या अव्याहत कष्टाचे ते फळ होते. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ या उक्तीनुसार माईंनी आयुष्यभर फक्त महिलांच्या उन्नतीचा ध्यास घेतला होता.
वयाच्या १२ व्या वर्षी जिला फक्त श्वास घेण्यापुरते जिवंत ठेवले, तिने हजारो महिलांना सन्मानाने श्वास घेण्याचे तंत्र शिकवले. हजारो महिलांना त्यांनी सन्मानाने जगण्याची संधी दिली. अपरिमित कष्ट आणि कष्टातील सातत्य हेच त्यांचे आयुष्य होते. त्यांच्या संस्थेचे कौतुक सर्वदूर होवू लागले. इंग्रज सरकारने त्यांची १९३५ मध्ये दखल घेत त्यांना ‘केसर ए हिंद’ हा सन्मानाचा किताब देवू केला. कर्नाटकामधील असा किताब आपल्या कर्तबगारीने मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनीही त्यांचे हे कार्य जाणून घेण्याकरीता वनिता सेवा समाजला आवर्जून भेट दिलेली आहे. इतकेच नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि खुद्द पं. जवाहरलाल नेहरुंनी या संस्थेला भेट देत त्याविषयी गौरवोद्गारही काढलेले आहेत. याशिवाय कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, तसेच माजी राज्यपाल गणपतराव तपासे, महर्षी धोंडो केशव कर्वे, सी. डोराईस्वामी, टी. मरिअप्पा, डॉ. सी. व्ही. नाडकर्णी, आर. एफ. जोसेफ, आदी मान्यवरांनी माईंच्या या संस्थेला प्रत्यक्ष भेटी देऊन कौतुक केले आहे.
…पण म्हणतात ना पिकते तिथे विकत नाही. माईंच्या या कार्याची दखल कर्नाटक सरकारकडून म्हणावी तितक्या प्रभावाने घेतलेली नाहीे. त्यांच्या मृत्यूपश्चात काही प्रमाणात पोरक्या झालेल्या वनिता सेवा समाजला समाजातील सर्व घटकांतून मदतीची, सहकार्याची अपेक्षा आहे. माईंचे हे महान कार्य आणखी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी, ते टिकण्यासाठी आणि त्यातील सातत्य राखण्यासाठी माईंच्या कार्याचे स्मरण आवश्यक आहे. संस्था टिकल्या तरच समाजाची प्रगती सुरु राहील. माईंच्या या वनिता सेवा समाजला आता समाजातील दानशूरांनी सहकार्याचा हात द्यावा हीच सदिच्छा. मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या या माऊलीला, सावित्रीच्या या लेकीला, कर्नाटकच्या आद्य सावित्रीला आमच्याकडून मानाचा मुजरा. तिचे कार्य सदैव स्मरणात राहो.



