बोल अनुभवाचे

सावित्रीच्या लेकीचे साहेबाच्या देशात कौतुक

- भास्कर कदम

– भास्कर कदम

भास्कर कदम, पत्रकार तथा माजी नगराध्यक्ष, नगरपरिषद नांदगाव. संपादक सा. समर्पित व लीन (वार्षिक नियतकालिक). ४५ वर्षे विविध दैनिकात प्रतिनिधी म्हणून पत्रकारिता केली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात काम. विविध चळवळी व आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग.

——–
गार्गी ही वैदिक काळातील सुशिक्षित महिला विद्वान होती. वैदिक काळात स्त्रियांना मान दिला जात होता. गार्गी समवेतच वैदिक काळातील लोपामुद्रा, घोषा, विश्वधारा इत्यादी महिलांच्या ऋचा ऋग्वेदात आहेत. त्याकाळात मुलांबरोबरच स्रियांनाही शिक्षण मिळत असे इतकेच नव्हे तर, त्यांना उपनयनाचा अधिकार प्राप्त होता. त्यानंतर त्या अध्ययन करु शकत होत्या. वेदविद्या व ब्रह्मविद्या यांचा अभ्यास करण्याचा तसेच स्वतंत्र लेखनाचा अधिकार होता. ‘गार्गी’तर अध्यात्मिक चर्चेत, अभ्यासात हुशार होती. अध्यात्मिक वादविवादात ती अत्यंत निष्णात होती. याचाच अर्थ स्त्रियांना समान संधी उपलब्ध झाली तर, त्या पुरुषांच्या बरोबरीने समानपातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करु शकतात, हे वैदिक काळातही सिद्ध झाले आहे.
मनुस्मृतीच्या कालखंडात मात्र स्थिती याउलट होती. पहिल्या शतकातील कालखंडानंतर प्रामुख्याने गौतम, आपस्तंभ आणि मनू यांनी या स्मृती रचल्या आहेत. हा कालखंड म्हणजे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून एक अंधारयुगच होता असेच मानावे लागेल. स्त्रीवर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले होते. तेथूनच स्त्री शिक्षणाची पीछेहाट झाली, असेच मानावे लागेल. तथापि अशा प्रतिकूल कालखंडातही राजघराण्यातील मुली, सरदार-सरंजामदारांच्या मुली यांना खासगी शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षण मिळत असे. या काळातील रेवा, रोहा, माधवी, अनुलक्ष्मी, पहई, बद्धवही आणि शशिप्रभा या सात कवयित्रींचा उल्लेख ‘हालाच्या गाथा’ सप्तशतीत आहे. वेद आणि मनुस्मृती या कालखंडाचा अभ्यास केला तर, दोन कालखंडात कमालीचा विरोधाभास आहे.
भारतात तर अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत स्त्रीला शिक्षणाचे द्वार खुले झालेले नव्हते. १ जानेवारी १८४८ मध्ये महात्मा ज्योतीराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली. त्यामुळे त्यांना धर्ममार्तंडांच्या विरोधाचा सामना करावा लागला. परंतु या विरोधाला न डगमगता, हार न मानता त्यांनी शोषित, पीडित महिला-मुलींसाठी आपले समाजकार्य चालूच ठेवले. ते नसते तर? आजही लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर जवळपास ५० टक्के महिला, मुली शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या. जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहणाºया भारताची वाटचाल अधोगतीच्या दिशेने झाली असती, यासाठी कोणत्याही कुडमुड्या जोतिषाची आवश्यकता नाही.

भारत सरकारने शिक्षणाच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. मुलींच्या शिक्षणाच्या वाढीस मदत करण्यासाठी अनेक योजनांचा समावेश आहे. अनेक मुली याचा लाभ घेऊन उच्च शिक्षण घेत आहेत. त्यासाठी मोठ्याप्रमाणात मुलीही शिक्षणासाठी विदेशातही जात आहेत. त्यासाठी शैक्षणिक कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचा लाभ अनेक गरजू विद्यार्थिनी घेत आहेत.
इंग्लंडमधील नॉटिंगहमच्या ट्रेंट युनिव्हर्सिटीत माझी मुलगी क्षितिजा हिने नुकतीच एमबीए डिजिटल मार्केटिंगमध्ये विशेष प्रविण्यासह पदवी मिळवली आहे. क्षितिजासारख्या अनेक मुली सध्या विदेशात शिक्षण घेत आहेत. मुलांच्या बरोबरीने त्यांचे प्रमाण आहे. अनेक मुली चांगल्या हुद्द्यावर, चांगल्या वेतनावर विदेशात नोकरीही करीत आहे. अनेक मुली आपल्या कुटुंबाचा प्रमुख आधार बनल्या आहेत. यासाठी अभ्यासाबरोबरच जिद्द आणि चिकाटीला महत्व आहे.
क्षितिजा ही महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नांदगावसारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेतलेली सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे. विशेषत: तिचे संपूर्ण शिक्षण हे मराठी माध्यमातून झाले आहे. इयत्ता चौथीपर्यंत नवीन मराठी शाळा, त्यानंतर व्ही. जे. हायस्कूल माध्यमिक शाळा, बारावीपर्यंत नांदगावच्याच महाविद्यालयात आणि पदवीचे शिक्षण नाशिकच्या केटीएचएम कॉलेजमध्ये म्हणजे शहरात घेतले. विशेषत: तिने कला शाखा निवडून इंग्रजी हा विषय ‘स्पेशल’ घेतला. म्हणजे डॉक्टर, इंजिनियर हे तथाकथित रुटीन अभ्यासक्रम न निवडता सर्वसाधारण शाखेतून आपली पदवी प्राप्त केली, हे विशेष होय! खूप कौतुक करावे असे काहीही नाही. यात विशेष हे की कोणत्याही शाखेतील शिक्षण कमी दर्जाचे कधीच नसते. त्यातील प्राविण्य महत्वाचे असते. क्षितिजाने प्राविण्यासह पदवी प्राप्त केली, हे महत्वाचे होते.

पदव्युत्तर शिक्षण कोणते घ्यायचे याची दिशा मात्र तिची निश्चित होती. तिने येथेही रुटीन मार्ग न निवडता पत्रकारितेतील मास्टर इन जर्नालिझम अँड कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम निवडला. दोन वर्षाचा हा अभ्यासक्रम मात्र तिने इंग्रजी माध्यमातून रानडे इन्स्टिट्यूट, पुणे येथून पूर्ण केला. अनुभवासाठी तेथेच वर्षभर इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेत नोकरी केली. तेथे अनेक कार्यक्रमांच्या नियोजनाची तिला संधी मिळाली. त्या अनुभवाच्या जोरावर मुंबई येथील नामवंत अशा अ‍ॅडफॅक्टर कंपनीत नोकरी केली. तसेच जेनिसिस या कंपनीमार्फत प्रो कबड्डीची मीडिया मॅनेजमेंट करण्याची संधी मिळाली.
भविष्याचा वेध घेतांना क्षितिजाच्या लक्षात आले की, पुढील युग डिजिटल युग आहे. पुढील काळाचा शिक्षणाचा प्रमुख मार्ग तोच असेल. यासाठी आपण विदेशात जाऊन शिक्षण घ्यावे, असे तिने ठरविले. यासाठी तिने विदेशातील काही विद्यापीठांची ऑनलाईन माहिती मिळवली. त्यात इंग्लंडमधील नॉटिंगहम ट्रेंट युनिव्हर्सिटी तिला पुढील अभ्यासक्रमासाठी योग्य वाटली. त्यासाठीच्या आवश्यक त्या प्राथमिक बाबी पूर्ण केल्या. त्यातून तिचा प्रवेश निश्चित झाला.
मुंबई विमानतळावरून दोन वर्षांपूर्वी लंडनला रवाना होतानाचा काळ मोठा कठीण होता. कोविडने थैमान घातले होते. प्रवेश तर निश्चित झाला, परंतु जाता येईल का हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु अशी कोणतीही अडचण उद्भवली नाही. तिचा प्रवास सुखकर झाला. आयुष्यात पहिल्यांदाच तिने विदेशात पाऊल ठेवले होते. तिच्या सोबत आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी होती. त्या जोरावर तिची नॉटिंगहमची पुढील वाटचाल यशस्वी झाली.
नॉटिंगहम ट्रेंट विद्यापीठात एमबीए डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रम पूर्ण करताना तिला खूपच सुखद अनुभव आला. येथील शिक्षणाची, शिकविण्याची पद्धती तिला विशेष भावली. येथे पाठांतरापेक्षा कृतिशीलतेला अधिक महत्व दिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये देशी-विदेशी असा भेदभाव केला जात नाही. आपल्या अडचणी विद्यार्थी खुल्या पद्धतीने शिक्षकांना सांगू शकतात. तेही मनापासून शंकेचे निरसन करतात. त्यात आपण ग्रामीण भागातून तसेच मराठी माध्यमातून आलो आहोत हा न्यूनगंड दूर होऊन जातो. यातूनच खऱ्या अर्थाने अभ्यासाला गती येते. येथे आपली अभ्यासू वृत्ती महत्वाची असते, असा क्षितिजाचा अनुभव आहे.
क्षितिजाला नॉटिंगहम ट्रेंट विद्यापीठातर्फे इस्तंबूल येथे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तेथे तीस देशांतील प्रतिनिधी आले होते. त्या त्या विद्यापीठाची माहिती मिळाली. क्षितिजास तिच्या विद्यापीठाच्या माहितीचे प्रेझेन्टेशन या प्रतिनिधीसमोर सादर करता आले. तिने मोठ्या आत्मविश्वासाने सादर केले. हा विद्यापीठाने तिच्यावर व्यक्त केलेला विश्वास होता, एकप्रकारे बहुमानच होता.
नॉटिंगहम ट्रेंट युनिव्हर्सिटीचा पदवीदान समारंभ हाही खासच होता. खास त्यासाठीच आम्ही लंडनला आलो होतो. क्षितिजाने डीन अ‍ॅवॉर्डसह पदवी मिळविली. एक मराठी मुलगी मराठी माध्यमातून शिक्षण घेते. ब्रिटनमध्ये साहेबांच्या देशात सन्मानाने पदवी मिळविते, हा खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकीचा सन्मान होता.


Related Articles

Back to top button