प्राईड ऑफ कल्याणकर : प्रणव भांबुरे


कलाकार आणि सुप्रसिद्ध निवेदक म्हणून चर्चेत असणारे कल्याणकर प्रणव भांबुरे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय, निवेदन, पत्रकारिता, व्यावसायिक आणि मुलाखतकार म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहेत.
लहानपणापासूनच प्रणव भांबुरे यांना अभिनयाची आवड असल्याने नूतन विद्यालयामध्ये इयत्ता नववीत शिकत असताना त्यांनी एकांकिकेत भाग घेतला होता. त्यात एका उपवर मुलीच्या वडिलांचं पात्र त्यांना साकारायचं होतं. पहिल्यांदाच अभिनय करत असल्यामुळे त्यांना थोडी भीती होती. पण प्रेक्षकांना त्यांनी साकारलेल्या वय झालेल्या म्हाताºयाचा अभिनय अतिशय आवडून त्यांचे कौतुक झाले. त्या कौतुकाच्या जोरावर आजपर्यंत रंगमंच किंवा व्यासपीठ अभिनय किंवा सूत्रसंचालन करताना हजारो लोकांसमोर बिनधास्त बोलण्याची हिंमत त्यांना मिळाली. त्यानंतर अनेक बालनाट्य, राज्यनाट्य स्पर्धा, हौशी आणि व्यावसायिक नाटकात तसेच ४ मराठी मालिकांमध्ये देखील अभिनय केला. अभिनय, लेखन, दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य सर्व जबाबदाऱ्या पार पाडता आल्या. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत अभिनय आणि दिग्दर्शनासाठी अनेक पुरस्कार मिळाले. वाणिज्य विभागातून पदवी घेतल्यानंतर पत्रकारिता पदवीचे त्यांनी शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती उत्तम असतानासुद्धा स्वत: कमवून शिक्षण पूर्ण करावे या हेतूने त्यांनी बारावीनंतर खेळाचे कार्यक्रम केले आहेत. नोकरी करायला सुरुवात केली.
मीडियाची आवड निर्माण झाल्यामुळे शिक्षण चालू असतानाच ‘टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप’मध्ये वितरण विभागात पाच वर्षे आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ९ वर्षे ‘प्रहार’ दैनिकांत वितरण आणि जाहिरात विभागात काम केले. व्यवसाय करण्याची आवड असल्यामुळे अनेक व्यवसाय करत राहिले. काही ना काही व्यवसाय करता करता अभिनय आणि सूत्रसंचालन देखील सुरूच होत. अभिनय केल्यामुळे शब्दांवर चांगली पकड होती. याच शब्दफेकीच्या जोरावर एक आवड म्हणून सूत्रसंचालन करायला सुरवात केली. जसं लोकांना काम दिसायला लागल तसं अनेक कलाकार प्रमुख पाहुणे म्हणून असलेल्या कार्यक्रमांचं तसेच खासदार, आमदारांच्या राजकीय कार्यक्रमांचेही सूत्र संचालन करायला मिळालं. कल्याण-डोंबिवली नव्हे तर मुंबई, ठाणे, नाशिकसारख्या अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. २०१८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ठाणे जिल्हा पर्यटन आणि सांस्कृतिक कला महोत्सव समितीतर्फे सूत्र संचालनासाठी सन्मानपत्र मिळाले. तसेच ‘प्राईड ऑफ कल्याणकर’ हा मानाचा पुरस्कार देखील मिळाला. पैठणीच्या खेळाचा प्रयत्न करून बघितला लोकांना तोही आवडला. आतापर्यंत जवळपास पन्नासहून अधिक पैठणीच्या खेळाचे कार्यक्रम झाले आहेत.आज वाढदिवस, उत्सव, महिला विशेष कार्यक्रम किंवा कोणताही कौटुंबिक सोहळा तसेच कॉर्पोरेट, प्रॉपर्टी एक्स्पो, मॅरेथॉन, मॉल, सामाजिक, राजकीय, महानगरपालिका यांचा कोणताही कार्यक्रम किंवा चित्रपटाचं प्रमोशन, मराठी किंवा हिंदी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन ते यशस्वीरित्या करत आहेत. सोबतच राजकीय प्रचाराला आणि स्थानिक जाहिरातींना देखील त्यांना आवाज वापरला जातो. मुलाखतकार म्हणून अनेक मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. भविष्यातही प्रणव भांबुरे यांनी अशाच पद्धतीने कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.




