Uncategorizedकव्हर स्टोरीमुख्य स्टोरी

सामाजिक चळवळींचे अस्तित्व आणि भवितव्य

अमर हबीब

आंदोलन आणि चळवळ या दोन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. समुद्र म्हणजे चळवळ आणि लाट म्हणजे आंदोलन. स्वातंत्र्याची चळवळ होती. त्यात १९४२ साली झालेले ‘भारत छोडो’ हे आंदोलन होते. चळवळीला विचारधारा असते, त्या विचारधारेला प्रस्थापित करण्यासाठी वर्तमान परिस्थितीत झालेला उद्रेक म्हणजे आंदोलन. आंदोलन रोजच्या रोज होत नसतात, चळवळ मात्र सतत चालत असते.
भारतात अशा कोणकोणत्या चळवळी झाल्या? कोणकोणत्या चळवळींनी लक्ष वेधून घेतले? महात्मा जोतिबा फुले यांनी सुरू केलेली सामाजिक समतेची चळवळ, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेली भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, शिक्षणाची चळवळ, कम्युनिस्टांच्या व इतरांच्या नेतृत्वाखाली झालेली कामगार चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात झालेली व त्यांच्या प्रेरणेने झालेली दलित चळवळ, स्त्री मुक्तीची चळवळ, आदिवासींची चळवळ, शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली झालेली शेतकरी चळवळ, नक्षलवाद्यांची चळवळ, राष्ट्रीय स्वयसंघ प्रणित हिंदू राष्ट्राची चळवळ, खलिस्तानवाद्यांची चळवळ, दक्षिणेतील द्रविड चळवळ, भ्रष्टाचार निर्मूलन अशा काही प्रमुख चळवळी अनेक ठिकाणी नोंदविल्या गेल्या आहेत. ही यादी मोठी होऊ शकते. वरील चळवळींपैकी एकावर लिहायचे झाले तरी मोठा ग्रंथ होईल. त्यामुळे आपण ढोबळ मानाने त्यांचा विचार करू.
पहिली गोष्ट अशी की या चळवळी सारख्या वेगाने चालत नाहीत. कधी एखादी चळवळ खूप मोठी होते. त्यातून मोठ्या उलथापालथी होतात. नंतर ती पुन्हा संथ गतीने वाहू लागते. स्वातंत्र्याची चळवळ महात्मा गांधी यायच्या अगोदरही होती, पण गांधींच्या काळात ती खूप व्यापक झाली. या प्रवाहाने हजारो नव्हे, लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकले. १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. वर्षभरात गांधीजींची हत्या झाली. त्यानंतर ही चळवळ संथ झाली.
चळवळींना उठाव किंवा मरगळ येण्याचे कारण काय? नेत्याचा मृत्यू हे किरकोळ कारण आहे. मुळात समाजात जोपर्यंत त्या मुद्द्याची मागणी असते तोपर्यंतच त्या मुद्द्याला उठाव मिळतो. इंग्रज राजवट संपुष्टात येणे आणि भारत स्वतंत्र होणे ही घटना फार मोठी होती. चळवळीला एक टप्पा मिळाला म्हणून चळवळ थंडावली. नेत्यामुळे चळवळ उभी राहत नाही किंवा त्याच्या मृत्यूमुळे तिचे विसर्जन होत नाही. यात समाज हाच मुख्य कारक असतो.


माझा जो काही लहानसा अनुभव आहे, तो भ्रष्टाचार निर्मूलन, दलित चळवळ, स्त्री मुक्ती, स्वातंत्र्य आणि शेतकरी चळवळीचा आहे. माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात भ्रष्टाचाराच्या विरोधातून झाली. त्यावेळी अण्णा हजारे यांचे नाव देखील माहीत नव्हते. १९७२ च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या कामावर जाऊन मजुरांची बोगस नावे असलेले रजिस्टर पकडणे, सरकारी वाहनाचा खासगी वापर होत असेल तर ती वाहने अडवणे, काळ्याबाजारात विकल्या जाणाऱ्या रॉकेलची वाहतूक करणारे ट्रक्स रात्री-अपरात्री जागून पकडणे, अशी कामे करायचो. ते रॉकेल गोरगरिबांत वाटायचो. १९७४ च्या विद्यार्थी आंदोलनात आणखी काहीबाही केले. पुढे काय व्हायचे? तो भ्रष्ट अधिकारी वरच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पैसे खाऊ घालून सही सलामत सुटायचा. पुन्हा तेच करायचा. ट्रकवाल्याचीही कथा अशीच. पुढे तर भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम करणारेच भ्रष्टाचार करू लागले. आमच्या लक्षात आले की, घाण झालेली डुकरे धूत बसण्यापेक्षा, त्यांना आंघोळी घालत बसण्यापेक्षा गटार साफ करायला हवे. आमच्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलनाचे हे आंदोलन निरर्थक ठरले. भ्रष्टाचार हा विषय वृत्तीचा नसून व्यवस्थेचा आहे असे लक्षात आले आणि आपण व्यवस्थेकडे लक्ष द्यायचे ठरवले.


जात-धर्म असे अमानुष भेदाभेद मी मानत नाही. एका अर्थाने मी सामाजिक एकतेच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे. याच काळात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा विषय ऐरणीवर आला. माझे सवर्ण मित्र तेथे केवळ बाबासाहेबांचे नाव येत आहे म्हणून विरोध करीत होते. त्यांना बाबासाहेबांची जात खटकत होती. या लोकांच्या मनातील जात खरडून काढावी म्हणून मी नामांतराच्या आंदोलनात सहभागी झालो. घरदार सोडून वणवण भटकलो, लाठ्या काठ्या खाल्ल्या. तुरुंगवास भोगला. मला वाटत होते की, दलितांना त्यांची जात, बेडी वाटत असेल. ती गेली तर चांगलेच. पण दुर्दैवाने ते तसे नव्हते. सवर्णांच्या मनातून जशी जातीयवादाची दुर्गंधी येत होती तशीच मला दलित समजल्या जाणाऱ्या लोकांच्या मनातून येताना दिसली. मनातून जात खरडून काढायचा हा मार्ग बरोबर नाही, काही तरी वेगळे करायला हवे, तिढा नेमका कोठे आहे हे शोधू लागलो.
याच सुमाराला शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन सुरु झाले. मी त्यात झोकून दिले. मला माहीत नसलेल्या अनेक गोष्टींचा मला उलगडा झाला. शेती आणि शेतकरी समजून न घेता चालणाऱ्या चळवळी किती उथळ आणि तकलादू आहेत हे पटले. शेतकरी आंदोलनात शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघेल एवढा भाव मिळत नाही हे पटवून दिले. त्या पुढे जाऊन सरकार भाव मिळू देत नाही ही बाब लक्षात आणून दिली. त्यामुळेच त्यांनी डंकेल प्रस्तावाचे समर्थन केले होते. ९० च्या नंतर आंदोलन ओसरायला लागले होते.
सरकार ही व्यवस्था समजून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आले की, सरकार कायदे करून शेती आणि शेतकऱ्यांचे शोषण करते. म्हणून १९८४ साली आम्ही काही मित्रांनी मिळून लातूर येथे मार्केट कमिटीच्या बाहेर ‘अ‍ॅग्रोसेल’ या नावाने बाजार भरविला होता. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. शेतकरी आंदोलन सुरु असताना पासून मी कायदे समजून घेऊ लागलो होतो. आणीबाणीत (१९७५ ते ७७) तुरुंगात असताना भारतीय राज्यघटनेची मला चांगली ओळख झाली होती. सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले होते, तरी सरकारी नियंत्रणातील शेती मोकळी केली नव्हती. सीलिंग, आवश्यक वस्तू आणि जमीन अधिग्रहण हे कायदे शेतकऱ्यांना गळफास आहे, ही बाब ठोसपणे लक्षात आल्यानंतर आम्ही त्याभोवती आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न केला.
चळवळ एक विचार असतो. परिस्थितीनुरूप तोही बदलू शकतो. पण आंदोलनाचे मुद्दे परिस्थिती बदलताच वेगाने बदलत असतात. ही बाब माझ्या लक्षात आली.


भारतातील चळवळीना दोन आधार आहेत. एक मार्क्सचा वर्गवाद आणि दुसरा वर्ण वाद. या दोन वर्गामध्ये सगळ्या चळवळी सामावलेल्या आहेत. कधी वर्गीय चळवळ जातीय-धार्मिक आधाराने चालते, तर कधी जातीय-धार्मिक चळवळी वर्गीय आधार घेतात. जातीय संघटना जी भाषा बोलतात तशीच भाषा वर्ग संघटना बोलतात किंवा अनेक जातीय आंदोलने वर्ग बाशा बोलताना दिसली आहेत. वर्णवाद जसा सवर्णांचा आहे तसाच दलितांचाही आहे.
मी वेगवेगळ्या जाती-धर्माच्या लोकांना विचारले की, तुमच्या जातीत-धर्मात सगळ्यात वाईट परिस्थिती कोणाची आहे? प्रत्येकाने एकच उत्तर दिले, की आमच्या जातीत-धर्मात शेतकरी आणि स्त्रीची परिस्थिती सर्वात वाईट आहे. श्रीमंत, गरीब, मध्यम वर्गातील लोकाना विचारले त्यांचेही उत्तर तेच आहे.
स्त्री आणि शेतकरी यांचीच परिस्थिती वाईट आहे यायाचा आर्थ असा की कोणत्याही परिस्थितीत त्यांचे शोषण होते. या दोघांमध्ये एकच साम्य आहे. दोघेही सर्जक आहेत. व्यवस्था सर्जकांचे शोषण करते. म्हणून ना वर्ग संघर्ष करा, ना वर्ण संघर्ष खरा. खरा संघर्ष हा सर्जक विरुद्ध भक्षक असा आहे. ही बाब समजल्यानंतर मला सगळ्या चळवळीकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला.
शेतकरी आणि स्त्रियांच्या चळवळी सर्वात महत्वाच्या आहेत. पण आज त्यांची अवस्था खूपशी चांगली नाही. त्याचे मुख्य कारण असे की या चळवळी वर्ग चळवळीसारख्या मागण्या करतात व वर्ण चळवलीसारखा आक्रोश करतात. ज्या दिवशी त्या आपली स्वत:ची भाषा बोलायला लागतील तेव्हा खऱ्या स्वातंत्र्याची पहाट उगवेल.

– अमर हबीब
अंबर हौसिंग सोसायटी, आंबाजोगाई – ४३१५१७
मो. ८४११९०९९०९
E-mail – habib.amar@gmail.com

Related Articles

Back to top button